ETV Bharat / state

बारामतीत निवडणुकीच्या आधीच उधळला गुलाल, अजित पवार यांचे आठ उमेदवार बिनविरोध

बारामतीत नगरपरिषद निवडणुकीच्या आधीच गुलाल उधळण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवार यांचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

बारामतीत निवडणुकीच्या आधीच उधळला गुलाल
बारामतीत निवडणुकीच्या आधीच उधळला गुलाल (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 21, 2025 at 7:52 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

बारामती - बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं (अजित पवार) महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. एकूण 41 जागांपैकी तब्बल आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम टप्प्यात सात उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला, तर छाननी प्रक्रियेदरम्यान एक उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाला होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच अजित पवार याना आठ जागांवर विजय मिळाल्याने बारामतीतील निवडणूक राजकारणात पुढे काय घडते याची उत्सुकता आहे. पहिल्या टप्प्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारांना मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे बारामतीत मतदानापूर्वीच किंवा निवडणुकीपूर्वी गुलालाची उधळण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारमध्ये किशोर मासाळ, अभिजित जाधव, अनुप्रिता डांगे, धनश्री बांदल, श्वेता नाळे, शर्मिला ढवाण, अश्विनी सातव आणि आफ्रिन बागवान यांचा समावेश आहे. यापैकी अनुप्रिता डांगे यांचा बिनविरोध विजय छाननीच्या टप्प्यातच निश्चित झाला होता. त्यानंतर आज सात उमेदवारांनी कोणतीही स्पर्धा न राहिल्याने सहज विजय मिळवला.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी घेतलेल्या रणनीतीचे हे यश असल्याचे पक्षातील कार्यकर्त्यांचे मत आहे. विरोधकांकडून या प्रभागांमध्ये उमेदवारी मागे घेण्यात आली किंवा अर्ज अपात्र ठरले. यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सरळ विजय मिळाला. आगामी निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने हा विजय पक्षासाठी मोठं मनोबल वाढवणारा ठरला आहे.


नगरपरिषद निवडणुकीत बारामती हे नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात राष्ट्रवादीला मिळालेला हा मोठा यशस्वी टप्पा बारामतीतील राजकारणाची दिशा दर्शवणारा मानला जात आहे. उर्वरित 33 जागांवर आता मुख्य लढत रंगणार असून, आगामी काही दिवसांमध्ये प्रचाराचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार - खरी लढत दोन्ही राष्ट्रवादीमध्येच होणार आहे. बारामती नगरपरिषद निवडणुकीत पाच उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निश्चित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) सचिन सदाशिव सातव, तर शरद पवार यांच्याकडून बळवंत बेलदार हे रिंगणात उतरले आहेत. भाजपाचे गोविंद देवकाते, बहुजन समाज पक्षाचे काळूराम चौधरी आणि अपक्ष शुभम मोरे यांचाही या लढतीत समावेश असून बारामतीत पाचही उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे.


दोन्ही राष्ट्रवादीमध्ये होणारी थेट भिडंत हे या लढतीचं प्रमुख आकर्षण ठरत आहे. भाजपाचा उमेदवार शहरी मतदारांमध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे, तर बसपचे चौधरी आणि अपक्ष शुभम मोरे स्थानिक मुद्द्यांवर भर देत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विविध पक्षांचे उमेदवार असल्याने बारामती मधील मतदानाची दिशा काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र असं असलं तरी खरी लढत ही अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्यामध्येच असेल.

हेही वाचा...

  1. "पैशाचा वापर न करता निवडणूक जिंकून दाखवा", रंजनकुमार तावरे यांचं अजित पवारांना आव्हान
  2. सामाजिक ऐक्य धोक्यात आणणाऱ्या वक्तव्यांपासून सरकारनं सावध राहावं – शरद पवार