ETV Bharat / state

पुणे दारूकांडाचं भिवंडी कनेक्शन उघड, एफडीएच्या धडक कारवाईत पुण्यात वापरलेल्या मिथेनॉलचा मोठा साठा जप्त

पुणे बनावट दारूकांडाप्रकरणी अन्न व औषध प्रशासनानं भिवंडीत मोठी कारवाई केली आहे. तेथील एका गोदामातून दारूसाठी बेकायदेशीरपणे मिथेनॉलचा पुरवठा केल्याचं तपासात समोर आलं आहे.

FDA ACTION MUMBAI
पुणे दारूकांडाचं भिवंडी कनेक्शन उघड (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2026 at 6:30 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागानं पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील बनावट दारूकांड प्रकरणी मुंबईनजीक वसलेल्या भिवंडी परिसरात मोठी कारवाई केली आहे. फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात अवैध भेसळयुक्त विषारी गावठी दारू तयार करण्यासाठी भिवंडीतील याच रेक्स इंटरनॅशनल कंपनीच्या गोदामातून बेकायदेशीरपणे मिथेनॉल नेलं होतं.

पुणे दारूकांडाचं भिवंडी कनेक्शन : विषारी दारूमुळं प्राण गमावणाऱ्यांच्या घटनेला जबाबदार असलेल्या कर्नालसिंग विरका याचं फुगेवाडी येथील राहत्या घरी हातभट्टीच्या दारुचं दुकान आहे. विरकानं योगेश वानखेडे नावाच्या इसमाकडून ही बनावट दारू मिळवली होती. योगेश हा उरळी कांचन येथील राजू प्रजापती याच्याकडून दारू आणून इतरांना त्याचा पुरवठा करत होता. पुण्यातील घटनेच्या या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारूमध्ये वापरण्यात आलेलं 'मिथेनॉल' हे 'मे. रेक्स इंटरनॅशनल' यांच्याकडून प्राप्त झाल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय. या कंपनीचं अधिकृत कार्यालय वाशीमध्ये असून त्यांचं गोदाम अनंत अँड कंपनी, गाळा नंबर 544/A, म्हात्रे कंपाउंड, अंजुर रोड, वळगाव, भिवंडी इथं असल्याची माहिती मिळतात अन्न व औषध विभागाचे नवनिर्वाचित आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ठाण्याचे औषध निरीक्षक योगेंद्र पोळ यांनी शुक्रवारी रात्री उशिरा भिवंडीतील गोदामावर धाड टाकत ते सील करण्याची कारवाई केलीय. त्यावेळी कंपनीचे मालक चौबे पितापुत्र तिथं हजर नव्हते. मात्र, चौकशी केली असता त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागानं आधीच ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

पुणे दारूकांडाचं भिवंडी कनेक्शन उघड (ETV Bharat Reporter)

जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही : या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे नवनिर्वाचित आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय की, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अथवा आस्थापनेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अन्न व औषधांच्या बाबतीत बेकायदेशीर कामकाज करणाऱ्या कोणत्याही संस्था अथवा व्यक्तीविरोधात अवैध औषध उत्पादन व विक्रीबाबतची कारवाई यापुढं अधिक कठोरपणे केली जाईल. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 व इतर अनुषंगिक कायदे व नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढं थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न आणि औषध मिळणं हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो सुनिश्चित करणं हीच आमची मुख्य जबाबदारी असून आम्ही ती आम्ही तत्परतेनं व परिणामकारकरित्या पार पाडू.

एफडीएची धडक कारवाई : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर) इथं विषारी गावठी दारू प्यायल्यानं आतापर्यंत तब्बल अनेकांचा मृत्यू झालाय. अवघ्या 30 रुपयांत मिळणाऱ्या या दारूच्या सेवनामुळं अनेकांची प्रकृती सध्या गंभीर आहे. या दारूत 'मिथेनॉल' हे विषारी रसायन मिसळल्यामुळंच हे मृत्यू तांडव घडल्याचं समोर येताच अन्न व औषध प्रशासन विभागानं मिथेनॉलचा अवैध साठा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिलेत. त्यानुसार, भिवंडी परिसरातील रेक्स इंटरनॅशनल कंपनीवर शुक्रवारी रात्री धाड टाकून प्रशासनानं मिथेनॉलचा मोठा साठा जप्त केलाय. विशेष म्हणजे, याच कंपनीकडून पुण्याच्या दारू विक्रेत्यानं त्याच्याकडील दारूत मिथेनॉल मिसळल्याचं समोर आलंय. या कारवाईत एकूण 5,929 किलोग्रॅम इतका मिथेनॉलचा साठा आढळून आला. ज्याची किंमत 7 लाख 30 हजार रूपये इतकी आहे.

चौबे पितापुत्रांविरोधात गुन्हा दाखल : या विषारी द्रव्याची तिथं कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नव्हती. तसंच विषारी द्रव्य कायद्यातील नियमांनुसार या कंपनीकडं या घातक द्रव्यांच्या खरेदी-विक्रीचा कोणताही तपशील उपलब्ध नव्हता. त्यामुळं या विषारीद्रव्याचा गैरवापर होऊ नये म्हणून हा साठा एफडीएकडून जप्त करण्यात आलाय. तसंच कंपनीचे मालक अरूणकुमार चौबे, अभिषेक अरूणकुमार चौबे या दोघा पितापुत्रांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. याशिवाय अन्न व औषध प्रशासन विभागानं या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा :

  1. 'विषारी दारु मृत्यू प्रकरण गृहखात्याचं अपयश, पुण्याच्या कारभाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवा'; सुप्रिया सुळे यांची मागणी
  2. अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची घडी विस्कटली? संघटना आणि नेतृत्वापुढे आव्हान
  3. मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरे पुलाचा भराव धोकादायक, पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी