ETV Bharat / state

बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर; शिवसेनेची अट मान्य करणार का?

विलीनीकरणाच्या निर्णयासाठी बच्चू कडूंनी आपल्या पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात केल्याचीही माहिती आहे.

Bachchu Kadu Offered Legislative Council Seat
बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 28, 2026 at 3:04 PM IST

|

Updated : April 28, 2026 at 4:58 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई- विधान परिषद निवडणुकीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंना शिवसेनेकडून विधान परिषदेची जागा देण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सहमती असल्याची माहिती समोर आलीय. पण त्याचसोबत एक अट ठेवण्यात आल्याची चर्चाही आहे. बच्चू कडू यांना जर विधान परिषद हवी असेल तर त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण करण्याची अट घालण्यात आल्याचे बोलले जातंय. बच्चू कडू यांनी याबाबत कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. ते लवकरच याबाबत भूमिका मांडतील, असं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जातंय. अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू विरुद्ध भाजपा असे राजकीय समीकरण असताना बच्चू कडू शिवसेनेत गेल्यास भाजपाची भूमिका काय असेल, याबाबत चर्चा रंगू लागलीय. विलीनीकरणाच्या निर्णयासाठी बच्चू कडूंनी आपल्या पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात केल्याचीही माहिती आहे. पण याबाबत अधिकृत बच्चू कडू बोलतील, असं त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

बच्चू कडूंच्या नावाला शिवसेना नेत्यांचा विरोध? : शिवसेनेताल काही नेते, मंत्री आणि आमदार बच्चू कडूंना उमेदवारी देण्यास विरोध करीत असल्याची माहिती आहे. पक्षाबाहेर राहून त्यांना आमदार केलं, तर भविष्यात ते आमच्यासाठीच अडचणीचं ठरू शकतात, अशी भावना विशेषतः विदर्भातील काही नेत्यांनी व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबत ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटलं की, “अद्याप कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोपर्यंत नाव जाहीर करत नाहीत तोपर्यंत या चर्चांना काही अर्थ नाही. त्यांनी बच्चू कडू यांचे नाव जाहीर केल्यानंतर आम्ही त्यावर बोलू.”

निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता : विधान परिषदेच्या 9 जागांसाठी आणि 1 पोटनिवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी (अजित पवार) 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक रिंगणात उतरल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

सरकारविरोधात घेतली होती भूमिका : 2019 साली महाविकास आघाडी सरकारच्या काळात बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने शिवसेनेला पाठिंबा दिला होता. ठाकरे सरकारच्या काळात कडू यांना मंत्रिपद देण्यात आले होते. पण शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांनी घेऊन बंड केले होते, तेव्हा बच्चू कडू यांनी शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला. ते गुवाहाटीलाही गेले होते. पण प्रत्यक्षात सरकार स्थापन झाल्यानंतर बच्चू कडू यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं होतं. तेव्हा कडू हे नाराज होते.

विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात आक्रमक भूमिका : त्यानंतर लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. विधानसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्रित दिसले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे आता बच्चू कडू यांना संधी मिळणार का? आणि त्यासाठी ते प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दहावा उमेदवार देण्यासंदर्भात चर्चा : विशेष म्हणजे नागपुरात शिवसेनेचे संजय निरुपम यांनीसुद्धा विधान परिषद निवडणुकीवर भाष्य केलंय. एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. कोणाला उमेदवारी द्यायची की नाही ते सर्व एकनाथ शिंदे पाहतात. यावर जो निर्णय होईल ते एकनाथ शिंदे यांच्या पातळीवर होणार आहे. दहावा उमेदवार देण्यासंदर्भात चर्चा आहे. आमच्याकडे असलेल्या संख्याबळानुसार दोन विधान परिषद सदस्य आम्ही निवडून आणू शकतो, गरज पडली तर छोटे पक्ष आणि अपक्ष आमच्या संपर्कात असतात. त्यांची सर्वांची इच्छा असली तर अजून एक उमेदवार देण्यासंदर्भात विचार होईल. दोन व्यतिरिक्त अजून एक उमेदवार आम्ही निवडून आणू शकू तर पुढे कोण आहे. याचा काही फरक पडत नाही, असंही संजय निरुपम म्हणालेत.

हेही वाचाः

प्रशांत आंबी, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना चिखली पोलिसांनी घेतलं ताब्यात, भरउन्हात पुस्तकाचं केलं वाचन

बारामतीत पोलीस ठाण्यातच आरोपीची आत्महत्या; लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी होता अटकेत

Last Updated : April 28, 2026 at 4:58 PM IST