ETV Bharat / state

मुंबईच्या निवडणुकीत उतरले 'डिजिटल जादूगार'; रॅलींपासून एआयपर्यंत प्रचाराची नवी क्रांती

पारंपरिक प्रचारासोबतच उमेदवारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केल्याने प्रचाराचे स्वरूप पूर्णपणे बदललं आहे.

Digital magicians enter Mumbai elections A new revolution in campaigning, from rallies to AI
मुंबईच्या निवडणुकीत उतरले 'डिजिटल जादूगार'; रॅलींपासून एआयपर्यंत प्रचाराची नवी क्रांती (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 9, 2026 at 8:56 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक 15 जानेवारी रोजी होत असून, यंदाची लढाई केवळ उमेदवारांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ही निवडणूक आता परंपरा विरुद्ध तंत्रज्ञान, घोषणा विरुद्ध अल्गोरिदम आणि रॅली विरुद्ध रील्स अशी बहुरंगी झाली आहे. रस्त्यांवर ढोल-ताशांचा गजर, तर मोबाईल स्क्रीनवर एआय निर्मित पोस्टर्स, व्हिडिओ आणि रील्स असा हा प्रचाराचा नवा अवतार मुंबईकर अनुभवत आहेत. यंदा ही निवडणूक केवळ राजकीय लढत न राहता तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांची महास्पर्धा बनली आहे. पारंपरिक प्रचारासोबतच उमेदवारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केल्याने प्रचाराचे स्वरूप पूर्णपणे बदललं आहे.


रस्त्यांवर झेंडे, हातात घोषणा; पारंपरिक प्रचार अजूनही जिवंत : मुंबईच्या गल्लीबोळांत पुन्हा एकदा रॅली, पदयात्रा आणि सभा यांचा जोर वाढला आहे. शिवसेना (उबाठा), मनसे, भाजपासह विविध पक्षांचे उमेदवार थेट जनतेत उतरले आहेत. शहरातील विविध भागांत रॅली, पदयात्रा आणि सभांचा जोर कायम आहे. हातात झेंडे, घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हे चित्र अजूनही मतदारांना भावते. विशेषतः दाट वस्तीच्या भागात उमेदवार घराघरांत जाऊन थेट जनतेशी संवाद साधताना दिसत आहेत. पाणी, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य हे मुद्दे अजूनही लोकांच्या मनात घर करून आहेत आणि याच मूलभूत प्रश्नांवर चर्चा अधिक होत असल्याचं चित्र आहे.


प्रचार साहित्य विक्रेते काय म्हणाले? : लालबाग भागात प्रचार साहित्याची विक्री करणारे शमशाद सांगतात की, "यंदा आम्ही प्रचाराचं साहित्य दिल्लीवरून मागवलं आहे. सर्वच पक्षांची चिन्हं असलेले गमछे, बिल्ले, झेंडे आम्ही मागवले आहेत. शिवाय प्रत्येक पक्षाची चिन्हं असलेले इलेक्ट्रिक उपकरणं हा यंदाचा नवीन प्रकार आहे. पण यंदा काही मुख्य पक्षांनी उमेदवारांसाठी प्रचाराचं साहित्य पुरवल्यामुळं विक्री मंदावली आहे, असंही शमशाद यांनी सांगितलं.


खरी रणभूमी मोबाईल स्क्रीनवर; व्हॉट्सॲप ते इंस्टाग्रामपर्यंत प्रचाराचा महापूर : यंदा प्रचाराची खरी रणभूमी ही रस्त्यांपेक्षा मोबाईल स्क्रीनवर अधिक सरकली आहे. यंदा प्रचाराची खरी रणभूमी म्हणजे मोबाईलवर आहे. पूर्वी भिंतींवर पोस्टर लावले जात होते, आता तेच पोस्टर काही सेकंदांत व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पोहोचत आहेत.

मुंबईच्या निवडणुकीत उतरले 'डिजिटल जादूगार'; रॅलींपासून एआयपर्यंत प्रचाराची नवी क्रांती (ETV Bharat Reporter)

प्रचाराची स्टाईल : व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब या माध्यमांवर उमेदवारांचे पोस्टर्स, व्हिडिओ, रील्स आणि संदेश मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि युट्युबवर रील्स, व्हिडिओ आणि पोस्टर्सचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. युवकांना आकर्षित करण्यासाठी मीम्स, ट्रेंडी गाणी आणि फास्ट कट एडिटिंगचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. वॉर्डनिहाय ग्रुप, मतदारनिहाय संदेश, व्हॉईस नोट्स आणि लघु व्हिडिओ क्लिप्सद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नवे तंत्र वापरले जात आहे.


'पोस्टर वॉर' नाही, पण संदेश थेट! : यंदा मुंबईच्या रस्त्यांवर एक वेगळाच ट्रेंड दिसतो आहे. "काम बोलतंय!", "तुमच्यासाठीच आम्ही!", "यंदा बदल हवा!", अशा पोस्टर्समुळं मतदारांमध्ये उत्सुकता वाढत आहे. कोणाचा पोस्टर? कोणाला टोला? यावर सोशल मीडियावर चर्चांचा भडिमार सुरू आहे.


प्रचारात उतरले 'डिजिटल जादूगार' एआयचा धडाकेबाज वापर : यंदाची निवडणूक वेगळी ठरतेय कारण प्रचारात मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर होत आहे. पूर्वी मोठ्या जाहिरात एजन्सी लागत होत्या; आता उमेदवार स्वतःच एआय टूल्स वापरून पोस्टर्स, व्हिडिओ, रील्स, भाषांतर, ग्राफिक्स, स्लोगन हे सगळं काही मिनिटांत तयार करत आहेत. यामुळं लहान उमेदवारांनाही मोठ्या पक्षांसारखी डिजिटल ताकद मिळत आहे. एआयच्या मदतीनं उमेदवार पोस्टर्स, स्लोगन, भाषांतर, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स काही मिनिटांत तयार करत आहेत. विविध भाषांमध्ये एकाच मजकुराचे अनेक प्रकार तयार केल्यानं प्रचार अधिक व्यापक झाला आहे.

Digital magicians enter Mumbai elections A new revolution in campaigning, from rallies to AI
मुंबईच्या निवडणुकीत उतरले 'डिजिटल जादूगार'; रॅलींपासून एआयपर्यंत प्रचाराची नवी क्रांती (ETV Bharat Reporter)


सोय आणि धोका, दोन्ही शक्यता : एआयमुळं प्रचारात मनोरंजनही आले आहे. काही ठिकाणी एआय निर्मित विनोदी पात्रे, मजेशीर संवाद आणि कॉमिक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लोक हसतात, शेअर करतात आणि प्रचार आपोआप पोहोचतो. पण याच एआयचा धोका देखील आहे. खोटे व्हिडिओ, बनावट आवाज, चुकीची विधानं दाखवणाऱ्या क्लिप्स यामुळं मतदारांची दिशाभूल होण्याची भीती व्यक्त होत आहे. डीपफेक आणि खोट्या व्हिडिओंचा धोका वाढला असून, बनावट आवाज आणि दिशाभूल करणाऱ्या क्लिप्समुळं मतदार गोंधळात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


निवडणूक आयोग अलर्ट; एआयसाठी खास नियम : या संभाव्य धोक्यांमुळं निवडणूक आयोगानं एआय वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे. एआय निर्मित मजकूर असल्यास तसा स्पष्ट उल्लेख बंधनकारक,डीपफेक वापरल्यास डिस्क्लेमर आवश्यक, दिशाभूल करणारा कंटेंट गुन्हा ठरू शकतो, अशी भूमिका निवडणूक आयोगानं घेतली आहे. म्हणजे प्रचार करा, पण पारदर्शकपणे असंच नियम सांगतो. एआय निर्मित मजकूर असल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख करणे आणि नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

Digital magicians enter Mumbai elections A new revolution in campaigning, from rallies to AI
मुंबईच्या निवडणुकीत उतरले 'डिजिटल जादूगार'; रॅलींपासून एआयपर्यंत प्रचाराची नवी क्रांती (ETV Bharat Reporter)


एआय कसा लक्ष्य करतो मतदार? : एआय फक्त पोस्टर बनवत नाही, तर मतदारांचे वर्तनही समजून घेतो. कोणत्या वयोगटाला कोणते मुद्दे आवडतात? कोणत्या परिसरात काय चालते? कोणत्या वेळेला कोणता मेसेज पाठवायचा? हा सगळा डेटा-ड्रिव्हन प्रचार करण्यास एआय उपयुक्त ठरत आहे. अल्गोरिदम आणि डेटा आधारित प्रचारामुळे यंदाची निवडणूक अधिक तांत्रिक स्वरूपाची बनली आहे.


रस्त्यावर घोषणा, स्क्रीनवर अल्गोरिदम : यंदाची मुंबई निवडणूक एक डिजिटल युद्ध बनली आहे. रस्त्यावर घोषणाबाजी, मोबाईलवर एआय, निनावी पण भावनिक आवाहन करणारे पोस्टर्स, रील्समध्ये करमणूक आणि संदेश यामुळं मतदारांसाठी हा सगळा अनुभव एक वेगळीच पर्वणी ठरतो आहे. आता खरा प्रश्न असा आहे, मतदार विचार करून मतदान करणार की रील पाहून भावनेनं निर्णय घेणार? ताई, माई, अक्का…विचार करा पक्का…आणि मगच मारा शिक्का!

हेही वाचा :

  1. नागपुरात भाजपाची मोठी कारवाई, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या 32 सदस्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी
  2. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा झंझावाती रोड शो: रस्त्यावर 'एकच ब्रँड ठाकरे ब्रँड'च्या घोषणा
  3. शिवसेना भाजपा वाद भोवला; नवी मुंबईतील 'या' प्रभागाच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती