इतके नगरसेवक बिनविरोध कसे निवडले; निवडणूक आयोगाच्या विरोधात असीम सरोदेंनी थोपटले दंड, दाखल केली याचिका
महापालिका निवडणूक 2026 मध्ये अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या उमेदवारांच्या विरोधात वकील असीम सरोदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


Published : January 5, 2026 at 7:03 PM IST
|Updated : January 5, 2026 at 10:58 PM IST
पुणे : राज्यात जाहीर झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 69 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात विरोधकांनी आवाज उठवला आहे. आता या विरोधात मनसेचे नेते आशिष देशमुख यांनी असीम सरोदे यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

असीम सरोदेंनी न्यायालयाकडं केल्या तीन मागण्या : यावेळी असीम सरोदे म्हणाले की, "आम्ही दाखल केलेल्या याचिकेत प्रामुख्याने तीन मागण्या केल्या आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोगानं दखल घेतली असून याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. आयोगानं जे काही मांडलं आहे, त्यात प्रथमदर्शनी असं वाटत आहे की काहीतरी गडबड गोंधळ झाला आहे. मोकळ्या वातावरणात निवडणुकीचं आयोजन होत नाही, हे यावरून दिसून येत आहे. निवडणूक आयोगानं चौकशी नेमली आहे, ती उच्च न्यायालयाच्या देखरेखी व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. तसेच महापालिकेच्या कायद्यानुसार निवडून आलेला उमेदवार हा नगरसेवक होऊ शकतो. पण बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारानं जर निवडणूकच लढवली नाही, तर मग वोट शेअर काय असली पाहिजे. तसेच ज्या जागा जिंकून आल्या आहेत, त्या जागांवर न्यायालयानं स्टे द्यावा, अशी आमची मागणी आहे."
निवडणूक आयोगानं स्वीकारलं सत्ताधाऱ्यांचं मांडलिकत्व : राज्य निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या नादी लागून मांडलिकत्व त्यांनी स्वीकारलं आहे. ते निःपक्ष वागू शकत नाही, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून होणारी चौकशी ही एक फास आहे. म्हणून आम्ही या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

निवडणूक आयोग आहे की भाजपाची शाखा : "निवडणूक आयोगानं यूटर्न घेतला आहे, पहिले चौकशी करू म्हटले नंतर मात्र, आमचा संबंध नाही, असं सांगत आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखंच काम करत आहेत. विरोधक म्हणून आम्ही जेव्हा महाभियोग आणण्याची मागणी केली. त्यावेळी सरकारनं पाठिंबा का दिला नाही, निवडणूक आयुक्त हे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे," असा आरोप नाना पटोले यांनी केला.
हेही वाचा :
- असीम सरोदे यांना दिलासा; वकिलीची सनद रद्द करण्याच्या निर्णयाला बार काउन्सिल ऑफ इंडियाने दिली स्थगिती
- सनद रद्दची कारवाई होताच ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांचा भाजपावर हल्लाबोल, 'ईटीव्ही भारत'ला दिली पहिली प्रतिक्रिया
- "कोल्हापूरकरांनी ‘जनतेचे न्यायालय’ किती प्रभावी ठरू शकतं, हे दाखवून दिलं"- असीम सरोदे

