विदर्भ, मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी; आमदार आशिष देशमुख मुख्यमंत्र्यांना भेटणार
शेतीला दिलासा देण्यासाठी विदर्भ-मराठवाड्यात तातडीनं कृत्रिम पाऊस (क्लाउड सीडिंग) पाडण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार आशिष देशमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

Published : September 2, 2026 at 5:48 PM IST
नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यात यंदा पावसानं दगा दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. महिना-महिनाभराचा पावसाचा खंड, कमी पर्जन्यमान आणि पिकांना आवश्यक असलेल्या पावसाचा अभाव यामुळे शेती पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे खरीप पिकांना पावसाची गरज असतानाच, दुसरीकडे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जातेय. अशा या परिस्थितीमध्ये आता कृत्रिम पाऊस पाडण्याची म्हणजेच ‘क्लाउड सीडिंग’ची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा मुद्दा मांडणार असल्याचं सांगितलं आहे.
विदर्भातील भंडारा आणि गोंदिया वगळता संपूर्ण मराठवाडा तहानलेला आहे. अनेक जिल्ह्यांत 60 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालाय. नागपूरबाबत बोलायचं झालं, तर ऑगस्ट महिन्यात 71 टक्क्यांची तूट आहे. अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत परिस्थिती बिकट आहे. जर राज्य सरकारनं हा कृत्रिम पावसाचा प्रयोग केला, तर शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल, असं आमदार आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.
विदर्भात ऑगस्ट महिन्यात 58 टक्यांची तूट
विदर्भावर पावसाचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात संपूर्ण विदर्भात अपेक्षेच्या तुलनेत 58 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे शेतीसह जलसाठ्यांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात संपूर्ण विदर्भात 297 मिलिमीटर (मिमी) पाऊस अपेक्षित होता; मात्र केवळ 125 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. म्हणजेच ऑगस्ट महिन्यात विदर्भातील पावसाची तूट 58 टक्के राहिली आहे.
पावसाच्या तुटीचा सर्वाधिक फटका अकोल्याला बसला आहे. अकोल्यात ऑगस्ट महिन्यात ही तूट तब्बल 84 टक्के आहे. अमरावतीमध्येही 82 टक्के तूट आहे. यवतमाळमध्ये 78 टक्के, वर्ध्यात 73 टक्के, नागपुरात 71 टक्के, तर वाशीममध्येही 71 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आलीय.
जून ते ऑगस्ट 22 टक्के पावसाची तूट
ऑगस्ट महिन्यातील स्थिती अत्यंत चिंताजनक असतानाच, 1 जूनपासून ऑगस्टअखेरपर्यंतचा एकूण पावसाचा टक्काही दिलासा देणारा नाही. या कालावधीत संपूर्ण विदर्भात सामान्यतः 781 मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता; मात्र प्रत्यक्षात केवळ 607 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जून ते ऑगस्टपर्यंत विदर्भात पावसाची एकूण तूट सुमारे 22 टक्के आहे. विशेष म्हणजे जून आणि जुलैमध्ये काही भागांत झालेल्या पावसानंतर, ऑगस्टमध्ये पावसानं अचानक दडी मारल्याचं चित्र आहे. त्यामुळे पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या विदर्भातील शेतीसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
कृत्रिम पाऊस म्हणजे नेमकं काय?
कृत्रिम पाऊस म्हणजे आकाशात ढग नसताना पाऊस निर्माण करणं, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, प्रत्यक्षात तसं होत नाही. 'क्लाउड सीडिंग' (Cloud Seeding) अर्थात ढगांच्या बीजारोपणाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, आधीपासून अस्तित्वात असलेल्या विशिष्ट ढगांमध्ये काही पदार्थांचं सूक्ष्म कण सोडून पर्जन्यनिर्मितीची प्रक्रिया वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. ढगांमध्ये पुरेसा ओलावा, योग्य तापमान आणि पर्जन्यनिर्मितीसाठी अनुकूल वातावरण असल्यास, या प्रक्रियेमुळे ढगांमधील पाण्याचे सूक्ष्म थेंब किंवा बर्फकण मोठे होण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर योग्य परिस्थितीत त्याचे पावसाच्या थेंबांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असते.
ढग नसतील तर कृत्रिम पाऊस शक्य नाही
'क्लाउड सीडिंग'ची सर्वात महत्त्वाची अट म्हणजे योग्य प्रकारचे ढग उपलब्ध असणे ही होय. आकाश निरभ्र असेल, वातावरणात पुरेशी आर्द्रता नसेल किंवा पर्जन्यनिर्मितीसाठी आवश्यक ढगांची रचना नसेल, तर 'क्लाउड सीडिंग' करून पाऊस पाडता येत नाही. त्यामुळे कृत्रिम पाऊस हा नैसर्गिक पावसाचा पर्याय नसून, योग्य वातावरणीय परिस्थितीत उपलब्ध ढगांमधून पर्जन्यवृष्टी वाढवण्याचा एक प्रयत्न आहे.
हेही वाचा -

