आसाम आणि छत्तीसगड राज्यातील साईभक्ताचं सुवर्ण दान; सुवर्ण पदक आणि सोन्याचे गुलाब फूल साईंच्या चरणी अर्पण
भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या (Shirdi Sai Baba) दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक दररोज शिर्डीला येत असतात. तसंच आपल्या इच्छेनुसार अनेकजण साईंच्या झोळीत देणगी देतात.

Published : December 9, 2025 at 2:11 PM IST
|Updated : December 9, 2025 at 3:15 PM IST
शिर्डी : भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक दररोज शिर्डीला येतात. तसंच आपल्या इच्छेनुसार साईंच्या झोळीत देणगी टाकतात. कोणी पैसे तर कोणी सोनं, चांदी किंवा हिरे हे साईबाबांच्या चरणी अर्पण करतात. अशातच आसाम आणि छत्तीसगड राज्यातील दोन भाविकांनी साईबाबांच्या चरणी सोन्याच्या दोन वेगळ्या वस्तू अर्पण केल्यात.
ओम अक्षर कोरलेले सुवर्ण पदक : आसाम-गुवाहाटी येथील साईभक्त 'नरेन महांता' यांच्या परिवाराने ओम अक्षर कोरलेले 16.180 ग्रॅम वजनाचे सुवर्ण पदक साईबाबांना अर्पण केले. या सुवर्ण पदकाची बाजार किंमत 1,86,135 इतकी आहे. अनेक वर्षांपासून शिर्डीला भेट देणाऱ्या महांता यांनी सांगितलं, "साईबाबांच्या कृपेनं आमच्या जीवनात अनेक चांगले बदल घडले. बाबांनी आम्हाला खूप काही दिलं आणि त्या कृतज्ञतेपोटी आज आम्ही हे सुवर्ण पदक साईबाबांच्या चरणी अर्पण केलं."

सोन्याचे गुलाब फूल साईबाबांच्या चरणी अर्पण : छत्तीसगड राज्यातील दुर्ग शहरातून आलेल्या साईभक्त 'गितीका सहाणी' यांनी 13.100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गुलाब फूल साईबाबांच्या चरणी अर्पण केले. या सुवर्ण गुलाबाची किंमत 1,54,000 असून ते साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांकडे विधिपूर्वक सुपूर्द करण्यात आलं. हे सुवर्ण गुलाब फूल आगामी उत्सवकाळात मंदिरात वापरलं जाणार असल्याची माहिती संस्थानने दिली. दोन वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या भक्तांनी साईंच्या चरणी सोन्याच्या दोन वस्तू अर्पण केल्या. त्यांची किंमत नव्हे तर त्यामागील भक्तीभाव आणि श्रद्धा अधिक मोलाची असल्याचं दान करणाऱ्यांनी स्पष्ट केलं. साईंच्या दरबारात दानाचं मूल्य सोन्यात नाही, तर भक्तांच्या मनातील प्रेम आणि समर्पणात आहे आणि त्याचंच हे जिवंत उदाहरण आहे.

हेही वाचा -
- चेन्नईच्या साईभक्ताकडून शिर्डी साईबाबांना एकूण 48 लाखांची देणगी; 25 लाखांची सोन्याची छत्री आणि 23 लाख रोख अर्पण
- साईबाबांच्या चरणी 74 लाखांचे सोन्याचे ताट अर्पण; मुंबईतील साईभक्त धरम कटारिया यांची अनोखी सुवर्ण भेट
- झहीर खान साईचरणी नतमस्तक; झहीरच्या लेकराची 'ईटीव्ही भारत'च्या कॅमेऱ्यासमोर खास पोझ, संस्थानला दिली देणगी

