ETV Bharat / state

मुंबईत अखेर महायुतीचं ठरलं! भाजपा 137 तर शिवसेना घटकपक्षांसह 90 जागा लढवणार

भाजपा आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर माध्यमांशी बोलताना मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी ही माहिती दिली.

BJP 137 and Shiv Sena 90 seats In BMC
भाजपा 137 शिवसेना 90 जागा लढवणार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 30, 2025 at 7:48 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील युतीच्या जागावाटपावर अखेर निर्णय झाला आहे. सोमवारी (29 डिसेंबर) रात्री उशिरा जागावाटपाबाबतची चर्चा पूर्ण झाली. त्यानुसार भाजपा 137 जागांवर, तर शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

भाजपानं 137 जागा पदरात पाडून घेतल्याच : राज्यातील सत्ताधारी भाजपा, शिवसेना आणि आरपीआयसह महायुतीमधील जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर माध्यमांशी बोलताना भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ही माहिती दिली.

अमित साटम यांनी सांगितलं की, यापूर्वी 207 जागांवर चर्चा पूर्ण झाली होती. मात्र, आता 227 जागांवर अंतिम चर्चा झाली असून त्यानुसार भाजपा 137 जागांवर निवडणूक लढवेल, तर शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवेल. महायुतीतील मित्र पक्षांचाही समावेश याच 227 जागांमध्ये करण्यात आला आहे.

भाजपाच्या वाट्याला एकट्याच्या 137 जागा आल्या असून, शिवसेनेच्या 90 जागांमध्ये इतर मित्र पक्षांना सामावून घेतलं जाणार आहे, असंही अमित साटम यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि शिवसेनेमध्ये कोणतीही नाराजी नसून सर्वांना सामावून घेण्यासाठी वेळ लागल्याचं त्यांनी सांगितलं.

'90 जागांवर आम्ही समाधानी' : दरम्यान, 90 जागांवर आम्ही समाधानी असल्याचं शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपासोबत झालेली जागावाटपाची चर्चा सकारात्मक झाली असून योग्य फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 227 जागांवर महायुतीचे उमेदवार एकत्र निवडणूक लढवतील आणि 150 पेक्षा जास्त जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'महापौर महायुतीचाच होणार' : मुंबई महापालिकेत महायुतीचाच मराठी महापौर होणार, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचंही शेवाळे म्हणाले. महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र असून कोणताही मतभेद नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. रिपब्लिकन सेनेला किती जागा दिल्या जाणार, याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढणार' : महायुती विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं सांगत शेवाळे म्हणाले की, मुंबईकर विकासाच्या आधारे मतदान करतील, असा आम्हाला विश्वास आहे. राज्य आणि केंद्रात महायुतीची सत्ता असल्यानं, मुंबईतही महायुतीची सत्ता आल्यासच शहराचा योग्य विकास होऊ शकतो, असा विश्वास मुंबईकरांना असल्याचंही शेवाळींनी नमूद केलं.

ठाण्यात एकनाथ शिंदेच मोठा भाऊ : ठाण्यातही भाजपा आणि एकनाथ शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असून, येथील जागावाटपात शिवसेना 87 तर भाजप 40 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना भाजपा आणि शिवसेनेतील जागावाटप अखेर निश्चित झालं आहे.

हेही वाचा