ETV Bharat / state

श्रीरामपुरात संत निवृत्तीनाथांची पालखी विठ्ठल नामाच्या जयघोषात दाखल; तृतीयपंथीयांनी लाडू वाटप करत जपली सामाजिक समता

त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडं निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी बुधवारी श्रीरामपुरात दाखल झाली. त्यावेळी पुष्पवृष्टीसह तृतीयपंथी संघटनेकडून वारकऱ्यांना राजगिरा लाडू आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

Sant Nivruttinath Maharaj Palkhi
संत निवृत्तीनाथांची पालखी श्रीरामपुरात दाखल (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 8, 2026 at 8:25 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अहिल्यानगर : 'ज्ञानोबा-तुकाराम, विठ्ठल-विठ्ठल' या अखंड नामगजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेनं निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी बुधवारी (दि.8) श्रीरामपूर शहरात दाखल झाली. यावेळी संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघालं. शहरातील नॉर्दर्न चौक परिसरात हजारो नागरिकांनी पालखीचं दर्शन घेत भावपूर्ण स्वागत केलं. गेल्या सहा वर्षांपासून अखंडपणे सेवा करणाऱ्या तृतीयपंथी संघटनेनं यंदाही वारकऱ्यांचं राजगिऱ्याचे लाडू आणि बिस्किटांचं वाटप करून सामाजिक समतेचा आणि सेवाभावाचा सुंदर संदेश दिला.

पुष्पवृष्टी करत नागरिकांनी केलं वारकऱ्यांचं स्वागत : आषाढी एकादशीच्या वारीसाठी दरवर्षीप्रमाणं यंदाही संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं 29 जूनला त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं. बुधवारी (दि.8) संत निवृत्ती महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात दाखल झाली. दिवसभर शहरातून पालखी मार्गक्रमण करत असताना विठ्ठलनामाच्या जयघोषानं आणि टाळ-मृदंगाच्या गजरानं वातावरण भारावून गेले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी फुलवृष्टी करत वारकऱ्यांचं स्वागत केलं.

Sant Nivruttinath Maharaj Palkhi
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी (ETV Bharat Reporter)

वारकऱ्यांच्या सेवेसाठी नागरिकांचा पुढाकार : यंदा संत निवृत्तीनाथांच्या पालखीत वारकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढल्याचं दिसून आलं. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, महिला, युवक आणि बालवारकरी मोठ्या उत्साहानं दिंडीत सहभागी झाले होते. डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात भगवी पताका आणि मुखी विठ्ठलनाम असा हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर-लोणी महामार्गासह पालखी मार्गावर विविध सामाजिक संस्था, मंडळे आणि नागरिकांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बिस्किटे, जेवण, चहा, ताक तसेच पारंपरिक झुणका-भाकरीचे स्टॉल उभारण्यात आले होते. उन्हाचा आणि प्रवासाचा थकवा दूर व्हावा, या उद्देशानं अनेकांनी स्वतःहून सेवाकार्यात सहभाग घेतला. यामध्ये श्रीरामपूर येथील तृतीयपंथी संघटनेचा सेवाभाव विशेष ठरला. गेल्या सहा वर्षांपासून सातत्यानं वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या या संघटनेनं यंदाही हजारो वारकऱ्यांना राजगिऱ्याचे लाडू आणि बिस्किटांच्या पुड्यांचे वाटप केलं. समाजातील प्रत्येक घटक विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी एकत्र येऊ शकतो याचे प्रेरणादायी उदाहरण या उपक्रमातून पाहायला मिळालं.

Sant Nivruttinath Maharaj Palkhi
लाडू वाटप करताना तृतीयपंथी समाज (ETV Bharat Reporter)

पालखी सोहळ्यात सहभागी होणार हजारो वारकरी : पालखीचा आजचा (दि.8) मुक्काम मुक्काम श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर इथं असून पुढील प्रवास नियोजित वेळापत्रकानुसार पंढरपूरच्या दिशेनं सुरू राहणार आहे. सध्या या दिंडीत हजारो वारकरी सहभागी असून पालखी अहिल्यानगर इथं पोहोचल्यानंतर विविध लहान-मोठ्या दिंड्या आणि पालख्या या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यानंतर वारकऱ्यांची संख्या सुमारे दोन लाखांहून अधिक होईल, अशी माहिती पालखीतील वारकऱ्यांनी दिली. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसुविधांसाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच स्वयंसेवकांनी विशेष नियोजन केलं होतं. वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था याकडेही विशेष लक्ष देण्यात आलं.

श्रीरामपुरात संत निवृत्तीनाथांची पालखी विठ्ठल नामाच्या जयघोषात दाखल (ETV Bharat Reporter)

हेही वाचा :

  1. इंद्रायणी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना नदीत स्नानास बंदी
  2. आळंदीत माऊलींच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी! 'कोठीघरा'तून सुई-दोऱ्यापासून चांदीच्या अलंकारांपर्यंत काटेकोर नियोजन
  3. विठुरायाच्या जयघोषात अन् वरूणराजाच्या हजेरीत पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान! 437 व्या वर्षात दिंडीचा भक्तीमय सोहळा