
बिहार निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार खेसारीलाल यादव यांना मीरा-भाईंदर महापालिकेची नोटीस
बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये छपरा मतदार संघातून अभिनेते खेसारीलाल यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार आहेत. त्यांना मिरा भाईंदर महापालिकेनं अतिक्रमणाबाबत नोटीस बजावली आहे.

Published : November 5, 2025 at 8:32 PM IST
ठाणे : राष्ट्रीय जनता दल (राजद) या पक्षातून बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रसिद्ध भोजपुरी कलाकार खेसारीलाल यादव यांना मिरा भाईंदर महापालिकेनं नोटीस बजावली आहे. मिरा रोडवरील घरातील अनधिकृत बांधकामाबाबत मिरा-भाईंदर महापालिकेनं ही नोटीस बजावली आहे. भाजपाकडून हे दबाव तंत्र असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे

खेसारीलाल यादव छपरामधून मतदार संघातून उमेदवार : सध्या देशभरात बिहार विधानसभा निवडणुकीची चर्चा जोरदार सुरू आहे. सर्व पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीत एनडीए घटक पक्ष आणि महागठबंधन यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय जनता दल (राजद) पक्षातून रिंगणात मिरा भाईंदरमधील रहिवाशी व प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते खेसारीलाल यादव यांना छपरा विधानसभामधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची थेट लढत ही भाजपाच्या उमेदवाराशी आहे. भाजपाकडून दबाव तंत्राचा वापर करत मिरारोडमधील राहत्या घरातील अनधिकृत बांधकाम काढण्याची नोटीस मिरा-भाईंदर मनपानं बजावली आहे.

अतिक्रमण विभागामार्फत करण्यात येणार कारवाई : सध्या ते या घरात राहत नसून यामध्ये स्टुडिओ उभारण्यात आला. मनपा प्रशासनाकडून या नोटीसमध्ये घरावर उभारण्यात आलेल्या लोखंडी अँगल आणि पत्राशेडला अनधिकृत ठरवण्यात आलं असून ते तातडीनं काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. सदर नोटीस 3 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली असून सध्या त्यांच्या राहत्या घराला टाळे असल्याचं आणि संपूर्ण कुटुंब बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकीचे वातावरण तापले असून मनपाकडून राजद पक्षाचे उमेदवार खेसारीलाल यादव यांच्या अतिक्रमणावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :

