बदलापूर अत्याचार प्रकरण; भाजपावर टीका होताच तुषार आपटेंचा ‘स्वीकृत’ नगरसेवक पदाचा राजीनामा
बदलापूर कुळगाव नगरपालिकेतील भाजपाचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.

Published : January 10, 2026 at 7:35 PM IST
ठाणे : कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत भाजपाच्या दोन, शिवसेनेच्या दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याची निवड करण्यात आली. बदलापूर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर, शुक्रवारी नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात पार पडलेल्या पहिल्या सभेत एकूण पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली. खळबळजनक बाब म्हणजे तुषार आपटे यांचीही यादीत निवड करण्यात आली. तुषार आपटे हे त्यांच्या शाळेमधील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरणी सहआरोपी आहेत. मात्र त्यांच्या निवडीबाबत भाजपा नेते चिडीचूप असल्याचं दिसून आल्यानं नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. दरम्यान तीव्र विरोधानंतर आपटे यांनी राजीनामा दिला आहे.
तुषार आपटेंचा राजीनामा : राजीनामा दिल्यांनतर तुषार आपटे म्हणाले, "पक्षाची आणि शाळेची बदनामी नको म्हणून मी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे." मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी तुषार आपटेंच्या राजीनामाच्या मागणी केली होती, जर राजीनामा दिला नाही तर बदलापुरात मोर्चा काढू असा इशारा त्यांनी दिला होता. बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.
बदलापूरच्या शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार : बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. बदलापूरमध्ये नागरिकांनी निदर्शनं करुन रेल्वे वाहतूक रोखून धरली. संपूर्ण बदलापूर शहर बंद ठेवण्यात आलं. हा रोष इतका शिगेला पोहोचला होता की, मंत्री गिरीश महाजन यांना आंदोलकांची समजूत काढायला जावं लागलं. तरीही आंदोलकांनी ऐकलं नाही. लहान मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं प्रकरण उघडकीला येऊ नये, म्हणून शाळा प्रशासनानं बरीच लपवाछपवी केल्याचं समोर आलं. काही पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. अखेर हे प्रकरण तापल्यानंतर पोलिसांनी शाळेच्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल केला.
44 दिवसांनी पोलिसांच्या हाती लागले तुषार आपटे : बदलापूर शहरासह राज्याला हादरवणाऱ्या दोन चिमुकल्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रकरणी शाळेचे अध्यक्ष, सचिव यांनाही आरोपी करण्यात आलं. बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तक्रार देण्यास असमर्थ ठरल्याच्या 21 (2) या कलमाखाली शाळेच्या संस्थाचालकांवर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा कथित चकमकीत मृत्यू झाला. या प्रकरणावरून मोठं राजकारणही रंगलं. यात संस्थेचे सचिव तुषार आपटे हे 44 दिवसांनी पोलिसांच्या हाती लागले. त्याला त्यानंतर 48 तासात जामिनही मिळाला. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.
हेही वाचा -
- बदलापूर अत्याचार प्रकरण; शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या अध्यादेशाचा मसुदा न्यायालयात सादर
- "अरे अक्षय शिंदेने बलात्कारच केलेला नाही, बलात्कार केलेल्यांना...", जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक गौप्यस्फोट
- "देवा, तू या लोकांना अक्कल देण्यात कंजुषी का केली?"; सुधीर मुनगंटीवारांचा 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत संतप्त सवाल - Sudhir Mungantiwar

