ETV Bharat / state

कांदा प्रश्नी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री म्हणाले लवकरच कांद्याचा प्रश्न मार्गी लावणार

नाशिकमध्ये कांदा प्रश्नी शेतकरी आक्रमक झाले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

कांदा प्रश्नी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न
कांदा प्रश्नी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न, इन्सेटमध्ये देवेंद्र फडणवीस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 27, 2026 at 9:16 PM IST

|

Updated : February 27, 2026 at 10:36 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक - जिल्ह्यात कांद्याचे भाव सातत्याने कोसळत असल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशात आज मुख्यमंत्री नाशिकला आले असता प्रहार संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर तुम्ही माझी गाडी अडवू शकले नाही, तरी मी लवकरच कांद्याचा प्रश्न मार्गी लावेल असं मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.



नाशिक हा कांद्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशात यंदा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर कांद्याचे भाव सातत्याने कोसळत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. नाशिकमध्ये कांद्याचे सरासरी बाजारभाव 1 हजार रुपयांच्या खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेषतः कांद्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही घसरण तीव्रतेनं जाणवत आहे. हाच प्रश्न घेऊन आज प्रहार संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री नाशिकला विश्व मराठी संमेलनासाठी आले असता त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.

कांदा प्रश्नी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न (ETV Bharat)

काय म्हणाले मुख्यमंत्री - नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्नावर शेतकरी नाराज आहेत. काही लोकांनी आज माझी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र माझी गाडी निघून गेली आणि त्यांचा कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची क्षमा मागतो. पण तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला आजच भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे यांनी कांद्याच्या प्रश्नावर बैठक घ्या म्हणून पत्र दिलं आहे. त्यामुळे मी लवकरच बैठक घेऊन दरवर्षी आपण जसा तोडगा काढतो तसा तोडगा काढू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.



सरकारने ठोस उपाय योजना करावी - कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा रोपे विकत घेऊन लागवड करावी लागली. गतवर्षीच्या तुलनेत लागवडीत घट असली, तरी सरासरी क्षेत्र कायम आहे. मात्र पुढील काळात कांद्याला योग्य भाव मिळावा, यासाठी शासनाने आतापासूनच ठोस धोरण आखणे गरजेचे आहे. कांदा निर्यात धोरण निश्चित करावे, बफरस्टॉक धोरणाचा पुनर्विचार करावा आणि शेतकऱ्यांकडून थेट खरेदी वाढवावी, जेणेकरून उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल आणि ग्राहकांनाही कांदा परवडणाऱ्या दरात मिळेल असं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा..

  1. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; पोत्यावरील मोदींच्या फोटोमुळं खतांचे भाव वाढले?
Last Updated : February 27, 2026 at 10:36 PM IST