'मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही'; के. अण्णामलाईंच्या वक्तव्यानं भाजपा अडचणीत? राज्यातील भाजपा नेत्यांची 'चुप्पी'!
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर के. अण्णामलाईंच्या वक्तव्यानं भाजपा अडचणीत आल्याचं दिसून येत आहे. भाजपा नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

Published : January 10, 2026 at 3:11 PM IST
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपासमोर नव्या राजकीय अडचणी उभ्या राहिल्या आहेत. भाजपा नेते के. अण्णामलाई यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं असून, विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत मराठीसह मोठ्या प्रमाणावर अमराठी मतदार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून विविध राज्यांतील नेत्यांना प्रचारासाठी मुंबईत उतरवण्यात येत आहे. अशाच प्रचारादरम्यान अण्णामलाई यांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण तापलंय. दरम्यान, "मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही," अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीतून दिली.
मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही - एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना अण्णामलाई यांनी, “बॉम्बे इज नॉट महाराष्ट्राज सिटी, इट्स इंटरनॅशनल सिटी” असं वक्तव्य केलं. मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नसून, आंतरराष्ट्रीय शहर आहे, असं सूचित करणाऱ्या या विधानावरून विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना - उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या वक्तव्याचा निषेध केला.
काय म्हणाले अण्णामलाई? - महापालिका निवडणूक प्रचारात बोलताना अण्णामलाई म्हणाले, “मुंबईत ट्रिपल इंजिन सरकार आवश्यक आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईत भाजपाचा महापौर असायला हवा. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचं बजेट सुमारे 40 हजार कोटी रुपयांचं आहे. चेन्नईचं बजेट आठ हजार कोटी, तर बंगळुरूचं 19 हजार कोटी आहे. त्यामुळं मुंबईसारख्या शहरासाठी सक्षम प्रशासनाची गरज आहे.”
विरोधकांचा हल्लाबोल - या वक्तव्यावर संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली. अण्णामलाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, हे विधान मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना, “मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राचीच राहील. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करता येणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितलं.
अण्णामलाई यांच्या वक्तव्यामुळं भाजपा अडचणीत? - एकीकडं शिवसेना (उबाठा) आणि मनसे हे त्यांचा जुना मराठीचा आणि मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा मुद्दा मांडत प्रचार करताना दिसतायेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सर्व प्रकल्प अदानींकडं दिले जात आहेत. वाढवण बंदरला विमानतळ उभारून गुजरातला फायदा होईल अशी पावलं उचलली जात आहेत, अशी टीका राज ठाकरेंनी 'सामना' दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केली. ठाकरे बंधू हा मुद्दा प्रचारात पुढे नेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "चंद्र, सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही" असं म्हटलं होतं. पण, अण्णामलाई यांच्या वक्तव्यामुळं महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुंबईची ओळख आणि महाराष्ट्राशी असलेलं नातं पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलंय. भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी याबाबत अद्याप बोलणं टाळलं आहे.
कोण आहेत के. अण्णामलाई? - के. कुप्पुसामी अण्णामलाई हे भाजपाचे नेते आणि माजी आयपीएस अधिकारी आहेत. कर्नाटक कॅडरमध्ये कार्यरत असताना त्यांनी प्रभावी कामगिरी करत ‘कर्नाटक पोलिसांचा सिंघम’ अशी ओळख मिळवली. 2019 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा देऊन ते राजकारणात सक्रिय झाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी तामिळनाडूतील कोयंबतूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. सध्या ते भाजपाच्या तामिळनाडू राजकारणातील प्रमुख चेहरा मानले जातात. मुंबई महापालिका निवडणुकीत ते भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून काम करत आहेत.
हेही वाचा -
- 'मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही, 'बिनविरोध'चंही सोडवलं कोडं, पाहा EXCLUSIVE मुलाखत
- 'दुसऱ्यांची पोरं भाजपा कडेवर घेतं', राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा नाशिकच्या संयुक्त सभेतून महायुतीवर हल्लाबोल
- तुषार आपटे भाजपाचे स्वीकृत नगरसेवक होताच संजय राऊत संतापले; म्हणाले, लैंगिक अत्याचारातील आरोपीला फडणवीसांनी बक्षीस दिलं

