ETV Bharat / state

बायोगॅसमुळे गॅस सिलेंडरला कायमचा रामराम; अंबाजोगाईच्या शेतकरी कुटुंबाची यशोगाथा

देवळा येथील देवरवाडे कुटुंबानं सुमारे 6 वर्षांपूर्वी राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजने अंतर्गत आपल्या शेतात बायोगॅस प्रकल्प उभारला.

Biogas Project
बायोगॅसमुळे गॅस सिलेंडरला कायमचा रामराम (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 7, 2026 at 3:52 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

बीड : घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती, महागाई आणि इंधनाच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील एका प्रगतशील शेतकरी कुटुंबानं बायोगॅसच्या माध्यमातून पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय स्वीकारला आहे.

बायोगॅसमुळे गॅस सिलेंडरला कायमचा रामराम (ETV Bharat)

शेतात उभारला बायोगॅस प्रकल्प : देवळा येथील देवरवाडे कुटुंबानं सुमारे 6 वर्षांपूर्वी राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजने अंतर्गत आपल्या शेतात बायोगॅस प्रकल्प उभारला. या प्रकल्पामुळे घरगुती इंधनाची गरज मोठ्या प्रमाणात भागवली जात असून, इंधनावरील खर्चातही बचत होत आहे. तसंच या प्रकल्पातून मिळणाऱ्या सेंद्रिय खताचा शेतीसाठी उपयोग होत असल्यानं उत्पादन खर्च कमी करण्यासही मदत होत आहे. देवरवाडे कुटुंबानं सुरू केलेला हा उपक्रम आज परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

गॅस सिलेंडरवरील अवलंबित्व पूर्णपणे संपले : देवरवाडे कुटुंबाकडे 30 एकर शेती असून 5 ते 6 जनावरं आहेत. गोठ्यातील शेणाचा योग्य उपयोग करण्याच्या उद्देशानं त्यांनी 6 वर्षांपूर्वी अंबाजोगाई पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधून बायोगॅस प्रकल्प उभारला. या प्रकल्पासाठी एकूण ७२ हजार रुपये खर्च आला. त्यापैकी राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजने अंतर्गत 25 हजार रुपयांचं शासकीय अनुदान मिळालं. या प्रकल्पामुळे कुटुंबाची घरगुती गॅसची गरज पूर्ण होत असून, गॅस सिलेंडरवरील अवलंबित्व पूर्णपणे संपलं आहे. परिणामी, कुटुंबाची दरवर्षी सुमारे 15 हजार रुपयांची थेट आर्थिक बचत होत आहे. या उपक्रमासाठी पंचायत समितीचे प्रवीण मोरे आणि कन्हैया सुपेकर यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं.

बायोगॅस प्रकल्पाचा लाभ केवळ इंधन बचतीपुरता मर्यादित नसून, त्यातून निर्माण होणाऱ्या स्लरीचाही शेतीसाठी प्रभावी वापर केला जात आहे. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली देवरवाडे कुटुंब स्लरीमध्ये कृषी विद्यापीठाचे बायोमिक्स, ट्रायकोडर्मा, वेस्ट डी-कंपोजर, गोकृपाअमृत आणि जीवामृत यांचे मिश्रण करून उच्च दर्जाच्या जैविक निविष्ठा तयार करत आहे.

'जमिनीची सुपीकता वाढली, रासायनिक खतांवरील खर्च शून्यावर' : या प्रकल्पाबाबत बोलताना शेतकरी रविंद्र देवरवाडे म्हणाले, "बायोगॅस प्रकल्पातून तयार होणाऱ्या जैविक निविष्ठांचा वापर आम्ही रासायनिक खतांना पर्याय म्हणून शेतीमध्ये करत आहोत. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली असून, रासायनिक खतांवरील खर्च जवळपास शून्यावर आला आहे. इंधन बचत आणि सेंद्रिय शेतीचा हा प्रयोग आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरत आहे."

'शाश्वत विकासाचं प्रभावी उदाहरण' : अंबाजोगाई पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रवीण मोरे यांनी सांगितलं की, 2018-19 पासून आजपर्यंत 65 हून अधिक शेतकऱ्यांना राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. आर्थिक बचत, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सेंद्रिय शेतीचा संगम साधणारा हा उपक्रम ग्रामीण भागातील शाश्वत विकासाचं प्रभावी उदाहरण ठरत असून, इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.