पालघर जिल्ह्यात भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; औषध देण्याच्या आमिषानं संतापजनक कृत्य, बाबा अटकेत
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूबाबाने एका 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यामुळं सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

Published : May 5, 2026 at 8:43 PM IST
पालघर : नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर परिसरात भोंदूबाबांनी उपचाराच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करण्याचे प्रकार घडले आहेत. नाशिकमध्ये तर एका बहुराष्ट्रीय कंपनीतील महिलांना गुंगीचं आणि उत्तेजक ओषधे देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रकार घडला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यातील अनेक प्रकार उघडकीस आणले आहेत, परंतु पालघरसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात अजूनही आरोग्यसेवा नीट पोहचली नसल्याचा गैरफायदा घेऊन उपचाराच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार होत आहेत. परंतु, एकदा फसवणूक झाल्यानंतर सामाजिक बदनामीच्या भीतीनं तक्रार दाखल करण्यास कुणीही पुढे येत नाही.
स्मशानभूमीनजीक मुलीवर बलात्कार : पालघरमध्ये भोंदूबाबांची वाईट नजर आता उमलणाऱ्या कळ्यांवर पडली आहे. कासात एका 13 वर्षांच्या मुलीवर स्मशानभूमीनजीक बलात्कार झाल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी दिली. शिवराम परश सावर (रा. सारशी पाटीलपाडा ता. विक्रमगड) असे भोंदूबाबाचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.
तेरा वर्षीय मुलीवर भोंदूबाबाने केला अत्याचार : आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तेरा वर्षीय मुलीवर 55 वर्षीय भोंदूबाबाने अत्याचार केला. 13 वर्षीय मुलीच्या बहिणीला मासिक पाळीत त्रास होत होता. त्यावर वैद्यकीय उपचार करण्याऐवजी या चिमुकलीच्या पालकांनी भोंदूबाबावर विश्वास ठेवला. त्यातून तिच्यावर जीवघेणा प्रसंग उद्भवला.
अघोरी पूजेला कुटुंब पडले बळी : अघोरी पूजा करून गावठी औषधोपचार करण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने तेरा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित चिमुकलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीदरम्यान त्रास होत असल्यामुळं भोंदूबाबाने तिला गावठी उपचार करून बरे करू, गावठी औषध देऊ अशा भूलथापा दिल्या होत्या. त्यानुसार या पीडितेला अघोरी पूजा करून औषध देण्याच्या बहाण्याने चार तारखेला रात्री बारा वाजता स्मशानभूमीजवळ बोलावलं. तिथं तिला मंत्रमुग्ध करून जंगलात नेत रात्री एक वाजण्याच्या दरम्यान चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी दिली.
पोटात दुखायला लागल्यानं कृत्याची माहिती : घडलेल्या प्रकारनंतर मुलीच्या पोटात दुखायला लागलं. मुलीनं ही गोष्ट आपल्या पालकांना सांगितली. घरच्यांनी या 55 वर्षीय भोंदूबाबाविरोधात कासा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली. या प्रकरणातील आरोपी भोंदूविरोधात जलदगतीने शोध मोहीम राबवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर, कासा ठाण्याचे निरीक्षक अमर पाटील, अंमलदार आर घाटाळ आणि कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले. पोलिसांच्या या पथकाने अवघ्या दोन तासात शिवराम परश सावर (रा. सारशी पाटीलपाडा ता. विक्रमगड) याच्या मुसक्या आवळल्या. कासा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध ‘पोस्को’सह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी महिती प्रभारी पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी दिली.
पीडितेवर उपचार सुरू : पीडित चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यातील वेगवेगळ्या घटनांची माहिती पाहता आता तरी समाजाने जागृत होण्याची आवश्यकता आहे. शारीरिक आणि मानसिक उपचारासाठी अशा भोंदूबाबांच्या आहारी जाऊन फसवणूक होण्याचे टाळले पाहिजे. वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेतला, तर असे गैरप्रकार करणाऱ्यांचे फावणार नाही.
हेही वाचा -

