भिगवण प्रकरण : आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर नाराज
भिगवण कथित अपहरण प्रकरणावरुन आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केलीय. नोटिस देणार असही त्या म्हणाल्यात.


Published : February 25, 2026 at 3:43 PM IST
|Updated : February 25, 2026 at 4:08 PM IST
पुणे - जिल्ह्यातील भिगवण येथील महिलेच्या कथित अपहरण प्रकरणी त्या महिलेनं हे अपहरण नसून मी स्वतःच्या मर्जीने गेली असल्याचं सांगितलं असताना सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून याला जातीय रंग देण्यात येत आहे. भिगवण बंद तसंच सभा घेतली जात आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर नाराजी व्यक्त करत, या संदर्भात जर आमच्याकडे तक्रारी आल्यास आम्ही दोन्ही आमदारांना नोटीस पाठवू असं यावेळी त्यांनी सांगितलं.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आज पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या की, भिगवण संदर्भात पोलिसांनी तातडीनं कारवाई केली आहे. हे राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं चालतं. 18 वर्ष पूर्ण झालेल्या महिलेला तिच्या मर्जीने कुणाबरोबरही जाण्याचा आणि राहण्याचा अधिकार कायद्याने दिलेला असतो. त्यामुळे कोणीही दोन समजात तेढ निर्माण करू नये. तसंच कोणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये, असं केल्यास त्यांच्यावर चौकशी करून कारवाई केली जाते. जर आमच्याकडे तक्रारी आल्यास आम्ही दोन्ही आमदारांना नोटीस पाठवू असं यावेळी त्यांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण - इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील 21 वर्षीय तरुणी आणि संबंधित तरुण हे दोघंही स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी तरुणीनं सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करून आपण पूर्णपणे स्वेच्छेनं मुलासोबत आल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रतिज्ञापत्रात तिनं नमूद केलं आहे की, 'आमचे एक वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. माझ्या आई आणि भावानं खोटी तक्रार दिली आहे. माझ्यावर कोणताही दबाव किंवा बळजबरी करण्यात आलेली नाही. मी माझ्या मर्जीनं मुलासोबत आले आहे आणि इथून पुढेही त्याच्यासोबतच राहणार आहे.' तसंच, पोलिसात हजर होण्यापूर्वी काही राजकीय नेत्यांनी केलेले आरोप निराधार असल्याचंही तिनं स्पष्ट केलं आहे. आपण वयानं सज्ञान असून आपल्या आयुष्याबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचंही तिनं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.
हेही वाचा...

