डोंगरदऱ्या, वळणदार रस्त्यातून उभा राहिलेला संघर्ष; मेळघाटात बच्चू कडूंची ऐतिहासिक महापदयात्रा
मेळघाटातील नागरिकांच्या विकासाच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी महापदयात्रा बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चार दिवसांपासून सुरू आहे.

Published : March 4, 2026 at 1:42 PM IST
|Updated : March 4, 2026 at 3:23 PM IST
अमरावती : सातपुड्याच्या कुशीतल्या घनदाट जंगलातून डोंगरदऱ्यांच्या वळणदार रस्त्यांवरून आणि दुर्गम पायवाटांमधून राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली वेगळी चळवळ आक्रमण करत आहे. मेळघाटातील अतिदुर्गम 37 गावांना जोडणारी 250 किलोमीटरची संघर्ष महापदयात्रा बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चार दिवसांपासून सुरू आहे. दररोज 25 ते 30 किलोमीटरचा पायी प्रवास करत बच्चू कडू आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचत आहेत. जंगलातील पायवाट, उंच, सखल डोंगर आणि वळणदार घाट रस्ते पार करत ही महापदायात्रा मेळघाटातील विकासाच्या प्रश्नांवर थेट आवाज उठवत आहे.
आदिवासी बांधवांमध्ये जनजागृतीचा प्रयत्न : "भारत तिसरी आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना मेळघाटातील आदिवासी कुटुंबांना आजही पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही. वीज आणि प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मेळघाटातील आदिवासी, गवळी आणि बलई समाज शांतताप्रिय आणि प्रामाणिक आहेत. त्यांच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेत शासनानं त्यांच्या विकासाकडं कायम दुर्लक्ष केलं. मात्र आता आदिवासी शांत बसणार नाही, तो आपल्या हक्कासाठी उभा राहील. 9 मार्चला सलोना इथं सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं एकत्र येऊन संघर्षाला बळ देतील," असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत : 1 मार्चला सेमाडोह इथून सुरू झालेली महापदयात्रा रायपूर, हत्रू, चिलाटी, इरईपाडा, डोमी, सुमिता, सलीत, एकताई, गोरडा, हिरडा, खारी आणि राहू या गावांमधून मार्गक्रमण करत पुढं सरकत आहे. प्रत्येक गावात आदिवासी बांधव पारंपरिक गदली सुसून नृत्यानं बच्चू कडू यांचं स्वागत करत आहेत. गावाच्या चावडीवर सभा होत असून 9 मार्चच्या महामोर्चासाठी आवाहन केलं जात आहे. मंगळवारी रात्री राहू इथं मुक्काम केल्यानंतर बच्चू कडू यांनी पुन्हा नव्या जोमानं जारीदा गावाच्या दिशेनं कुच केली आहे. जारीदा इथं वनविभागाच्या कार्यालयाला घेराव घालून आदिवासींवरील अन्यायाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.

आता आदिवासी बोलेल, गरज पडल्यास ठोकतील : चार दिवस वीज नसली तर शहरात लोक रस्त्यावर उतरतात. पण इथं पिढ्यानपिढ्या वीज पोहोचलेली नाही. प्राथमिक उपचाराची सोय नाही, सर्जरी तर दूरची गोष्ट आहे. शिक्षण, रस्ते, रोजगार सगळ्याच बाबतीत मेळघाट मागं आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली तरी ही अवस्था बदललेली नाही, याबाबत बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे आत्ता फक्त बोलत असलेला आदिवासी समाज नंतर चवताळून उठू शकतो.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषतः जरीदा इथं वनविभाग कार्यालयाच्या घेरावाच्या इशाऱ्यामुळं बुधवारी सकाळपासूनच गावात पोलीस तैनात करण्यात आलेत.

9 मार्चला आंदोलन आक्रमक : 8 मार्चला महपदयात्रा सलोना इथं पोहोचणार आहे. यानंतर 9 मार्चला इथून चिखलदराकडं निघणार आहे. चिखलदरा तहसील कार्यालयाला घेराव घालून आदिवासींच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. 9 मार्चला होणाऱ्या आक्रमक आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी भेट दिलेल्या सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याचा दावा केला जातोय.

महापदयात्रेचं वैशिष्ट्य :
- प्रत्येक गावात गदली सुसून नृत्यानं स्वागत.
- गाव चावडीवर सभा आणि संवाद.
- 9 मार्चला मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन.
- मोर्चासोबत डीजे आणि पारंपारिक वाद्य.
- मुक्कामाच्या ठिकाणी भोजन आणि सामूहिक चर्चा.
- सोबत वैद्यकीय पथकाचं वाहन.
- पोलिसांचा ताफा तैनात.

आंदोलनाच्या ठळक मागण्या :
- नागपूर आंदोलन नावे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता.
- मेळघाटात शुद्ध पिण्याच्या पाण्याची तातडीनं व्यवस्था.
- सर्व गावांचं पूर्ण विद्युतीकरण.
- प्राथमिक आरोग्य सुविधांची उभारणी.
- मनरेगा संदर्भात प्रभावी धोरण.
- रस्ते, शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांचं निराकरण.
- जिल्हास्तरीय प्रश्न यात्रेदरम्यान सोडवावेत.
हेही वाचा :

