ETV Bharat / state

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश, विधान परिषद उपसभापती पदासाठी उमेदवारी जाहीर

सचिन अहिर यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाला धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना पक्षाकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अधिकृत उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.

Sachin Ahir
सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 30, 2026 at 2:34 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. विधान परिषदेचे सदस्य सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री संजय शिरसाट, आमदार कृपाल तुमाने, मनिषा कायंदे, दुष्यंत चतुर्वेदी, चंद्रकांत रघुवंशी आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा : आमदार सचिन अहिर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळं राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे. सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. त्यांचा नामांकन अर्जही दाखल करण्यात आला असून या निर्णयामुळे विधान परिषदेतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर'च्या पुढील टप्प्याचा भाग असू शकतो. या रणनीतीमुळे शिवसेना आपली ताकद वाढवत असून विधान परिषदेतील महत्त्वाची पदं आपल्या बाजूनं मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश (ETV Bharat Reporter)

सचिन अहिर यांना पक्षांतर बंदीच्या कायद्याची भीती का नाही? : पक्षांतरबंदी कायद्याच्या तांत्रिक तरतुदींमुळे सचिन अहिर यांच्यावर तूर्तास कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही. त्यामुळंच आधी सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरून पद मिळवल्यानंतर पक्षप्रवेश करावा असं नियोजन केल्याचं समोर येत आहे. कारण, भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचित पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित एकूण 8 परिच्छेद आहेत. यामध्ये हा कायदा कोणाला लागू होतो? आणि कोणाला नाही? याचे सविस्तर नियम दिले आहेत. कायद्यातील परिच्छेद पाचनुसार सध्या सचिन अहिर यांच्यासाठी कायदेशीर संरक्षण कवच ठरला आहे. या परिच्छेदानुसार, काही घटनात्मक पदांवर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेतून विशेष सूट देण्यात आली आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्ष-उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, विधानसभा अध्यक्ष-उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती-उपसभापती, यासारख्या सर्वोच्च आणि तटस्थ पदांवर नियुक्त झालेल्या व्यक्तींचा समावेश होतो. सचिन अहिर यांच्याकडं सध्या विधान परिषदेच्या उपसभापती पदाची धुरा (किंवा तत्सम घटनात्मक जबाबदारी) देण्याचं नियोजन असल्यामुळं या विशेष तरतुदीचा फायदा त्यांना मिळत आहे. याच कारणामुळं त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही, अशी अटकळ लढवली जात आहे.

राज्यातील राजकीय वातावरण तापलं : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी हा आणखी एक मोठा झटका मानला जात आहे. कारण अलीकडच्या काळात पक्षातून सातत्यानं होणाऱ्या नेत्यांच्या हालचालींमुळं संघटनात्मक ताकद कमी होत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. दरम्यान, उपसभापती पदाच्या निवडणुकीत आणखी काही नावे चर्चेत होती. मात्र, शिवसेनेनं आमदार सचिन अहिर यांच्या उमेदवारीद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या संपूर्ण घडामोडीमुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं दिसत आहे.

माध्यमांशी बोलताना आमदार महेश सावंत, आमदार संजय शिरसाट आणि आमदार गोपीचंद पडळकर (ETV Bharat Reporter)

वरळीमध्ये शिवसेनेची (उबाठा) सामुदायिक ताकद : "आमच्या वरिष्ठांनी याबद्दल आत्मपरिक्षण करायला पाहिजे होतं. ज्या पद्धतीनं हे चाललं होतं ते माझ्या लक्षात आलं होतं. परंतु, मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळं भाष्य करू शकत नव्हतो. वरळीमध्ये कोणी आमचा पक्ष सोडून गेलं असेल तर आम्हाला पक्ष म्हणून विशेष काही वाटत नाही. पक्ष म्हणून आमचं काही नुकसान झालेलं नाही. कारण वरळीमध्ये मी 18 वर्ष शाखाप्रमुख, पाच वर्ष नगरसेवक आणि 2014 साली झालेल्या निवडणुकीत सचिन अहिर यांचा पराभव करून निवडून आलो होतो. याच वरळीमध्ये मी आदित्य ठाकरे यांच्यासोबत दोन्ही निवडणुकांमध्ये कार्यरत होतो. यामुळं वरळी ही शिवसेनेची (उबाठा) आहे. वरळी कोणा एकाची नाही. वरळीमध्ये शिवसेनेची (उबाठा) सामुदायिक ताकद आहे. त्यामुळं असं कोण आलं गेलं यामुळं मला तरी विशेष काही वाटत नाही. शिवसैनिक म्हणून आम्ही वरळीमध्ये आमचं काम करत राहू. ठाकरे कुटुंबाबद्दल मला आदर आहे. त्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. त्यांच्याबद्दल मी वेडंवाकडं काहीही बोलणार नाही," अशी प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) नेते सुनील शिंदे यांनी दिली.

उद्धव ठाकरेंना अजून धक्के बसणार : "असे अनेक धक्के अजून उद्धव ठाकरे यांना सहन करायचे आहेत. विश्वासघात केला तर आपल्या पदरात काय येतं? हे आता उद्धव ठाकरे यांना लक्षात आलं असेल. 2019 ला अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा विश्वासघात केला. मोदी यांच्याबरोबर फडणवीस यांचा प्रचार केला. मात्र, नंतर विश्वासघात केला, याची प्रचिती आता उद्धव ठाकरे यांना येत आहे. सचिन अहिर हे चांगले नेते आहेत. तरुण नेते आहेत. त्यांचं मुंबईमध्ये मोठं नेटवर्क आहे. विधान परिषदेमध्ये आम्ही एकत्र काम केलं आहे. कमी वयात आमदार, कमी वयात मंत्री आता ते कमी वयात उपसभापती व्हायला चालले आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा", अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

त्यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये असंतोष : "उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये नेत्यांना सन्मान मिळत नसल्यामुळं किती असंतोष आहे हे समोर आलं आहे. आता याला त्यांच्या पक्षातील नेते काय म्हणतात हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे. सचिन अहिर हे काही लहान नेता नाहीत. ते खूप मोठे नेता आहेत. त्यांचं पक्षामध्ये मी स्वागत करतो," असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.

हेही वाचा :

  1. शिर्डीत भररस्त्यात टांगा पलटी; साईदर्शनासाठी आंध्र प्रदेशातून आलेले भाविक जखमी
  2. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गुंतवून ठेवा, मिंधे सेनेला अमित शाहांनी दिली सुपारी'; उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
  3. टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; पुढील वर्षापासून ऑनलाइन परीक्षा