ETV Bharat / state

'भाजपा नेत्यांनी दारू पिऊन वाटली उमेदवारी'; निरीक्षक संजय कुटे, चंद्रशेखर बावनकुळेंविरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप

अमरावती महापालिका निवडणूक 2026 मध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा चांगलाच राडा सुरू आहे. अमरावतीचे निरीक्षक संजय कुटे यांनी दारू पिऊन उमेदवारी वाटल्याचा आरोप कार्यकर्यांनी केला.

Amravati Corporation Election 2026
आक्रमक झालेले भाजपा कार्यकर्ते आणि महंत (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 2, 2026 at 7:40 PM IST

|

Updated : January 2, 2026 at 7:52 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अमरावती : महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भारतीय जनता पार्टीत मोठा असंतोष उफाळून आलाय. भाजपाचे माजी मंत्री तथा जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे हे अमरावती शहराचे निरीक्षक असून त्यांनी दारूच्या नशेत उमेदवारी वाटप केल्याचा गंभीर आरोप नाराज कार्यकर्त्यांनी केला. संजय कुटे यांच्यासह अमरावती शहरातील निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांनी तीव्र रोष व्यक्त केला. आक्रमक कार्यकर्त्यांचा संताप पाहून भाजपाचे अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आपला दौरा बदलावा लागला आहे.

Amravati Corporation Election 2026
आक्रमक झालेले भाजपा कार्यकर्ते आणि महंत (ETV Bharat Reporter)

उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते आक्रमक : अमरावती महापालिका निवडणुकीत पक्षासोबत एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून बुधवारी पक्षात दाखल झालेल्या अनेकांना उमेदवारी मिळाली. याबाबत दोन दिवसांपूर्वी राजापेठ येथील महापालिकेच्या झोन कार्यालयात भाजपाचे पदाधिकारी दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुलकर्णी आणि जयंत डेहनकर यांना कार्यकर्त्यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. शिवराय कुलकर्णी यांनी श्री काली माता मंदिर संस्थानचे शक्ति महाराज यांचा अवमान केल्याचा आरोप केला जात आहे. कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळणं आणि पदाधिकाऱ्यांकडून चुकीची वागणूक दिली जात असल्याच्या निषेधार्थ आज राजकमल चौक इथं भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं.

'भाजपा नेत्यांनी दारू पिऊन वाटली उमेदवारी'; निरीक्षक संजय कुटे, चंद्रशेखर बावनकुळेंविरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप (ETV Bharat Reporter)

पालकमंत्र्यांनी बदलला दौरा : अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज सकाळी 11 वाजता श्री अंबादेवी मंदिरात दर्शनासाठी येणार होते. राजकमल चौकातून पालकमंत्र्यांचा ताफा जाणार होता. दरम्यान नाराज झालेल्या कार्यकर्ते आंदोलन करणार असल्यामुळे पालकमंत्र्यांनी श्री अंबादेवी मंदिरात जाण्याचं टाळलं. विशेष म्हणजे पालकमंत्री अमरावतीत आले आणि थेट रवी राणा यांना भेटून अकोल्याकडं निघून गेलेत. पालकमंत्री राजकमल चौकात आले नसल्यामुळं देखील कार्यकर्ते नाराज झालेत.

नाराज कार्यकर्त्यांनी व्यक्त केला रोष : "पदाधिकारी म्हणून भाजपामध्ये प्रामाणिक काम केलं. आम्हाला आमचा पक्ष प्रिय आहेच. पण स्थानिक पदाधिकारांचं वागणं योग्य नाही. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी आपल्या पत्नीला स्वतःच्या प्रभागातून उमेदवारी दिली. त्यांच्या पत्नीला आम्ही कधीही पाहिलं नाही, त्या कधी पक्ष कार्यालयात आल्या नाहीत. आम्ही आंदोलन केलं, पक्षाचं काम केलं, असं असताना आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. मात्र आपल्या घरच्या लोकांना हे पदाधिकारी उमेदवारी देतात. असे अनेक उदाहरण सध्या पाहायला मिळत आहेत," असा आरोप श्रद्धा गहलोत यांनी केला.

पैशांसाठी तोडली युती : "भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती होणार असल्यामुळे आम्हाला बरेच दिवस थांबवण्यात आलं. बैठका सुरू आहेत, चर्चा सुरू आहे, असं अखेरच्या दिवसापर्यंत सांगण्यात आलं. खरंतर पदाधिकाऱ्यांनी ज्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांना उमेदवारी देणं गरजेचं होतं. यामुळेच शिवसेनेसोबत भाजपांनं युती केली नाही. बाहेरच्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली," असा आरोप देखील श्रद्धा गहलोत यांनी केला. "बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आता काही दिवसांपूर्वी संजय कुटे हे शेतात दारू पिऊन पडलेले असतात, असा व्हिडिओ प्रसारित केला होता. अमरावती शहरात पक्षाचे निरीक्षक म्हणून जो काही जागा वाटपात घोळ केला, तो संजय कुटे यांनी दारू पिऊनच केला," असा आरोप देखील श्रद्धा गहलोत यांनी केला.

भाजपा पदाधिकाऱ्यांना गर्व आणि घमंड : "भाजपा आणि इतर पक्षात आता कुठलाही फरक राहिलेला नाही. माझ्यासारख्या साधू संतांचा अपमान केला जातोय. मीच नव्हे, तर देशभरातील कुठल्याही साधू संतांचा अपमान कार्यकर्ते सहन करणार नाहीत. आमचा भाजपावर विश्वास आहे, मात्र अमरावती शहरातील निवडणूक प्रक्रियेत जो गैरप्रकार घडला, त्या विरोधात आमचा लढा आहे," असं श्री कालीमाता देवस्थानचे शक्ति महाराज माध्यमांशी बोलताना म्हणाले. "भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गर्व आणि घमंड आता ठासून भरलाय. या निवडणुकीत अमरावतीची जनता भाजपाला जागा दाखवेल," असं देखील शक्ती महाराज म्हणाले.

हेही वाचा :

  1. उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून चक्क उमेदवारालाच डांबून ठेवलं! भाजपा आमदारांच्या मध्यस्थीला यश
  2. पुण्यातील भाजपा महिला उमेदवार सोशल मीडियाचा ठरली बळी, रडत रडत सांगितला घडलेला प्रकार
  3. महापालिका निवडणूक 2026 : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे 4 नगरसेवक बिनविरोध, भाजपानंही उघडलं विजयाचं खातं
Last Updated : January 2, 2026 at 7:52 PM IST