महाराष्ट्रात मुसळधार पण बीडमध्ये वरुणराजा रुसला! जुलै उजाडला तरी 173 जलप्रकल्पांमध्ये थेंबभरही पाण्याची आवक नाही
राज्यात इतरत्र मुसळधार पाऊस असताना बीड जिल्ह्यात मात्र पावसानं दडी मारली आहे. यामुळे जिल्ह्यातील 173 प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक झाली नसून जुन्या साठ्यावर पाणीपुरवठा सुरू आहे.

Published : July 5, 2026 at 6:28 PM IST
बीड : एकीकडं मुंबई, पुणे आणि कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूननं जोरदार हजेरी लावली असून मुसळधार पावसामुळं नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. मात्र, दुसरीकडं बीड जिल्ह्यावर अद्यापही वरुणराजा रुसल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. जुलै महिना उजाडला तरी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळं बीडमधील तब्बल 173 लहान-मोठ्या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप थेंबभरही पाण्याची आवक झालेली नाही. यामुळं शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
जुन्या साठ्यावर पाणी पुरवठा सुरू : बीड जिल्ह्यातील 127 जलप्रकल्प केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच नव्हे, तर ग्रामीण भागातील शेतीच्या सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. गेल्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या चांगल्या पावसामुळं हे सर्व प्रकल्प 100 टक्के भरले होते. त्यामुळं उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नव्हती. मात्र, यंदा परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. जून महिना उलटून गेला तरी धरण क्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झालेला नाही. परिणामी, धरणांचे तळ कोरडं पडू लागले असून जुन्याच साठ्यावर पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्ह्यातील बळीराजाची नजर आभाळाकडं : पाऊस लांबल्यामुळं जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरण्या धोक्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या हलक्या पावसावर पेरण्या केल्या होत्या, त्यांच्यावर आता दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीतही वाढ न झाल्यानं शेतीच्या सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मागील वर्षी याच काळात ओसंडून वाहणारे प्रकल्प आता पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करत आहेत. हवामान विभागानं पुढील काही दिवसांत जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला असला, तरी सध्या तरी बीडचा बळीराजा आभाळाकडं डोळे लावून बसला आहे.
बीड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पात किती पाणीसाठा ? :
- माजलगाव : 20.10%
- बिंदुसरा : 18.81%
- सिंदफणा : 16.44%
- बेलपारा : 7.78%
- मेहकरी : 9.67%
- कडी : 22.15%
- रूटी : 1.31%
- तलवार : 1.61%
- वाण : 25.34%
- बोरणा : 15.39%
- बोधेगाव : 19.64%
- सरस्वती : 26.82%
- कुंडलीका : 30.51%
हेही वाचा :

