नवी मुंबईत भाजपानं उधळला गुलाल; पनवेल महापालिकेत भाजपाचे 6 उमेदवार बिनविरोध
पनवेल महापालिकेत भाजपाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं महाविकास आघाडीला मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.


Published : January 2, 2026 at 10:02 PM IST
नवी मुंबई : पनवेल महापालिकेत एक दोन नव्हे, तर तब्बल 6 भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे भाजपानं पनवेल महापालिकेत निकालाआधीच आपल्या विजयाचा गुलाल उधळला आहे. 6 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं भाजपाची ताकद वाढली आहे.

78 जागांसाठी पनवेल महापालिका निवडणूक : 78 जागांसाठी पनवेल महापालिका निवडणूक 2026 होत आहे. मात्र निवडणूक होण्याअगोदरच भाजपाचे एक दोन नव्हे, तब्बल सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. पनवेलच्या प्रभाग 18 मधून शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांना जात पडताळणीत फटका बसला. कागदपत्रांची योग्य पूर्तता न झाल्यानं शेकापचे रोहन गावंड यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली. रोहन गावंड यांचा छाननीत अर्ज बाद झाला. त्यामुळे भाजपाचे उमेदवार नितीन पाटील बिनविरोध विजयी झाले आहेत. प्रभाग 18 अ मधून ममता प्रितम म्हात्रे, प्रभाग 19 अ मधून दर्शना भगवान भोईर, प्रभाग 19(ब)मधून मुग्धा गुरुनाथ लोंढे, प्रभाग 20 (अ) मधून अजय तुकाराम बहिरा, व प्रभाग 20 (ब) मधून प्रियांका तेजस कांडपिळे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
ममता प्रितम म्हात्रे बिनविरोध : उरण मतदार संघातून शेकापच्या माध्यमातून निवडणूक लढवणारे प्रीतम म्हात्रे यांच्या पत्नी या भाजपाच्या माध्यमातून नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत. विधानसभा निवडणूक पराभूत झाल्यानंतर प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या कुटुंबीय आणि सहकाऱ्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला होता. भाजपाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं पनवेल महापालिका निवडणूक 2026 मध्ये ताकद वाढली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला हा सगळ्यात मोठा झटका असल्याची चर्चा सध्या पनवेलमध्ये करण्यात येत आहे.
हेही वाचा :
- 'भाजपा नेत्यांनी दारू पिऊन वाटली उमेदवारी'; निरीक्षक संजय कुटे, चंद्रशेखर बावनकुळेंविरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप
- अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे भाजपात; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती प्रवेश
- कल्याण-डोंबिवलीत युतीचे २० उमेदवार बिनविरोध, पुण्यात भाजपानं विजयाचं खातं उघडलं, लोकशाही संपली म्हणत मनसेची टीका

