ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात होणार चुरशीची लढत; लालबागमध्ये किरण तावडे आणि अनिल कोकीळ आमनेसामने
लालबागमध्ये किरण तावडे विरुद्ध अनिल कोकिल यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.

Published : January 11, 2026 at 2:15 PM IST
मुंबई : मुंबईतील लालबाग, परळ आणि हिंदमाता भाग म्हणजे मराठी माणसाचा हक्काचा हुकमी एक्का. इथं निवडणूक आली की फक्त पोस्टर, बॅनर किंवा भाषणं आणि आश्वासनं चालत नाहीत. तर लोक खऱ्या आयुष्यात आपल्या संघर्षात आपल्यासाठी उभे राहिलेले चेहरे नीट लक्षात ठेवतात. या भागाच्या हृदयात अगदी मध्यभागी "लालबागचा राजा" विराजमान होतो. दरम्यान, यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत लालबागमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाचे किरण तावडे आणि नुकतेच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या अनिल कोकिल यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. असं असलं तरी अनिल कोकीळ यांच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशामुळं काही ज्येष्ठ शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळं प्रभागातील मराठी माणसांचा रोष त्यांच्यावर असून प्रत्यक्ष निवडणूक निकालात दिसून येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लढत लक्षवेधी ठरणार : शिवसेनेच्या स्थापनेपासूनच ठाकरेंचा बालेकिल्ला ठरलेल्या लालबाग परळमध्ये माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांना डावलून उद्धव ठाकरे यांनी किरण तावडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळं अनिल कोकीळ नाराज झाले होते. प्रभाग क्रमांक 204 मधून अनिल कोकीळ यांनी उमेदवारी मागितली होती. सुरुवातीला त्यांच्या नावाची चर्चा देखील झाली. पण ऐनवेळी अनिल कोकीळ यांना उमेदवारी न देता उद्धव ठाकरे यांनी किरण तावडे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी जाहीर प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेच एबी फॉर्मही मिळाला. त्यामुळं लालबागमध्ये किरण तावडे विरुद्ध अनिल कोकिल यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.
उमेदवारांचं मत काय? : "शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं पक्षाचे तिकीट असेल तर उमेदवार जिंकून येतोच, असा येथील अनुभव आहे. परंतु पक्षात फूट पडल्यानंतर ताकद विभागली गेली आहे. पक्षाकडून माझ्यावर अन्याय झाला. त्यामुळं शिवसेनेत प्रवेश केला," असं अनिल कोकीळ यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं. तर शिवसेना (उबाठा) पक्षाचे किरण तावडे यांच्याशी "ईटीव्ही भारत"नं संवाद साधला असता, "शिवसैनिक जागरूक आहे आणि आमचा शिवसैनिक आम्हालाच मत देणार," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढं ते म्हणाले, "राजकीय स्वार्थानं कितीही बंडखोरी झाल्या तरी इथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी आणि शिवसेना पक्षाशी इमान असलेली मराठी माणसं आम्हालाच मतं देतील. तसंच विभागामध्ये सध्या असलेले प्रदूषण, पार्किंग आणि पालिका शाळांबाबतच्या प्रश्नाबाबत काम करणार आहे," असंही किरण तावडे यांनी सांगितलं.
लालबाग परळची पार्श्वभूमी : 1982 साली या भागात मोठा गिरणी संप झाला. लाखो कामगार रस्त्यावर आले, घरं उद्ध्वस्त झाली आणि भविष्य अंधारात गेले. या संपाचं नेतृत्व डॉ. दत्ता सामंत यांनी केलं. त्याच काळात काही जुनी युनियन आणि डाव्या विचारांच्या संघटना देखील सक्रिय होत्या, पण त्यांचा मार्ग कामगारांच्या मनाला पूर्ण उभारी देऊ शकला नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी कामगारांच्या वेदना, आत्मसन्मान आणि ओळख समजून घेतली. तसंच मराठी माणूस आहे, या शहराचा मालक आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवलं. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना गिरणी कामगार सेना घराघरात पोहोचली. संकटाच्या वेळी कामगारांसोबत बाळासाहेब उभे राहिले आणि या भागाला बाळासाहेबांनी भावनिक कवच दिलं, आणि त्यामुळंच आजही शिवसेना म्हणजे विश्वास आणि सुरक्षा हीच प्रतिमा कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात आहे.
स्थानिक रहिवासी काय म्हणाले? : दरम्यान, या भागात वर्तमानपत्राचा स्टॉल चालवणारा युवक संदेश सावंत सांगतो की, "उमेदवार कोणीही असू दे पण बाळासाहेबांची शिवसेनाच इथं निवडून येणार." तर स्थानिक रहिवासी असलेले शिवाजी शिंदे यांनी यावेळी सांगितलं की, "भागामध्ये काही समस्या नाही. पाणी स्वच्छतेची व्यवस्था अगदी योग्य आहे. फक्त नव्या रस्त्यांचं बांधकाम सुरू आहे, त्याचा थोडाफार त्रास होत आहे. पण ते काम होईपर्यंत होणारच," असं मत त्यांनी व्यक्त केलं.
लालबाग परळ : ठाकरे कुटुंबाचा बालेकिल्ला : लालबाग परळ हा भाग नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. वॉर्ड क्रमांक 203 आणि 204 मधून शिवसेनेच्या नगरसेवकांनी सहजपणे निवडणुका जिंकल्या आहेत. नारायण राणेंचं बंड, राज ठाकरेंची शिवसेनेला सोडचिठ्ठी, एकनाथ शिंदे यांचे बंड या सगळ्या गोंधळातही लालबाग परळनं नेहमी ठाकरे कुटुंबाला साथ दिली आहे. एकेकाळी कम्युनिस्टांचा गड असलेला हा परिसर बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली तरुण शिवसैनिकांच्या बळावर जिंकला गेला, पण यावेळी वॉर्ड 204 मध्ये बंडखोरी दिसली. अनिल कोकीळ यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळं काही ज्येष्ठ शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी भेट म्हणून दिलेली बॅग आणि साहित्य देखील जाळल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, आता
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीमुळं मराठी मतदारांची मोट बांधली जाते का? भाजपा आणि शिवसेनेची सरशी रोखली जाईल का? याचं उत्तर 16 जानेवारीला मिळणार आहे.
हेही वाचा :
- 'जे काम उबाठानं केलं, त्याचं श्रेय चोरू नका' : संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
- मुंबई, ठाण्यासारखंच नाशिकमध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांची घरपट्टी माफ करू ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- बाळासाहेबांनी भरवलं नसतं, तर तुमचा राजकीय मृत्यू झाला असता, - उद्धव ठाकरे यांचा भाजपावर हल्लाबोल!

