छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटली; भाजपा कार्यालयासमोर इच्छुक उमेदवारांचा गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळं टळला अनर्थ
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा-शिवसेना युती तुटली. यावरून शिवसेना नेते संजय शिरसाट आणि भाजपा नेते अतुल सावेंचा एकमेकांवर आरोप केलेत. दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर गोंधळ घातला.

Published : December 30, 2025 at 3:31 PM IST
|Updated : December 30, 2025 at 3:52 PM IST
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेची युती तुटल्यावर दोन्ही पक्षातील नेत्यांनी आपापले उमेदवार द्यायला सुरुवात केली. यानंतर शिवसेना नेते संजय शिरसाट आणि भाजपा नेते अतुल सावे यांनी एकमेकांना जबाबदार धरत युती तुटल्याचं जाहीर केलं. भाजपानं तिकिट नाकारलेल्या उमेदवारांनी विशेषतः महिला कार्यकर्त्यांनी कार्यालयात चांगलाच गोंधळ घातला. एका इच्छुक उमेदवारानं तर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. भाजपा नेते अतुल सावे, खा. डॉ भागवत कराड उमेदवारांशी चर्चा करत असताना नाराज कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळं दोन्ही नेत्यांनी दालनाच्या मागच्या दरवाज्यानं पळ काढला. परिस्थिचं गांभीर्य घेत पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवर घातला. यावेळी एक महिला चक्कर येऊन खाली कोसळली. तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. परिस्थिती नियंत्रणात असली तरी भाजपामधील अंतर्गत गोंधळ प्रचारात प्रभावी ठरेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
महिला पदाधिकारी संतप्त : सकाळी दहाच्या सुमारास भाजपा आणि शिवसेना पक्षांनी युती तुटल्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपाचे नेते पक्षाच्या कार्यालयात बसले होते. यावेळी दिव्या मराठे आणि सुवर्णा माताडे यांनी पक्षाचे नेते अतुल सावे आणि भागवत कराड यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कक्षात जाऊन दरवाजे बंद केले. यामुळं त्यांनी गोंधळ घालयला सुरुवात केली. पक्षात अनेक वर्षांपासून काम करुन आपल्याला डावललं आणि नवख्या कार्यकर्त्यांना त्यांची क्षमता नसताना संधी दिल्यानं त्यांनी रोष व्यक्त केला. काही वेळात काही पुरुष इच्छुक कार्यकर्त्यांनी तिथं गोंधळ घालायला सुरुवात केली. डॉ. कराड बसलेल्या दालनाचा दरवाजा पडला. त्यामुळं पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
कार्यकर्त्यांना भावना अनावर : भाजपा प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढत असताना चांगलीच झटापट झाली. त्यात अण्णा भंडारी या कार्यकर्त्यांनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी कार्यकर्त्या संध्या कापसे यांच्यासह माजी महापौर लता दलाल भावनिक झाल्या होत्या. त्यांना आपली व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले होते. पक्षाचे दोन्ही नेते मागच्या दरवाजानं निघून गेले, मात्र गोंधळ सुरूच होता.

आता थेट लढत होणार : "युती व्हावी यासाठी आम्ही वारंवार बैठक घेण्याचा प्रयत्न केला. बैठकीत युतीबाबत सर्व ठरलं. मात्र आलेला प्रस्ताव शिवसेनेत संभ्रम निर्माण करणारा होता. बैठकीत जे ठरलं ते बदललं. आमची ताकद वाढल्याचं दिसल्यामुळं त्यांनी युती तोडली. त्यांच्याकडून संदेश आले नाहीत. त्यांनी त्यांच्या उमेदवारांना अर्ज भरायला सांगितलं. त्यांच्या हट्टापायी आणि अहंकारामुळं युती तुटली. ही युती कशी तुटेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी विश्वास घात केला असं मी म्हणणार नाही, मात्र त्यांनी युती तोडली. आता त्यांनी वार केला तर उत्तर देऊ. चिखलफेक होणार नाही याची काळजी घेऊ, आमच्या विश्वासाला तडा गेला आता थेट लढत होणार," अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

घरातील लोकांना सामावून घेण्यासाठी युती तोडली : अंतर्गत वाद काल समोर आला. युतीचा फटका दोघांना बसला. त्यांनी त्यांच्या उमेदवारांना बी फॉर्म दिलेत. आम्ही अद्याप उमेदवार निश्चित केलेले नाही. आता तातडीनं काम करत आहोत. रोज एक एक वॉर्ड वाढवत असले तर काय करणार. त्यांनी सांगितलेले बदल केले. घरातील लोकांना सामावून घेण्यासाठी त्यांनी युती तोडली. आम्ही विकासावर लढणार आहोत. रोजगार उद्योग यांच्यावर बोलणार. त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं. त्यांनी 37 आकडा दिला. मात्र त्यांनी जागा वाढवल्यामुळं युती तुटली, युती त्यांनी तोडली," असा आरोप भाजपा नेते, मंत्री अतुल सावे यांनी केला.
शिवसेनेत ताळमेळ नाही : "28 डिसेंबरला युतीबाबत तोडगा निघाला होता. मात्र त्यानंतर शिवसेनेनं प्रतिसाद दिला नाही. आम्ही घेतलेल्या 50 ठिकाणी उमेदवार तयार होते. मात्र अचानक त्यांनी युती तोडली. आता आमच्यावर सर्व ठिकाणी उमेदवार देण्याची वेळ आली. शिवसेनेनं प्रत्येक वेळी प्रस्ताव बदलला. त्यांचे नेते वेगवेगळे प्रस्ताव देत होते. त्यांनी एकत्र प्रस्ताव दिला असता तर इतक्या बैठका घेण्याची वेळ आली नसती. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ मतदार होऊ देणार नाहीत," अशी प्रतिक्रिया माजी मंत्री खासदार डॉ भागवत कराड यांनी दिली.
हेही वाचा :

