ETV Bharat / state

'हर्षवर्धन सपकाळ यांना तर काँग्रेसचे कार्यकर्तेही ओळखत नाहीत', भाजपाचं काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर टीका केली होती. आता भाजपानंही सपकाळ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Harshvardhan Sapkal
हर्षवर्धन सपकाळ (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 23, 2025 at 1:21 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी भाजपावर जोरदार टीका केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपानं आपले जुनेजाणते आणि वर्षानुवर्ष मेहनत करणारे कार्यकर्ते बाजूला ठेवून नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे, असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला होता. आता यावर भाजपानंही सपकाळ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सपकाळ यांना काँग्रेसचेच कार्यकर्ते ओळखत नाहीत, अशा शब्दांत टीका केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले होते? : काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी भाजपावर टीका करताना म्हटलं होतं की, “जी भाजपा नेहमी काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करते, तीच भाजपा आता स्वतः घराणेशाहीत अडकली आहे.” त्याचबरोबर झुंडशाही आणि मारहाणीच्या घटनांवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर थेट आरोप करताना म्हटलं होतं की, “काही ठिकाणी मॉब-लिंचिंग करणारे, गुंड प्रवृत्तीचे लोक आणि कोयता गँगशी संबंधित असणाऱ्यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे.” “जेवढा अहंकार रावणालाही नव्हता, तेवढा प्रचंड अहंकार आज भाजपा दाखवत आहे,” अशा शब्दांत सपकाळ यांनी भाजपावर प्रहार केला होता.

नवनाथ बन (ETV Bharat)

भाजपाकडून इतर पक्षाच्या उमेदवारांवर दबाव टाकला जातोय : तसेच विकासाच्या नावाखाली मोठा आर्थिक आणि राजकीय स्वार्थ जपला जात आहे. सोबतच भाजपा नेत्यांकडून इतर पक्षाच्या स्थानिक उमेदवारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला होता. भाजपा नेत्यांच्या घरातील नातेवाईक उमेदवारी अर्ज भरत आहेत, तर जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही. हे लोकशाहीचं नुकसान करणारं आहे, असं मतही सपकाळांनी व्यक्त केलंय.

नवनाथ बन यांच्याकडून प्रत्युत्तर : दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांच्या या आरोपांना भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “हर्षवर्धन सपकाळ यांना तर काँग्रेसचे कार्यकर्तेही ओळखत नाहीत. भाजपाच्या उमेदवारांवर बोट ठेवण्यापेक्षा त्यांनी प्रथम आपल्या पक्षाची काळजी करावी,” असा सल्ला बन यांनी दिला.

भाजपानं कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली : तसेच भाजपा नेत्यांच्या नातेवाईकांनाच तिकीट देत असल्याच्या आरोपांचं खंडन केलं. बन म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचं प्रमाण फक्त 5 टक्के आहे. भाजपाचे संपूर्ण 95 टक्के उमेदवार हे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत, असा खुलासा त्यांनी केला आहे. घराणेशाही म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या नेत्यांचं त्यांनी उदाहरण दिलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यादेखील घराणेशाहीचं उदाहरण असल्याची टीका त्यांनी केलीय.

हेही वाचा