ETV Bharat / state

'पद्म पुरस्कार देत देवानं आशीर्वादचं दिला', पद्म पुरस्कार विजेते भिकल्या धिंडा यांची 'ईटीव्ही भारत'ला Exclusive प्रतिक्रिया

92 वर्षीय ज्येष्ठ तारपावादक भिकल्या धिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर झालाय.

Bhiklya Ladakya Dhinda
पद्म पुरस्कार विजेते भिकल्या धिंडा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 25, 2026 at 4:18 PM IST

|

Updated : January 25, 2026 at 4:25 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पालघर - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील २०२६ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राज्यातील अनेकांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱया व्यक्तींना 'पद्म' पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं.

पद्म पुरस्कार विजेते भिकल्या धिंडा (ETV Bharat Reporter)

तारपावादक भिकल्या धिंडा यांना पद्म पुरस्कार - पालघर जिल्ह्यातील वाळवंडा येथील 92 वर्षीय ज्येष्ठ तारपावादक भिकल्या धिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर झालाय. यामुळं धिंडा कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आदिवासी संस्कृतीचं प्रतीक म्हणून ओळखले जाणारे तारपा वाद्य वाजवण्याचा दीर्घ वारसा भिकल्या धिंडा यांना लाभलाय.

वाद्य वाजवून देवांची आराधना करतो - "आपली परंपरा, संस्कृती राखली. आदिवासी वाद्यामुळं मला अनेक पुरस्कार मिळाले. या कार्यात माझी 400 वर्षाची वंशावळ कार्यरत आहे. माझं आता 92 वर्ष वय असून, अवघ्या 10 व्या वर्षापासून मी हे वाद्य वाजवत आहे. हे वाद्य वाजवून देवांची आराधना करतो. त्यामुळं देवानं आशिर्वाद दिला," अशी भावना भिकल्या धिंडा यांनी 'ईटीव्ही भारत'कडं बोलताना व्यक्त केली.

पद्म पुरस्कार विजेते भिकल्या धिंडा यांच्यासोबत EXCLUSIVE संवाद (ETV Bharat Reporter)

भिकल्या धिंडा यांची गरीब परिस्थिती - "आम्ही आदिवासींची संस्कृती जपली आहे. आमच्या अनेक पिढ्या ही वाद्य वाजवत आहेत. गरीब घरातून आम्ही येत असलो तरी आमच्या संस्कृतीमुळं लोकं आम्हाला ओळखू लागली आहेत हीच आमची श्रीमंती आहे. अजूनही आमची परिस्थिती हलाखीची आहे. माझ्या कुटुंबात जवळपास 22 माणसं आहेत. दुसरा व्यवसाय, नोकरी नाही, थोडीफार शेती इतकंच माझं साम्राज्य आहे. महाराष्ट्र सरकारनंही मला याआधी पुरस्कार दिला होता. यातून मिळालेल्या पैशातून लहानशी झोपडी बांधली," अशी भावना व्यक्त करत भिकल्या धिंडा यांनी मदतीची अपेक्षा बोलून दाखवली.

भिकल्या धिंडा यांचा परिचय - उत्कृष्ट तारपावादक म्हणून भिकल्या धिंडा यांची ओळख आहे. आपल्या वडिलांकडून मिळालेली ही कला त्यांनी तारपाची निर्मिती आणि वादन या दोन्ही कार्यांतून जोपासली. अनेक युवकांना ते वादनाचे धडे देत आहेत. जवळपास दहा फूट लांबीचा तारपा हे धांडा यांचे वैशिष्ट्य. भिकल्या धिंडा यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी तारपावादनाने रसिकांना मोहवले आहे. ते स्वतः तारपा वाद्याची निर्मिती करून चरितार्थ करतात. आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी अवघे आयुष्य वेचणारे धिंडा यांच्यावर पद्म पुरस्काराची मोहर उमटल्याने संपूर्ण पालघर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा -

  1. Padma Award 2026: 'पद्म' पुरस्कारांची घोषणा; लोकनाट्य, कृषी-कला क्षेत्रातील महाराष्ट्रातील 4 भूमिपुत्रांना पुरस्कार जाहीर
  2. केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची नावे जाहीर; वाचा, संपूर्ण यादी
Last Updated : January 25, 2026 at 4:25 PM IST