ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवलीत युतीचे २० उमेदवार बिनविरोध, पुण्यात भाजपानं विजयाचं खातं उघडलं, लोकशाही संपली म्हणत मनसेची टीका

राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये बिनविरोध निवडीत भाजपानं बाजी मारली आहे. त्यानंतर शिवसेनेनंही नंबर लावलाय.

BJP Shiv Sena unopposed win
भाजपाच्या बिनविरोध विजयी उमेदवारांचा सत्कार करताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पुण्यातील नेते (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 2, 2026 at 7:18 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे/पुणे - राज्यात महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत गुरूवार, शुक्रवार अशी दिवस-रात्र अथक मेहनत घेऊन भाजपा, शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युतीचे एकूण २० उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात बाजी मारली. यामध्ये भाजपानं १४, शिवसेना पक्षानं सहा उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत. पुण्यातही भाजपानं खातं उघडलं असून, तिथे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडीवरून मनसेचे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी महायुतीवर टीका केली. "महाराष्ट्रातील आणि देशातील लोकशाही संपलेली आहे. लढाईच्या अगोदर निवडणुका जिंकायच्या असेल तर निवडणुका घेता कशाला? सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांनी तिकिटं वाटून घ्या, आम्ही ते मान्य करू," असा टोला त्यांनी लगावला.

भाजपानं मारली बाजी - उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाच्या कचोरे भागातील उमेदवार माजी नगरसेविका रेखा चौधरी यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने बिनविरोध निवडून आल्या. त्या पाठोपाठ भाजपाच्या रामनगर प्रभागातील आसावरी नवरे बिनविरोध निवडून आणण्यात भाजपानं बाजी मारली. भाजपा उमेदवारांविरूद्ध बहुतांशी ठिकाणी शिवसेना - उबाठा, मनसे, काही अपक्षांनी उमेदवारी अर्ज भरले होते. या सर्वांना थंड करण्याची मोठी मोहीम गुरूवारपासून भाजपा, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुरू केली. त्यामुळं निवडणुकीत आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा समोरून राजकीय मंडळी आपल्याला एवढी भरभरून प्रेमाने माघार घेण्यास सांगतात. त्याला पाघळून आपल्या पक्षाची, आपली प्रभागातील ताकद, आपली शहरातील प्रतिमा याचा कोणताही विचार न करता अपक्ष, इतर पक्षांतील उमेदवारांनी भाजपा, शिवसेनेच्या गळाला लागून धडाधड युतीच्या उमेदवारांविरोधातील उमेदवाऱ्या मागे घेतल्या. मागील दोन दिवसात आपले उमेदवार बिनविरोध करण्याची मोठी स्पर्धाच भाजपा, शिवसेना पक्षात लागली होती.

शिवसेनेच्या कमी जागा बिनविरोध - या चढाओढीत भाजपानं महिला, पुरूष असे एकूण १४ उमेदवार बिनविरोध निवडून आणले. शिवसेनेने कल्याण, डोंबिवलीतून एकूण सहा उमेदवार बिनविरोध निवडून आणले. पालिकेत आपणच मोठा भाऊ म्हणून शिवसेनेने जागा वाटपात एकूण ६८ जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. त्यामुळे भाजपापेक्षा आपल्या जागा बिनविरोध अधिक निवडीत असाव्यात, असं शिवसेनेचं गणित होतं, ते फार साध्य झालं नाही. भाजपानं या चढाओढीत बाजी मारली. कल्याण पश्चिमेत भाजपा, शिवसेनेच्या उमेदवारांविरूद्ध पक्षातील काही इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोन्हीकडील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना दंडशक्तीचा वापर करून उमेदवारी अर्ज माघार घेण्यास दबाव टाकला. त्यांनी पदाधिकाऱ्यांना दाद दिली नसल्याचे समजते.

भाजपाचे १४ बिनविरोध उमेदवार - आसावरी नवरे (प्रभाग क्रमांक. २६ क), रंजना पेणकर (प्रभाग क्र. २६ ब), रेखा चौधरी (प्रभाग क्र. १८ अ), मंदा पाटील (प्रभाग क्र. २७ अ), विशु पेडणेकर (प्रभाग क्र. २६ अ), साई शेलार (प्रभाग क्र. १९ क), महेश पाटील (प्रभाग क्र. २७ ड), दीपेश म्हात्रे (प्रभाग क्र. २३ अ), हर्षदा भोईर (प्रभाग क्र. २३ क), जयेश म्हात्रे (प्रभाग क्र. २३ ड), डॉ. सुनिता पाटील (प्रभाग क्र. १९ ब), पूजा म्हात्रे (प्रभाग क्र. १९ अ), रविना माळी (प्रभाग क्र. ३० अ). ज्योती पाटील (प्रभाग क्र. २४ ब) हे उमेदवार डोंबिवलीतील प्रभागांमधून विजयी झाले आहेत.

शिवसेनेचे सहा बिनविरोध - डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २४ मधून विश्वनाथ राणे, रमेश सुकऱ्या म्हात्रे, वृषाली जोशी, पूर्व भागातून प्रभाग क्रमांक २८(अ) मधून हर्षल मोरे, कल्याण पूर्वेत प्रभाग क्रमांक ११ (अ) मधून रेश्मा किरण निचळ, डोंबिवली २८(ब) प्रभागातून ज्योती राजन मराठे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. एकुण ९ ठिकाणी युतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं दिसून येत आहे.

मनसेची सरकारवर टीका - मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांची माघार मनसेच्या जिव्हारी लागली. यावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार टीका केली. "अशी निवडणूक भारताच्या इतिहासात कधी झाली नाही. नागपूर, ठाणे, कल्याण- डोंबिवली या ठिकाणी या गोष्टी झाल्या. या लोकांनी एक पॅटर्न ठेवला आहे की, लोकांना ऑफर देणे आणि जागा निवडून आणणे. कमजोर माणसांना यांनी पकडलं आणि त्यांच्याकडून या गोष्टी करून घेतल्या," असा आरोप त्यांनी केलाय.

पुण्यात भाजपानं खातं उघडलं - निवडणूक सुरू होण्यापूर्वीच पुण्यात भाजपानं खातं उघडलं असून, प्रभाग क्रमांक ३५ मधून भाजपाच्या मंजुषा नागपूरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिक बाग येथून भाजपाच्या उमेदवार मंजुषा नागपूरे आणि श्रीकांत जगताप बिनविरोध निवडून आले. त्यांचा सत्कार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते करण्यात आला.

हेही वाचा -

  1. शाहरुख खानची भूमिका देशविरोधी, बांगलादेशच्या मुस्तफिजूर रहमानला केकेआरमध्ये घेतल्यानं स्वामी रामभद्राचार्य संतापले
  2. 'मी चुकलो, माझ्यावर लागलेला कलंक मिटवण्यासाठी...'; गुंड बापू उर्फ कुमार नायर Exclusive ऑन 'ईटीव्ही भारत'
  3. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून पदाचा गैरवापर करत उमेदवारांना धमकावल्याच्या आरोपांची चौकशी सुरू