बिग बॉस विजेता जय दुधानेला हनिमूनला जाताना ठाणे पोलिसांनी एअर पोर्टवरून केली अटक
बिग बॉस विजेता जय दुधानेला (Jay Dudhane) आज मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आलीय.

Published : January 4, 2026 at 3:45 PM IST
ठाणे : बिग बॉस 3 चा विजेता जय दुधानेला ठाणे पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केलीय. ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात चार महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात ठाणे पोलिसांनी ही कारवाई केलीय. जय दुधाने हा जीम व्यावसायिक असून, तो फिटनेस ट्रेनर खेळाडू आणि मॉडेलिंगचेदेखील काम करतो. त्याच्या विरोधात दाखल असलेला गुन्हा हा एका मालमत्तेशी संबंधित असून, एक गाळा अनेकांना विकण्याचा हा प्रकार असल्याचं पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितलंय.
गाळा विकल्याचा प्रकार ही अफवा : "माझ्यावर जो आरोप करण्यात आलाय, ती अफवा कोणी पसरवली माहीत नाही. माझ्यावर लोक उलटले आहेत. लवकरच सत्य काय हे तपासानंतर बाहेर येईल. मी माझा चेहरा लपवणार नाही, कारण हे सगळं प्रकरणच खोटं आहे. माझ्यात हिंमत आहे, मी कोणत्याही प्रकारे गुन्हा केलेला नाही, त्यामुळेच मी या प्रसंगाला सामोरे जाण्याची हिंमत ठेवतो," अशी प्रतिक्रिया जयने दिलीय.
"माझ्यावर दाखल असलेला गुन्हा हा खोटा गुन्हा आहे. यात माझे आजी आजोबांना देखील आरोपी करण्यात आलेले आहे. माझ्या नावाचे अटक वॉरंट आहे हे मला माहीत नाही. लग्नानंतर मी पत्नीसोबत हानीमुनला परदेशात जात असताना पोलिसांनी मला ताब्यात घेतलं. त्यांनी मला देश सोडता येणार नाही असंही सांगितलं. त्यामुळं मी पोलिसांना सहकार्य करत असून मी आलेल्या प्रसंगाचा सामना करणार आहे." - जय दुधाने, बिग बॉस 3 चा विजेता
करोडोंच्या फसवणुकीचे हे प्रकरण : जय दुधाने आणि त्याच्या कुटुंबीयांवर दाखल असलेला हा गुन्हा काही दिवसांपूर्वी वर्तक नगर पोलीस ठाण्यात दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून जय दुधाने हा पोलिसांना मिळाला नव्हता. त्याचा शोध घेतल्यानंतर आज त्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी त्याला मुंबई विमानतळावरून अटक केली. मालमत्तेसंदर्भातील हा गुन्हा असून, यामध्ये खोटी कागदपत्रं तयार करणे आणि फसवणूक करणे या कलमांचा समावेश आहे. अधिक तपास करून पोलीस पुढील कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिलीय.
हेही वाचा -

