'तीन मतं भाजपाला, एक मत कुठं द्यायचं ते माहीत आहे ना !'; भाजपाच्या सभेत नवनीत राणांकडून पतीच्या पक्षाचा अप्रत्यक्ष प्रचार
भाजपा नेत्या नवनीत राणा या प्रचार सभेत अप्रत्यक्ष पती रवी राणा यांच्या पक्षाचा प्रचार करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Published : January 7, 2026 at 7:16 PM IST
|Updated : January 7, 2026 at 8:15 PM IST
अमरावती : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या व्यासपीठावरूनच युवा स्वाभिमान पक्षाचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा या अधिकृतपणे भाजपासाठी प्रचार करत असतानाच पती रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांसाठी सूचक शब्दात मतांची मागणी करत असल्यानं हा प्रकार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. 'तीन मतं भाजपाला, एक मत कुठं द्यायचं ते माहीत आहे ना !' असा सवाल त्या मतदारांना करत आहेत.
अमरावती महानगरपालिकेत 87 जागांसाठी 661 उमेदवार : अमरावती महानगरपालिकेच्या 22 प्रभागांतील 87 जागांसाठी तब्बल 661 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत होत असताना, भाजपा आणि युवा स्वाभिमान पक्षात मैत्रीपूर्ण लढत सुरू असल्याचं चित्र शहरात पाहायला मिळत आहे. अंतिम टप्प्यापर्यंत भाजपा, युवा स्वाभिमान आणि शिवसेना यांची युती न झाल्यानं तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. या राजकीय परिस्थितीमुळे भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यासमोर प्रचाराचा मोठा पेच निर्माण झाला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर नवनीत राणांचा भाजपा प्रवेश : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचं तिकीट मिळवलं, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपा आणि युवा स्वाभिमान पक्ष यांची युती झाली नाही. त्यामुळे नवनीत राणा यांना थेट आपल्या पतीच्या पक्षासाठी प्रचार करता येत नाही.
नवनीत राणांकडून अप्रत्यक्षपणे पतीच्या पक्षाचा प्रचार : भाजपाच्या प्रचारसभांमधून नवनीत राणा या अप्रत्यक्षपणे युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट होत आहे. मंगळवारी विलासनगर मुरबाग इथं प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी सभेला संबोधित करताना त्यांनी,“तीन मतं भाजपाला द्या आणि एक मत कुठं द्यायचं हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही समजदार आहात,”असं वक्तव्य केलं. त्यांच्या या विधानातून मतदारांना युवा स्वाभिमान पक्षाला मत देण्याचा सूचक संदेश देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सर्वाधिक 85 उमेदवार उभे केले. शिवसेनेनं आपल्या पक्षाच्या चिन्हावर 68 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ‘तुतारी’ या चिन्हावर 14 जागांवर लढत होत आहे. तर 11 जागांवर मित्रपक्ष निवडणूक लढवत आहेत. एमआयएमदेखील काही जागांवर निवडणूक लढवत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड फ्रंट यांनी मिळून 55 जागांवर उमेदवार दिले आहेत.
दिग्गज नेत्यांच्या सभा, रोड शो : सर्वच पक्षांकडून दिग्गज नेत्यांच्या सभा, रोड शो आणि प्रचाराचं मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात येत आहे. मात्र या सगळ्या राजकीय गदारोळात भाजपाच्या नेत्या म्हणून असलेली जबाबदारी आणि पतीच्या पक्षाशी असलेली राजकीय बांधिलकी यांचा समतोल साधताना नवनीत राणा यांची भूमिका हीच या महापालिका निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची बाब ठरत आहे.
हेही वाचा :

