आषाढी वारीतून सामाजिक ऐक्याचा संदेश; संत ज्ञानेश्वरांच्या पालखी दिंडीत लातूरहून महेबूब चाचा सहभागी
पालखी सोहळ्यात दिंडीसोबत महेबुब शेख ( चाचा ) हे सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी दिंडीत सहभागी होण्याचे कारण आणि अनुभव सांगितला.


Published : July 8, 2026 at 1:23 PM IST
|Updated : July 8, 2026 at 2:20 PM IST
पुणे - राज्यभरातून वारकरी हे या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. असे असताना यंदा या पालखी सोहळ्यात लातूरहून दिंडीसोबत महेबुब शेख ( चाचा ) हे सहभागी झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांना जाणून घेण्यासाठी मी आलो असल्याचं यावेळी महेबुब चाचा यांनी सांगितलं आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला आजपासून सुरवात होत आहे. 'ज्ञानोबा माऊली-तुकाराम' असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका... अशा भक्तिमय वातावरणात आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे. तर उद्या आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत येत्या 9 तारखेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात भव्य आगमन होणार आहे. दोन्ही पालख्या दोन दिवस पुण्यात मुक्कामी असणार आहेत. पण, गेल्या तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसानं प्रशासनाकडून वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पुणे महानगरपालिकेकडून दिंड्या उतरतात त्या 101 शाळांमध्ये वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांना जाणून घेण्याची इच्छा- अनेक वारकरी दरवर्षी आळंदी येथे पालखी सोहळ्यासाठी जात असतात. पण, आळंदी येथील इंद्रायणी पुलावरून पावसाचा पाणी वाहून जात असल्यानं अनेक वारकरी पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील भवानी पेठ येथील लडकत शाळेत लातूर येथील वारकरी हे दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत महेबुब शेख चाचा हे पहिल्याच वारीसाठी आले आहेत. त्यांना संत ज्ञानेश्वर महाराज यांना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं.
गुण्यागोविंदानं सर्वधर्मीय राहतात- याबाबत महेबुब शेख म्हणाले की," संत ज्ञानेश्वर महाराज यांचं महत्त्व मला माहित आहे. त्यांच्याबाबत अजून माहिती मिळावी. त्याचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आमच्या गावातील लोकांच्या सोबत मीदेखील यंदा पालखी सोहळ्यात सहभागी झालो आहे. आमच्या गावात आम्ही गुण्यागोविंदानं सर्वधर्मीय राहत असतो. कधीही आम्ही जातपात-धर्म याबाबत विचार केला नाही. आम्ही सगळे एकमेकांच्या सुख दुःखात एकत्र राहत असतो. यंदाच्या वारीतदेखील आम्ही एकत्र आलो आहोत".
हेही वाचा-

