राज्यात भीतीचं वातावरण, भाजपा अमराठी भाषिकांना भडकावतंय; संजय राऊत कडाडले
उद्धव आणि राज दोन चुलत भावांचे शिवसेना आणि मनसेच्या माध्यमातून एकत्र येणे हे त्या संयुक्त महाराष्ट्राच्या दिवसाच्या घोषणेसारखेच आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.


Published : December 24, 2025 at 12:18 PM IST
मुंबई: ठाकरे बंधू एका मोठ्या निर्णयाकडे वाटचाल करीत महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यांनाच धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवणार आहेत. शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी अनौपचारिकरीत्या युतीची घोषणा केली असली तरी राज आणि उद्धव अधिकृतरीत्या त्याची घोषणा करणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, खरं तर हा मराठी माणसासाठी ऐतिहासिक दिवस आहे. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली, त्या दिवसाची मला आठवण येते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन चुलत भावांचे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एकत्र येणे हे त्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेच्या दिवसासारखेच आहे. इतर दिल्लीच्या चाटूकारांसारखे (एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष) नाही," असंही राऊत म्हणाले.
शिंदे आणि भाजपा पक्षाचे कुटील कारस्थान : शहरातील काही भागांमध्ये 'बाटोगे तो पीटोगे' (विभागणी कराल तर मार खाल) असे पोस्टर्स लावण्यात आलेत. मराठी माणसाच्या बाजूने उभे राहण्याचा अर्थ अमराठी भाषिकांच्या विरोधात भूमिका घेणे, असा आहे का? असे राऊत यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, "हे शिंदे आणि भाजपा पक्षाचे कुटील कारस्थान आहे. मुंबईतील उत्तर प्रदेशातील लोकांना अस्वस्थ वाटावे, यासाठी हे केलं जातंय. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, कोणीही या लोकांना मारहाण केलेली नाही. 'मुंबईकरां'मध्ये या शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा समावेश आहे. राज्यात भीतीचं वातावरण आहे. आता आम्ही सर्व मुंबईकर आणि मराठी माणसांना एकत्र आणत आहोत, त्यामुळे काहींना हे आवडत नाही आणि ते द्वेष पसरवत आहेत," असे राऊत म्हणाले.
शिंदेंनी एकदाही मराठी माणसासाठी आवाज उठवलेला नाही : राऊत यांनी पोस्टर लावणाऱ्यांना आव्हान दिले की, शिवसेनेने अमराठी लोकांना "कोणत्याही कारणाशिवाय" मारहाण केल्याचा एक तरी प्रसंग दाखवावा. त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांना लक्ष्य केले जात असल्याची उदाहरणेही दिली. शेवटचे उदाहरण वादग्रस्त बेळगाव सीमाप्रश्नाशी संबंधित होते. त्यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकदाही मराठी माणसासाठी आवाज उठवलेला नाही. "गेल्या दोन वर्षांत आमच्या मराठी लोकांना मारहाण झालीय, महाराष्ट्राचे झेंडे लावल्याबद्दल 212 मराठी भाषिकांना तुरुंगात टाकण्यात आलंय. त्यांना मराठीत बोलायचंय आणि मराठी माणूस म्हणून जगायचंय. शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांनी त्यासंदर्भात एकदाही निषेध केल्याचे किंवा या लोकांच्या पाठीशी उभे राहिल्याचे आम्ही ऐकलेले नाही," असे राऊत म्हणाले.
तुमच्या भावना दुखावल्या जात नाहीत का? : राऊत पुढे म्हणाले, "विधानसभेच्या वेळी त्यांनी 'बाटोगे तो काटोगे' असे पोस्टर्स लावले होते, आता 'पीटोगे' (मार खाल) असं लिहिलं आहे. त्यांचं हे नाटक सुरूच आहे." ते पुढे म्हणाले, "एका भाजपा आमदाराची हिंमत कशी झाली, एका मराठी भाषिक रिक्षाचालकाला मारण्याची? तुम्ही माध्यमांच्या लोकांनी त्या भाजपा आमदाराचा निषेध केला का? ज्याने एका मराठी रिक्षाचालकाला कानाखाली मारली? का नाही? जसे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, त्याचप्रमाणे तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की, एका भाजपा आमदाराला रिक्षाचालकाला मारण्याचा अधिकार कोणी दिला? मराठी भाषिक असूनही, तुमच्या भावना दुखावल्या जात नाहीत का? त्याने कदाचित चुकीच्या पद्धतीने गाडी चालवली असेल, पण तो गरीब आहे आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार त्याला मारहाण करून सहज सुटतो. ही लाजिरवाणी गोष्ट आहे," असंही राऊत म्हणालेत.
1992 मध्ये भाजपावाले शेपूट घालून घरात बसले होते : 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर भाजपा दारे बंद करून बसला होता, यावरून राऊत यांनी भाजपावर टीका केली. त्यांनी भाजपावर हिंदुत्ववादी नसल्याचा आरोप केला. "मी तुम्हाला सांगतो की, 1992 मध्ये भाजपावाले शेपूट घालून घरात बसले होते. आमचे लोक (शिवसैनिक) तलवारी, बंदुका आणि बॉम्ब घेऊन रस्त्यांवर फिरत होते. ते आता मुंबईबाहेरील लोकांच्या संरक्षणाबद्दल काय बोलताहेत?," असंही राऊत म्हणालेत. संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्यासोबतची त्यांची चर्चा सकारात्मक झालीय आणि ते युती करणार आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि इतर मराठी भाषिक त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ते म्हणाले की, हा मराठी माणसाला लागलेला शाप आहे. "हा शाप आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पाहत आहोत. मराठी माणसाने स्वराज्याला विरोध केला. त्यांच्याप्रमाणेच आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनाही खुद्द महाराष्ट्रीयांनीच तीव्र विरोध केला होता. तरीही ते पुढे गेले आणि त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली," असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.
हेही वाचाः
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांचं लवकरच पुनर्वसन, राज्य सरकारनं ठाणे-पालघरमध्ये जागा शोधली
नगरपालिका निवडणुकीत आपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत; उच्च न्यायालयात मागणार दाद

