ETV Bharat / state

भाजपा आणि राणांच्या युतीत वितुष्ट, अमरावतीमधील वडाळी प्रभागात तुटली युती

अमरावतीमधील एका प्रभागावरुन सध्या भाजपा आणि आमदार रवी राणा यांच्यात वादंग सुरू आहे. वाचा सविस्तर बातमी...

amravati bjp ravi rana yuti
अमरावतीमधील प्रचार सभेत भाजपाचे उमेदवार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 11, 2026 at 7:53 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अमरावती - अवघ्या चार दिवसांवर महापालिका निवडणूक आली असताना अमरावती महापालिकेच्या एसआरपीएफ वडाळी या प्रभाग क्रमांक नऊमध्ये भाजपा आणि रवी राणा यांच्या युवा स्वभिमान पक्षाची युती तुटलीय. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रभागात भाजपाच्या एका उमेदवारासह दोन अपक्ष उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.

युवा स्वाभिमान पक्षानं भाजपाशी केला दगा - अमरावती शहरात भाजपा आणि युवा स्वाभिमान यांच्यात युती आहे. या युती धर्मानुसार, शहरात एकमेव तीन सदस्यांचा प्रभाग असणाऱ्या वडाळी प्रभागात भाजपाच्य वतीनं अनुसूचित जमाती प्रवर्गात पक्षाच्या माजी नगरसेवक पंचफुला चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. युवा स्वाभिमानच्या वतीनं गत वेळी प्रभागात निवडून आलेले सर्वसाधारण महिला गटातील सपना ठाकूर आणि अनुसूचित जाती प्रवर्गात आशिष गावंडे यांना उमेदवारी मिळाली. असं असताना आमदार रवी राणा यांनी वडाळी प्रभागात अनुसूचित जमाती प्रवर्गात अर्चना चव्हाण यांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे, युती असताना भाजपाच्या उमेदवाराला डावलून आमदार राणा यांचे उमेदवार जोमात प्रचाराला लागले.

दरम्यान, वडाळी प्रभागातून उमेदवारी मिळाली नसल्याने भाजपाच्या गौरी सर्वरे आणि अनिल सोनटक्के यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. विशेष म्हणजे, वडाळी प्रभागात राणांनी दगा दिल्यामुळं भाजपाच्या अधिकृत उमेदवार पंचफुला चव्हाण यांनी गौरी सर्वरे आणि अनिल सोनटक्के यांना सोबत घेऊन प्रचाराला सुरुवात केली.

पालकमंत्र्यांनी अधिकृतपणे जाहीर केला पाठिंबा - अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी वडाळी प्रभागात माचिस या चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या गौरी सर्वरे आणि सफरचंद चिन्हावर निवडणूक लढणारे अनिल सोनटक्के यांना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. हे भाजपाचेच कार्यकर्ते असून, आता भाजपाच्या उमेदवारासोबत यांना देखील विजयी करा, असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.

तीन जणांची केली युती - "खरंतर युतीसंदर्भात कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार हा आमच्या पक्षाचे निरीक्षक आमदार संजय कुटे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आहे. वडाळी प्रभागात भाजपा आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती असताना युवा स्वाभिमान पक्षानं आमच्याच पक्षाच्या पंचफुला चव्हाण यांच्या विरोधात उमेदवार दिला. यामुळं आमच्याच पक्षाचे असणारे मात्र अपक्ष निवडणूक लढणारे गौरी सर्वरे आणि अनिल सोनटक्के यांना पालकमंत्र्यांनी पाठिंबा जाहीर केला, असं भाजपाचे माजी शहर अध्यक्ष किरण पातुरकर यांनी स्पष्ट केलंय. आता वडाळी प्रभागात आमच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह एकूण तिघांची युती आहे, असं किरण पातुरकर म्हणाले.

आता आमदार राणाच घेतील निर्णय - "वडाळी प्रभागात नेमकं काय झालंय यासंदर्भात आम्हाला काहीही ठाऊक नाही. जर काही कुठं नाराजी झाली असेल तर त्या संदर्भात आमचे नेते आमदार रवी राणा हेच योग्य निर्णय घेऊन खुलासा करतील," अशी भूमिका युवा स्वाभिमान पक्षाचे प्रदेश प्रवक्ता बाळू इंगोले यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना मांडली.

हेही वाचा -

  1. ‘तीन मतं भाजपाला, एक मत कुठं द्यायचं ते माहिती आहे ना!’; नवनीत राणांच्या वक्तव्यावर अनिल बोंडे यांची सारवासारव
  2. ऐन निवडणुकीत भाजपाची अमरावतीत मोठी कारवाई! पक्षातील 17 पदाधिकारी व सदस्य निलंबित
  3. स्वतंत्र मराठी भाषा विभाग ते बेस्टमध्ये महिलांना 50 टक्के सवलत... महायुतीकडून मुंबईकरांसाठी घोषणांची खैरात