ETV Bharat / state

मुंबईसह आसपासच्या परिसरात बकरी ईद शांततेत साजरी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

Bakri Eid celebrated peacefully in Mumbai and surrounding areas, amidst tight police security
मुंबईसह आसपासच्या परिसरात बकरी ईद शांततेत साजरी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2026 at 4:18 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. त्यामुळं मुस्लीम बांधवांचा हा सण शांततापूर्ण वातावरणात साजरा झाला. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शहरात काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं आजचा दिवस सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी मुंबई पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरांत चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.



मुंबईत मोठा बंदोबस्त : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुंबईभर कालपासूनच मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या तुकड्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. मुंबई पोलीस आयक्तालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, या सुरक्षा व्यवस्थेत 8 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 21 पोलीस उपायुक्त आणि 61 सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश होता. याशिवाय 1980 पोलीस अधिकारी आणि 10110 पोलीस कर्मचारी शहरातील विविध भागांत बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते. काही अति संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी विशेष दंगलविरोधी पथकही तैनात करण्यात आली असून सतत दिवसभर मुंबईत पोलिसांची गस्त दिसत होती.

मुंबईसह आसपासच्या परिसरात बकरी ईद शांततेत साजरी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त (ETV Bharat Reporter)


सण शांततेत साजरा करण्याचं पोलिसांकडून आवाहन : अनेक ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी जातीनं उपस्थित राहून नागरिकांना शांततेत आणि जबाबदारीनं सण साजरा करण्याचं आवाहन करताना दिसत होते. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी संयम बाळगावा तसंच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, असंही आवाहन मुंबई पोलिसांच्यावतीनं जनतेला करण्यात आलं. या दरम्यान, कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना त्याची माहिती देण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.


मीरा रोड, गोरेगाव भागांत शांतता : मागील दोन दिवसांपासून काही प्रमाणात जातीय तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मीरा रोड, गोरेगाव या भागांत शांततेत बकरी ईद साजरी करण्यात आली. यामुळं मुस्लीम बांधवांमध्येही समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं. मीरा रोड आणि आसपासच्या परिसरात मुस्लीम नागरिकांची संख्या मोठी असल्यानं बकरी ईदनिमित्त विविध ठिकाणी तयारी करण्यात आली होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी मीरा रोड येथील पूनम सोसायटीत काही मुस्लीम बांधवांनी बकरे आणल्याची तक्रार देत त्यावर संकुलातील काही रहिवाशांनी आक्षेप घेतला होता. या कारणावरून तिथं बराच वाद निर्माण झाला होता, त्यात काही हिंदुत्ववादी संघटनांनी उडी घेतल्यानं प्रकरणाला धार्मिक वळण लागलं होतं. मात्र, स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करत पोलीस प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. मीरा रोडच्या चौका-चौकांत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यामुळं गुरूवारी प्रत्यक्ष बकरी ईदच्या दिवशी शहरात पूर्णपणे शांततेचं वातावरण होतं.

Bakri Eid celebrated peacefully in Mumbai and surrounding areas, amidst tight police security
मुंबईसह आसपासच्या परिसरात बकरी ईद शांततेत साजरी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त (ETV Bharat Reporter)


नमाज आणि कुर्बानीकरता विशेष व्यवस्था : दरम्यान, गुरूवारी दिवसभर मुस्लीम बांधवांनी शहरातील विविध मशिदींमध्ये टप्प्याटप्प्यानं जाऊन ईदची नमाज अदा केली. तसंच महापालिकेनं निश्चित केलेल्या मैदानांमध्ये आणि खासगी जागांवर परवानगीसह उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्यांमध्ये कुर्बानीची परंपराही पार पडली. दिवसभर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत बकरी ईद शांततेत साजरी केली. शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा :

  1. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदासाठी शिफारस
  2. सोलापुरात खळबळ! लोकप्रिय रीलस्टार रोहिणी पाराध्येची आत्महत्या; आत्महत्येचं कारण गुलदस्त्यात
  3. श्रीकांत शिंदे यांचा मराठवाड्यात ‘शिवसंवाद दौरा; 'टीका करणं हाच त्यांचा टाईमपास', आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा