"देवाला तरी राजकारणातून सोडा", हनुमान गढीवरून खोडके–राणा यांच्यात आरोप–प्रत्यारोप
हनुमान गढीवरून आमदार संजय खोडके आणि आमदार रवी राणा यांच्यात जोरदार आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत.

Published : January 6, 2026 at 5:42 PM IST
अमरावती : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच नेत्यांमधील आरोप–प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर हनुमान गढीवरून आमदार संजय खोडके आणि आमदार रवी राणा यांच्यात जोरदार आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. सोमवारी (5 जानेवारी) झालेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी हनुमान गढी इथं सुरू असलेल्या बांधकाम व विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करत संजय खोडके यांनी रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली.
बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप : दरम्यान, या आरोपांना प्रत्युत्तर देताना बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी संजय खोडके यांच्यावर जोरदार टीका केली. "संजय खोडके यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून ते बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप करत आहेत," असं म्हणत रवी राणांनी संताप व्यक्त केला. तसंच, "राजकारणात देवाला तरी सोडलं पाहिजे. हनुमान हे संकटमोचक आहेत. अशा प्रकारची वक्तव्यं करणाऱ्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची गरज आहे," असंही रवी राणा म्हणाले.
परिणाम भोगावे लागतील : याचबरोबर, हनुमान गढी हे पवित्र तीर्थक्षेत्र असून त्याच्या बांधकामावर टीका करणं म्हणजे धार्मिक भावना दुखावण्यासारखे असल्याचं रवी राणा यांनी स्पष्ट केलं. "हनुमान गढीवर टीका करणाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील," असा इशाराही रवी राणा यांनी दिला. दरम्यान, शासकीय निधीच्या वापरावरून सुरू झालेल्या या वादामुळं जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :

