9 वर्षीय बालिकेवर 'अघोरी' अत्याचार करणाऱ्या 83 वर्षीय वृद्धाचा जामीन फेटाळला; केज न्यायालयाचा कठोर निर्णय
समाजात अंधश्रद्धा पसरवणारे आणि चिमुरडीवर घृणास्पद कृत्य करणाऱ्या अशा गुन्हेगाराला जामीन देणे समाजासाठी घातक असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढलेत.


Published : March 1, 2026 at 9:19 AM IST
बीड - शाळेत जाणाऱ्या अवघ्या 9 वर्षांच्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्याविरोधात अघोरी पूजा करीत अत्याचार करणाऱ्या 83 वर्षीय नराधम आरोपीचा जामीन अर्ज केज जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फेटाळून लावलाय. समाजात अंधश्रद्धा पसरवणारे आणि चिमुरडीवर घृणास्पद कृत्य करणाऱ्या अशा गुन्हेगाराला जामीन देणे समाजासाठी घातक असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढलेत.
हात-पाय दाबायला लावून नंतर तिचे कपडे काढले : बीड जिल्ह्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही धक्कादायक घटना 28 जानेवारी 2026 रोजी घडली होती. बाबुराव केरबा निरडे (वय 83 वर्ष) याने पीडित बालिकेला गाठले आणि चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरात बोलावले. सुरुवातीला तिला हात-पाय दाबायला लावून नंतर तिचे कपडे काढले. हद्द म्हणजे आरोपीने पीडितेच्या खासगी भागाला हळद-कुंकू लावून, अंगावरून लिंबू फिरवून आणि तोंडातून मंत्रोच्चार करून अत्यंत किळसवाणी 'अघोरी पूजा' केली आणि तिच्यावर अत्याचार केला. या अमानवीय प्रकारामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्कार (भारतीय न्याय संहिता/IPC) पोक्सो (POCSO) कायदा, जादूटोणा विरोधी कायदा या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्याने जामिनासाठी केज येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
आरोपीने केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद : सदर अर्जावर सुनावणी करताना माननीय सत्र न्यायाधीश आर. के. शेख यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेतले. "आरोपीने केलेले कृत्य हे केवळ अत्याचार नसून समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेत नेणारे आणि अत्यंत घृणास्पद आहे," असे नमूद करत 26 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. आर. बी. बिरंगळ यांनी प्रभावी युक्तिवाद केला, त्यांना सहाय्यक सरकारी वकील अॅड. डी. बी. इंगळे यांनी मोलाचे सहकार्य केलंय.
हेही वाचाः

