ETV Bharat / state

चूक झाली माफ करा, मात्र भाजपासोबतच राहा; चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराज कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मागितली माफी

अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्यांना महापालिका निवडणुकीची उमेदवारी मिळू शकली नाही, अशा कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे.

Chandrashekhar Bawankule apologized party workers
चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांची माफी मागितली (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 3, 2026 at 12:56 PM IST

4 Min Read
Choose ETV Bharat

अमरावती : यंदाच्या महापालिका निवडणुकीत ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळू शकली नाही, अशांची भाजपा नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागतली आहे. 'ब्लंडर मिस्टेक झाली, खरंच चुकलं. या चुकीसाठी माफ करा. तुम्ही आपले आहात आमचं खरंच चुकलय" अशा शब्दांत बावनकुळे यांनी नाराज कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन माफी मागितली.

खरं तर, उमेदवारी न मिळाल्यानं दुखावलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन बावनकुळेंनी माफी मागितली. अमरावती शहरातील प्रसिद्ध वकील प्रशांत देशपांडे यांच्या घरी जाऊन झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप होतोय, खरंच आमचं चुकलंच अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हात जोडून माफी मागितली. अमरावती महापालिका निवडणुकीत तुम्ही सारे भाजपाला मजबूत करा. सकारात्मक दृष्टी ठेवून मैदानात उतरा, अशी विनंती देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांची माफी मागितली (ETV Bharat)

कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना : अमरावती महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना सपशेल नाकारण्यात आलं. यामुळं पक्षाविरोधात अमरावती शहरात नकारात्मक सूर उमटतोय. अशा परिस्थित नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (2 जानेवारी) अनेक कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. शहरातील आंबा पेठ प्रभागातून अ‍ॅड. प्रशांत देशपांडे हे उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अनेक आश्वासनंदेखील दिली होती. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. देशपांडे यांच्याप्रमाणेच अनेक कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना सध्या भाजपात आहे.

अशा स्थितीत शुक्रवारी रात्री 10 वाजता बावनकुळे प्रशांत देशपांडे यांच्या घरी पोहोचले. यावेळी देशपांडे यांच्यासह शेकडो समर्थकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे तीव्र भावना व्यक्त केल्या.

पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप : अमरावती महापालिका निवडणुकीत ज्यांना उमेदवारी निश्चितीची जबाबदारी देण्यात आली होती, अशा समितीच्या प्रमुखांनी शहरात अनेकांकडून पैसे घेऊन त्यांना उमेदवारी दिली, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. ज्या व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला अशांना भाजपाची उमेदवारी देण्यात आली. असं दुःख देखील भाजपा कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर व्यक्त केलं.

ज्यांनी निवडणूक लढवली नाही त्यांनी ठरवले उमेदवार : अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपाचे उमेदवार कोण असावेत? हे निवडण्याची जबाबदारी ज्यांना देण्यात आली, त्यापैकी एकाही व्यक्तीनं कधी कोणतीही निवडणूक लढली नाही. असं असताना या मंडळींनी मनमानी कारभार करत पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून पक्षाबाहेरच्यांना उमेदवारी दिली. यासाठी मोठा आर्थिक व्यवहार देखील झाला. काही जणांकडून रोख रक्कम तर काही जणांकडून धनादेश स्वरूपात पैसे घेण्याचा उद्योग झाला, असा संतापदेखील बावनकुळे यांच्यापुढे व्यक्त करण्यात आला.

शिवराय कुलकर्णी, दिनेश सूर्यवंशी आणि जयंत डेहनकर यांनी मनमानी कारभार करून पक्ष कार्यकर्त्यांना दुखावलं. विशेष म्हणजे, उमेदवार निश्चित करणाऱ्या समितीमध्ये असणारे प्रा. रवींद्र खांडेकर आणि किरण पातुरकर यांना डावलून या तिघांनी मनमानी कारभार केला, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.

बावनकुळेंनी देशपांडे यांना दिली स्वीकृत सदस्याची ऑफर : यावेळी बावनकुळे यांनी अ‍ॅड. देशपांडे यांच्या घरी पोहोचल्यावर सर्वात आधी तुम्हाला महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून आम्ही घेणार आहोत. केवळ एका प्रभागापुरता नव्हे तर संपूर्ण शहरासाठी तुम्ही विकासात्मक दृष्ट्या विचार करावा, अशी पक्षाची इच्छा आहे, असं बावनकुळे म्हणाले.

पण देशपांडेंनी ही ऑफर नाकारली. त्यांनी आपल्या वेदना बोलून दाखवत सांगितलं की, "मला उमेदवारी निश्चित मिळणार असं पक्षाच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं. इतकंच नव्हे तर तुमचा फार्म आम्ही घरी आणून देऊ असं सांगितलं. असं असताना ऐन वेळेवर मला फार्म घेण्याकरिता शहर अध्यक्षांच्या घरी बोलावलं. गंभीर बाब म्हणजे, मला बोलावून देखील उमेदवारी दिली नाही. हे फार मोठं दुःख आहे".

शिवराय कुलकर्णी यांनी आपल्या नातेवाईकांचा विचार केला. दिनेश सूर्यवंशी, जयंत डेहनकर यांनी विश्वासघात केला. आज संपूर्ण शहरात मला उमेदवारी दिली नसल्याची चर्चा होत आहे. एक वकील म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांवर असणाऱ्या राजकीय गुन्ह्यांचे खटले एक पैसाही न घेता न्यायालयात लढलो. मात्र, आज तीच मंडळी अशी वागली. हे बरं नाही, अशा वेदना देशपांडेंनी बोलून दाखवल्या. मला स्वीकृत सदस्य व्हायचं नाही. रीतसर मार्गानं मला निवडणूक लढायची होती. मात्र माझ्यावर अन्याय झाला माझ्यासारख्या अनेकांवर अन्याय करण्यात आला, असंही प्रशांत देशपांडे म्हणाले.

'गंगासावित्री'वर कसा काय गेला? : एकीकडे मला उमेदवारी निश्चित मिळेल, असं आश्वासन देण्यात आलं. मात्र, दुसरीकडे 'तू गंगा सावित्री' वर कसा काय गेला? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर पालकमंत्र्यांनी 'गंगासावित्री' म्हणजे काय? असा प्रतिप्रश्न केला. यावर उपस्थित सगळ्यांनीच 'गंगा सावित्री' हे रवी राणा यांच्या घराचं नाव असल्याचं पालकमंत्र्यांना सांगितलं. नवनीत राणा या भाजपाच्या नेत्या आहेत. त्यांच्या घरी गेलो तर काय चूक? असा प्रश्न देशपांडेंनी केला. लोकसभा निवडणुकीत देखील पक्षात अनेक गट पडले आणि यामुळं पक्षाचा उमेदवार पराभूत झाला, असं यावेळी उपस्थित माजी नगरसेवक मनीष जोशी यांनी म्हटलं. आपल्या पक्षाचं असंच धोरण राहिलं तर महापालिका निवडणुकीत देखील आपलं काही खरं नाही असं मनीष जोशी म्हणाले.

पालकमंत्र्यांनी शहराध्यक्षांना खडसावलं : यानंतर बावनकुळेंनी देशपांडेंची उमेदवारी कशी काय कापली? असा प्रश्न पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांना केला. या प्रश्नावर डॉ. धांडे निरुत्तर राहिल्यानं पालकमंत्र्यांनी धांडेंना तुम्हाला तुमचे अधिकार वापरता आले नाहीत का? बाकी मंडळी त्यांच्या मनमर्जीनं काम करत असताना तुम्ही गप्प का राहिलात? असा सवाल करीत पालकमंत्र्यांनी शहराध्यक्षांना खडसावलं.

पालकमंत्र्यांनी वारंवार मागितली माफी : माझी खरोखर चूक झाली. मला माफ करा, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी तासाभराच्या बैठकीदरम्यान वारंवार देशपांडे यांची माफी मागितली. विशेष म्हणजे, प्रशांत देशपांडे यांच्या आई आणि 1997 मध्ये अमरावतीच्या महापौर असणाऱ्या विद्या देशपांडे यांची सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली. तुम्ही सगळे आपले आहात, सगळेजण पक्षासोबत राहा अशी विनंती देखील बावनकुळे यावेळी केली.

'त्या तिघांचाही नंबर द्या' : तासाभराच्या गंभीर चर्चेदरम्यान दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुलकर्णी आणि जयंत डेहनकर यांच्या बद्दल उमटलेली तीव्र भावना आणि पैसे घेऊन उमेदवारी दिल्याबाबत झालेले आरोप यामुळं चंद्रशेखर बावनकुळे प्रचंड नाराज झाले. पालकमंत्र्यांनी शहराध्यक्ष नितीन धांडे यांना त्या तिघांचेही नंबर मला तत्काळ द्या. तिघांनाही सांगतो असं म्हटलं.

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोमध्ये सहभागी होण्याची विनंती : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (4 जानेवारी) अमरावती शहरात रोड शो करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या रोडशोमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, अशी विनंती पालकमंत्र्यांनी यावेळी केली. विशेष म्हणजे देशपांडे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुल्या जीपमध्ये सोबत घ्या, असा आदेश पालकमंत्र्यांनी शहराध्यक्ष डॉ.नितीन धांडे यांना दिला.

हेही वाचा