ETV Bharat / state

बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक दगडू सपकाळ यांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एन्ट्री

माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक अशी सकपाळ यांची ओळख आहे.

Dagdu Sapkal joins Eknath Shinde's Shiv Sena
दगडू सपकाळ यांची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एन्ट्री (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 11, 2026 at 2:07 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आज (11 जानेवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 'हा निर्णय छातीवर दगड ठेवून घेतला आहे', असा दावा दगडू सकपाळ यांनी यावेळी केला.

शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या मुलीला शिवडी विधानसभा प्रभाग 203 मधून इच्छुक असतानाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून तिकीट मिळालं नाही, त्यामुळे ते नाराज होते. याच कारणामुळे त्यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्याचं बोललं जात आहे.

सकपाळांनी व्यथा बोलून दाखवली : "म्हातारपणामुळे पक्षाला माझी गरज संपली. मुलीला तिकीटही मिळालं नाही, साधी विचारपूसही झाली नाही", असं माजी आमदार सकपाळ यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी दगडू सकपाळ यांच्या परळ येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

"दगडू सकपाळ हे बाळासाहेबांचे कट्टर आणि निष्ठावंत नेते आहेत. त्यांचा प्रवेश आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे", असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, " दगडू सकपाळ यांनी खऱ्या अर्थानं मुंबईत शिवसेनेचा पाया रचला होता. लालबागमध्ये त्यांनी शिवसेना वाढवली. आता त्यांना लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाचा आशीर्वाद मिळेल."


माजी आमदार आणि निष्ठावंत शिवसैनिक : दगडू सकपाळ यांचं लालबाग परळ भागातील शिवसेनेत मोठं वजन होतं. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख म्हणूनही काम केलं आहे. सध्या ठाकरे बंधू एकत्र आले असून, महापालिका निवडणुकीतील स्पर्धा वाढली आहे. पण शिवडीतील त्यांच्या जुन्या सहकाऱ्याच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

आज राज-उद्धव यांची मुंबईत सभा : आज रविवारी संध्याकाळी ठाकरे बंधूंची मुंबईत पहिली सभा होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार अजय चौधरी यांनी 'दिल्या घरी सुखी रहा,' असा टोला सकपाळ यांना लगावला आहे. यापूर्वी उमेदवारी न मिळण्याच्या कारणावरून अनिल कोकिळ यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला. आता दगडू सकपाळ यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानं प्रभागातील मराठी माणसांचं पारडं कोणाच्या बाजूनं झुकतं? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा