महिलांना सक्षम करणारी 'भीमथडी जत्रा' यंदा नव्या रूपात पुणेकरांच्या भेटीला येणार, सुनंदा पवार यांची माहिती
या वर्षीच्या भीमथडीची 'भारतातील स्थानिक फुलं' ही थीम असल्यामुळं भीमथडीच्या माध्यमातून देशाच्या स्थानिक वनस्पतीचं जतन केलं जाईल.


Published : December 8, 2025 at 2:14 PM IST
पुणे : ग्रामीण भागातील महिला बचत गटांसह महिला उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी, या हेतूनं सुरू करण्यात आलेली 'भीमथडी जत्रा' यंदा नव्या रूपात पुणेकरांच्या भेटीला येणार आहे. ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाऊंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सयुंक्त विद्यमानं येत्या 20 ते 25 डिसेंबर या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत कृषी महाविद्यालय मैदान शिवाजी नगर (सिंचन नगर) याठिकाणी यंदाची भीमथडी जत्रा होणार असल्याची माहिती आयोजक सुनंदा पवार यांनी दिली. यंदाच्या भीमथडी जत्रेबाबत आज (8 डिसेंबर) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.
'भारतातील स्थानिक फुलं' ही थीम : सुनंदा पवार म्हणाल्या की, "ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, ही संस्था गेली पाच दशकं कृषी, शिक्षण, जलसंधारण, प्रशिक्षणे, महिला बचत गट, महिला सबलीकरण यासह कृत्रिम बुद्धिमत्ता अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करीत आहे. यापैकीच एक सामाजिक उपक्रम म्हणजे 'भीमथडी जत्रा'. ग्रामीण भागातील महिला बचत गटांसह महिला उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी, या हेतूनं संस्थेच्यावतीनं गेली 18 वर्ष या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केलं जात आहे. यंदा या उपक्रमाचं 19 वं वर्ष आहे. यंदा नव्या रूपात ही जत्रा होणार आहे. या वर्षीच्या भीमथडीची 'भारतातील स्थानिक फुलं' ही थीम असल्यामुळं भीमथडीच्या माध्यमातून देशाच्या स्थानिक वनस्पतीचं जतन केलं जाईल.अर्बन /किचन गार्डनिंगमध्ये लहान जागेत, कमी खर्चात विषमुक्त भाजीपाला उत्पादन घरच्या घरी बनविता येईल. याचं प्रात्यक्षिक पुणेकरांना यंदा पहावयास मिळेल," असं सुनंदा पवार यांनी सांगितलं.
फुलांनी सजविलेल्या भव्य प्रवेश द्वारावर स्वागत : पुढं सुनंदा पवार म्हणाल्या की, "या वर्षी भीमथडी जत्रेत प्रवेश करतानाच ग्राहकांचे मुघल बागेच्या सौंदर्यावर आधारित फुलांनी सजविलेल्या भव्य प्रवेश द्वारावर स्वागत केलं जाईल. यंदाची भीमथडी जत्रा 19 व्या वर्षात पदार्पण करत असून महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचं दर्शन घडविणारे कलाकार व त्या कलाकारांचं रेखाटन असलेलं भव्य व सुंदर रांगोळी स्थानिक कलाकारांच्या कलेतून साकारण्यात येईल. तसंच भीमथडी प्रदर्शनामध्ये मिलेट उत्पादनासह विषमुक्त भाजीपाला, भौगोलिक मानांकन (जीआय) असलेले पदार्थ तसंच महिला सबलीकरणाला केंद्र स्थानी ठेऊन ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, चटण्या, मसाले, लोणचं, मेथी मलाई, प्री मिक्स मिलेट चिवडा, मातीची भांडी, बेल मुरांबा, खजूर लोणचं, हळदीचं लोणचं, कपडे यांसह विविध उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. हळद, फळे, भाजीपाला आणि इतर अनेक उत्पादनं आहेत. याच्या व्यतिरिक्त, शेतकऱ्यांचे उत्पादन जसे की, गुळभेंडी ज्वारी, हुरडा, सेंद्रिय गुळ, लाकडी घाणा तेल, परस बागेसाठी गावरान देशी बियाणं, फळबाग रोपं, पेरू फळं व भाजीपाला रोपं इत्यादींचा समावेश असणार आहे."
85 पेक्षा जास्त स्टॉल असणार : याचबरोबर, "राळे पुलाव, राळे लापशी, नाचणी इडली, मिलेट भेळ, यांसारखे भरड धान्यापासून बनविलेले ताजे, पौष्टिक व रुचकर पदार्थ याचं प्रात्यक्षिक पुणेकरांना भीमथडी जत्रेत अनुभवायला मिळणार आहे. ग्रामीण खाद्य महोत्सव, ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, चटण्या, मसाले, लोणची, कपडे, फळे, पालेभाज्या, धान्य, कडधान्य इत्यादी उत्पादनं विक्रीस उपलब्ध असतील. महिलांच्या सबलीकरणाला केंद्रस्थानी ठेवून विविध बचत गटांची उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध असतील. मक्याची भाकरी, मेथीचं पिठलं, कारळ्याची वांग्याची भाजी, गव्हाचा व गाईचा चिक स्टॉलमधेच बनवून मिळणार. तसंच गावरान तुपाची जिलेबी, खपली गव्हाची गावरान खीर, देशी गायीच्या गोमुत्र व शेणापासून बनविलेल्या उद, समिधा व गोवऱ्या, मेथी मलाई, प्रीमिक्स मिलेट चिवडा, मातीची भांडी, बेल मुरांबा, खजूर लोणचं, ओल्या हळदीचं लोणचं, जेजुरीची पुरणपोळी, खेकडा करी, इत्यादी पुणेकर खवय्यांसाठी ग्रामीण महाराष्ट्रातील शाकाहारी व मांसाहारी भोजनाचे 85 पेक्षा जास्त स्टॉल असणार आहेत," अशी माहिती देखील यावेळी सुनंदा पवार यांनी दिली.
हेही वाचा :

