शिंदे-फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; वरळीतून फोडला निवडणूक प्रचाराचा नारळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी मुंबई महनगरपालिकेतील प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी दोन्ही नेत्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली.

Published : January 4, 2026 at 9:01 AM IST
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी मुंबई महनगरपालिकेतील प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. वरळी येथील एनएससीआय डोममध्ये पार पडलेल्या हा मेळावा प्रचार मेळावा नसून हा 'विजयी मेळावा' असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी एक वेगळी मुंबई हवी असेल तर आमच्याकडे चाव्या द्या, अशी साद मुंबईकरांना घातली. भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मुंबईतील सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी आणि नेते यावेळी उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत मुंबईत केलेल्या विकासकामांची माहिती दिली.
हा शिवसेनेचा विजयी मेळावा - एकनाथ शिंदे- महायुतीचे 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलंय. आम्ही लोकसभा जिंकलो, विधानसभेत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. नगर पालिकांमध्ये 75 टक्क्यांहून जास्त जागा मिळवून विजयाची हॅट्ट्रीक केली. आता महापालिकांमध्ये विजयाचा चौकार मारायचाय, अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी यावेळी केली. मुंबईला आणि मुंबईकरांना भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून आणि बकासुराच्या तावडीतून सोडवायचंय. त्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झालाय. मुंबईतील कचरा, रस्ते, खिचडी, मिठी नदीतील गाळात भ्रष्टाचार करुन दाखवणारे कार्यसम्राट नव्हे तर करप्शनसम्राट बनले, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीत केला.
घराचं स्वप्न धुळीस कोणी मिळवलं?मराठी माणूस मुंबईतून हद्दपार कोणामुळे झाला?, मेट्रो प्रकल्पात खो कोणी घातला?, बेस्टचं वाटोळं कोणी केलं?, कोविड रुग्णांच्या तोंडातली खिचडी कोणी खाल्ली?, बॉडीबॅगमधून पैसे बनवण्याचे पाप कोणी केलं?, गरीब मुंबईकरांच्या घराचं स्वप्न धुळीस कोणी मिळवलं?, मुंबईतील मोक्याचे भूखंड धनदांडग्यांच्या घशात कोणी घातले?, बीडीडी चाळीतील रहिवाशी आणि गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं कोणी पुसली?, पत्राचाळीच्या लोकांना देशोधडीला कोणी लावलं? असे सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केले.
यांचं व्हिजन कुठे गेलं होतं?- महाराष्ट्र फास्ट आणि मुंबई सुपरफास्ट हे आमचे मिशन आहे, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यांच्यासाठी 'म' मराठीचा नव्हे तर मलिदा, मतलाबाचा आणि मुजोरीचा आहे. तर महायुतीसाठी 'म' मराठीचा, महाराष्ट्राचा आणि महायुतीचा आहे. मराठी माणसाला खुराड्यात ठेवणारे वर्षाला नव्या माड्या बांधत राहिले. त्यांच्या काळात स्पीड ब्रेकर आणि ब्रोकरची चलती होती. मात्र, गेल्या साडेतीन वर्षात महायुतीनं मुंबईचा कायापालट केलाय. सत्तेसाठी लाचार होऊन त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसणारे खरे सूर्याजी पिसाळ आहेत. आम्ही कोणाची सत्ता घेऊन गेलो नाही, तर सत्तेतून पायउतार झालो. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली आणि शिवसेनेचं खच्चीकरण झालं होतं. म्हणून आम्ही ते धाडस केलं. इतकी वर्ष सत्तेत या लबाड लोकांनी फक्त घबाड कमावण्याचं काम केलं. तेव्हा यांचं व्हिजन कुठे गेलं होतं? जनतेनं त्यांचा सीझन संपवल्यानं त्यांना व्हिजन आठवलं, असा टोला त्यांनी यावेळी शिंदेंनी लगावला.
आता कोबंडी कापायला निघालेत- तुम्ही केवळ मुंबईची तिजोरी लुटण्याचे काम केलतं? कारण तुम्हाला तुमचं भविष्य सुरक्षित करायचंय. पण आम्हाला मुंबईकरांचं भविष्य सुरक्षित करायचंय. आजची सभा म्हणजे मुंबईतील भ्रष्टाचाराच्या विरोधातली ललकारी आहे, असंही ते पुढे म्हणाले. मुख्यमंत्री असताना मुंबईसाठी आणि मराठी माणसांसाठी अनेक निर्णय घेतले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यांना मराठी भाषेचा नाही तर महापालिकेच्या तिजोरीचा पुळका आहे. मुंबई म्हणजे सोन्याची अंड देणारी कोबडी समजलेत. आतापर्यंत अंडी खाऊन झाली. आता कोबंडी कापायला निघालेत. मुंबई आणि मराठी माणूस संकटात आहेत, अशी आवई उठवून आजवर यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. पण, त्यांच्या संधीसाधू राजकारणाला मराठी माणूस भुलणार नाही. मुंबई मराठी माणसांची होती. सदैव मराठी माणसाचीच राहील. कोणाच्याही सात पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नकोत तर विकासाचे वारकरी हवे आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.
सामान्य कार्यकर्ता हाच आपला ब्रँड- जाताजाता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवरही सडेतोड टीका केली. माणसासाठी एकत्र आल्याची दवंडी पिटताय. मग 20 वर्षांपूर्वी कोणासाठी आणि कशासाठी वेगळे झाला होतात?, ते पण एकदा सांगून टाका. त्यामध्ये तुमचा स्वार्थ आणि अहंकार होता. पण आता जनतेनं यांचा बँड वाजवल्यावर यांना ब्रँडची आठवण झाली. पण खरा ब्रँड फक्त बाळासाहेब आहेत. महायुतीचा सामान्य कार्यकर्ता हाच आपला ब्रँड आहे, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
एक वेगळी मुंबई हवीय तर आम्हाला एकदा संधी द्या - देवेंद्र फडणवीस - 14 आणि 15 जानेवारी हा संक्रमणाचा काळ आहे. 16 जानेवारी ही छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तिथी आहे. त्यादिवशी आपल्याला आपला महापौर मुंबई महापालिकेवर बसवायचाय, अशी साद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांना घातलीय. गेल्या काही दिवसांत आपण बोलबच्चन ऐकले. आता आमचं वचन आहे की मुंबईकरांचं जीवन बदलवून दाखवू. आज विमानातून मुंबईत उतरत होतो. तेव्हा बघितलं मुंबई कुठे गेली का? सरकलीय का?, कारण हल्ली काहींना ती उत्तरेकडे सरकताना दिसतेय. मात्र, मला त्यांना सांगयचंय की तुमची बुद्धी सरकताना दिसतेय. ते केवळ आव आणून बोलतात. त्यांनी मुंबईला काही दिलेलं नाही, अशी नाव न घेता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
मुंबईचा महापौर हा मराठीच होणार - जन्मानं केवळ रक्ताचा वारसा मिळत असतो. मात्र कर्माचा वारसा हा विचारांनी मिळतो. जो आमच्याकडे आहे. सध्या मुंबईत श्रेय टोळणारी सक्रीय झालीय. यात काही अबोध बालकंही आहेत. मेट्रो आणि कोस्टल रोड आम्ही केला म्हणे! त्यांना मी एवढंच सांगेन, अरे ये पब्लिक है सब जानती है. या विकासकामांत खोडा कोणी घातला होता?, स्थगित्या कोणी दिल्या होत्या?, लोक एकच नाव घेतील, ते म्हणजे उद्धव ठाकरे! मुंबईचा महापौर हा महायुतीचा, हिंदू आणि मराठीच होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
तिरंगा फडकवतो- परवा वारीस पठाण बोलून गेले 'बुरखेवाली मेयर बनेगी', त्यावर सकाळचा भोंगा काहीच बोलला नाही. आमचं कुठल्याही धर्माशी वैर नाही. आमचा वंदे मातरम् म्हणायला नकार देणाऱ्यांनाही विरोध नाही. आम्ही माहिम दर्गावर सांगितलं तेव्हा चादर चढवतो आणि तिरंगा फडकवतो. मात्र, भारताशी दुश्मनी असलेल्यांना आम्ही सोडणार नाही. तिकडच्या सभेत तुम्हाला वंदे मातरम् घोषणा दिसणार नाही. आम्ही मागील शेकडो बांगलादेशी 6-7 महिन्यात आम्ही परत पाठवलेत. बंगालमधून ममता दीदींच्या आशीर्वादानं इथं आलेल्या बंगलादेशीला आम्ही परत पाठवू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुंबईतला मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही- आज मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला. हे पाप कोणाचं? गिरणी कामगार हद्दपार झाला कोणामुळे?, फिक्स्ड डिपॉझिटच्या पावत्या चाटायच्यात का?, त्यातले दोन हजार कोटी जर वेळीच काढले असते तरी आज गिरणी कामगार वाचला असता. आम्ही बीडीडी चाळ निर्माण केली. 80 हजार लोकं घरांची वाट पाहत होते. मात्र, यांनी आजवर केवळ बिल्डर्सच्या नादात लोकांचा सत्यानाश केला. स्वत: म्हाडा इमारती बांधेल, असा निर्णय घेतला. आज इमारती उभ्या करत लोकांना चाव्या दिल्या आहेत. तिकडे पत्राचाळीचा तुम्ही घोटाळा केलात. तिथल्या लोकांना बेघर केलंत. मात्र, आम्हीच त्यांनाही घर दिलं. यापुढे मुंबईतला मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
एक वेगळी मुंबई करुन दाखवू- मुंबईतील झोपडपट्टीतील रहिवश्यांनाही पक्की घर देऊ. महायुती सरकारनं एसआरएच्या माध्यमातून हजारो घरं दिली. धारावीच मुद्दाही आम्ही निकाली काढला. दुसरा प्रश्न दळणवळणाचा आणि वाहतुकीचा आहे. तो सोडवण्यासाठी आम्ही मेट्रोच्या माध्यमातून पाताळलोक तयार करतोय. मुंबईकरांना आता ट्रॅफिकमध्ये अडकून पडावं लागणार नाही. आम्ही अनेक ठिकाणी टनेलचं जाळं तयार करतोय. हे करत असताना पर्यावरणाचाही समतोल राखतोय. आजवर सांडपाणी थेट समुद्रात जात होतं. एसटीपी मुंबईत नावालाही नव्हतं. 70 हजारांचे केवळ कागद होते. आम्ही 16 हजार कोटींचं एसपीटी निर्माण करतोय. आता समुद्रातून घाणेरडा वास येणार नाही, हे आपण करुन दाखवलंय. मी आणि शिंदेसाहेब रामदासजींसोबत 17 हजार कोटींचं पर्यावरणपूर्वक बजेट अणणार आहोत. आम्ही केवळ बोलत नाही, तर करून दाखवतो. बाकीच्यांनी आजवर केवळ भ्रष्टाचार करुन दाखवला. आता आमच्यावर विश्वास दाखवत महापालिका आमच्या हाती द्या. प्रामाणिकपणे एक वेगळी मुंबई करुन दाखवू, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हेही वाचा-

