महापालिका निवडणूक रणधुमाळी: भाजपा कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; महिलांनी सुरू केलं उपोषण
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 30 डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. छत्रपती संभाजीनगर इथं इच्छुक उमेदवारानं अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Published : December 31, 2025 at 4:10 PM IST
छत्रपती संभाजीनगर : भाजपा प्रचार कार्यालयात नाराज कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करताना दिसून येत आहेत. बुधवारी सकाळी एका कार्यकर्त्यानं चक्क अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर काही महिला कार्यकर्त्यांनी पुन्हा धिंगाणा घालत वरिष्ठ नेत्यांना जाब विचारला आहे. दरम्यान काही नाराज कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते भागवत कराड यांच्या गाडीवर काळा रंग टाकून राग व्यक्त केला. यावेळी पक्षाच्या नेत्यांनी नाराज झालेल्या कार्यकर्त्यांचे फोन उचलले पाहिजेत. समजूत काढावी, एवढी अपेक्षा असताना ते आपल्या जबाबदारीतून पळ काढत असल्याचा आरोप करण्यात आला.
कार्यकर्त्यानं अंगावर ओतून घेतलं पेट्रोल : भाजपामधील नाराज कार्यकर्त्यांचा रोष वाढत चालला आहे. मंगळवारी दिवसभर महिला कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातल्यानंतर बुधवारी देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळाली. पक्षाचा पदाधिकारी असलेल्या प्रशांत भदाणे यांची शेवटच्या काही वेळात उमेदवारी नाकारण्यात आली. सकाळी त्यांना संपर्क साधून कागदपत्रं घेऊन येण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र अचानक त्यांच्याजागी एका जुन्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं संतप्त झालेल्या भदाणे यांनी पक्षाच्या नेत्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र उत्तर मिळालं नाही. बुधवारी सकाळी पक्षाचे नेते प्रचार कार्यालयात आल्याची माहिती मिळताच भदाणे यांनी तिथे येऊन गोंधळ घातला. अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, इतर कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी त्यांना अडवलं. आमदार संजय केणेकर यांनी त्यांना तातडीने तिथून घेऊन जात समजूत काढली. मात्र, अशा पद्धतीचे रोष भाजपा पक्षात वाढताना दिसत आहेत.
काही महिलांनी सुरू केलं उपोषण : मंगळवारी उमेदवारी नाकारल्यानं दिव्या मराठे या महिलेनं प्रचार कार्यालयात चांगलाच गोंधळ घातला. काही वेळानं त्या निघून गेल्या, मात्र नंतर परत येऊन त्यांनी प्रचार कार्यालयात उभारलेल्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्या उपोषणाला गीता आचार्य आणि इतर काही महिलांनी पाठिंबा देऊन उपोषणात सहभाग घेतला. यावेळी लता सरदार या इच्छुक महिला उमेदवारानं देखील आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर प्रचार कार्यालयाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे.
हेही वाचा -

