रंगांतून सांगितलेला भारताचा जिवंत इतिहास; 'क्रिशन खन्ना' सामाजिक स्थित्यंतराचा साक्षीदार कलाकार
चित्रकार क्रिशन खन्ना यांच्या कलेचं मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रदर्शन सुरू असून महाभारत, युद्ध आणि इतिहासाच्या जखमा आपल्या चित्रामधून त्यांनी मांडल्या आहेत.

Published : December 11, 2025 at 5:40 PM IST
मुंबई : मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये चित्रकार क्रिशन खन्ना (Krishna Khanna) यांच्या सर्जनशील प्रवासाचं व्यापक प्रदर्शन सुरू आहे. देशाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक बदलांचा साक्षीदार असलेल्या खन्ना यांच्या कलेतून भारताचा जिवंत इतिहास उलगडतो. त्यांच्या कॅनव्हासवर युद्धाचा धूर, महाभारताची तात्त्विक लढाई, शहर उभारताना हरवलेला मजूर आणि सामान्य माणसाची न थांबणारी झुंज हे सगळं काही जसं आहे तसं रंगवलेलं दिसतं.
ख्रिस्ताचं साकारलेलं रूप विशेष लक्षवेधी : प्रदर्शनातील पहिली मालिका महाभारत आणि ख्रिस्ताच्या प्रतिमांवर आधारित आहे. भीष्माच्या पराभवाचा क्षण, रणभूमीतील ताण-तणाव, भावातील संघर्ष या दृश्यांतून खन्ना आजच्या समाजातील संभ्रम आणि अस्थिरता सूक्ष्मपणे सांगतात. ख्रिस्ताचं त्यांनी साकारलेलं रूप विशेष लक्षवेधी आहे. परदेशी देवमूर्ती नाही, तर भारतीय गल्लीतला काळवंडलेला, जखमी पण आशावादी मनुष्य असा ख्रिस्त त्यांच्या चित्रात दिसतोय. माणसाच्या वेदनेतून उभी राहणारी ताकद त्यांनी सहजपणे रंगात पकडली आहे.

इतिहासाच्या जखमा चित्रामधून मांडल्या : दुसऱ्या विभागात 1970 च्या अस्थिर राजकीय वातावरणाची छाया स्पष्ट जाणवते. भारत-पाक युद्धाच्या भीतीपासून ते बांगलादेशाच्या जन्माच्या रक्तरंजित आठवणीपर्यंत, चे गव्हेराच्या मृत्यूच्या जखमेपासून ते स्थलांतरितांच्या वेदनेपर्यंत खन्ना यांनी इतिहासाच्या जखमा आपल्या चित्रामधून मांडल्या आहेत. त्यांच्या चित्रातील धूसर चेहरे आणि खोल जखमा दाखवताना कॅनव्हासवर रंग नाही, तर वास्तव ओतलं गेलं आहे असं भासवतात अशी माहिती, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे गाईड पियुष सुवालका यांनी दिली.

मजुरांच्या अंधाऱ्या आयुष्याचं चित्रामधून दर्शन : तिसरी मालिका ‘ट्रक’ ही विशेष चर्चेत आहे. दिल्लीच्या वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणाच्या मागे राहिलेल्या स्थलांतरित मजुरांच्या अंधाऱ्या आयुष्याचं त्यांनी वास्तववादी दर्शन घडवलं आहे. ट्रकच्या हेडलाइटमध्ये चमकणारे थकलेले, काळपट चेहरे शहराला उभं करणाऱ्या पण स्वतः मात्र अदृश्य झालेल्या लोकांची वेदना यातून तीव्रतेने जाणवते. शेवटचा विभाग खन्ना यांच्या मानवी दृष्टिकोनाचं दर्शन घडवतो. सैनिक, शिक्षक, लिपिक, रस्त्यावरचे कामगार, देशाचा खरा इतिहास लिहिणारे सामान्य लोक त्यांच्या चित्रात मध्यवर्ती आहेत. देशाची कहाणी मोठी माणसं सांगत नाहीत, ती सामान्य माणूस दररोज जगत असतो असं खन्ना यांना वाटतं. या चित्रप्रदर्शनद्वारे आजची पिढी जुना काळ अनुभवते, याबद्दल समाधान वाटत असल्याचं खन्ना यांनी सांगितलं.

जुन्या काळाचा नव्या पिढीला आरसा : मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालिका निधी चौधरी यांनी प्रदर्शनाबद्दल माहिती देताना सांगितलं की, "जुन्या काळाचा नव्या पिढीला आरसा दाखवण्याचं काम अशी चित्रप्रदर्शन करत असतात. मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टतर्फे आगामी कार्यक्रमांपैकी कुंभमेळ्या संदर्भातील कार्यक्रम विशेष आहे."

क्रिशन खन्ना जन्म : क्रिशन खन्ना यांचा जन्म १९२५ मध्ये ब्रिटिशकालीन भारतात लायलपूर (आत्ता पाकिस्तानमध्ये आहे) येथे झाला. त्यांचं शिक्षण लंडनच्या इंपिरियल सर्व्हिस कॉलेज आणि लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये झालं. ते १९४० साली भारतात आले. त्यानंतर त्यांनी जपान, सिंगापुर इंडोनेशिया या देशांमध्ये देखील वास्तव्य केलं. १९६४ साली ते भारतात स्थायिक झाले.

हेही वाचा -
- कुजलेल्या, खराब झालेल्या फोटोंमध्ये नवा जीव ओतणारा 'डिजिटल जादूगार', अमरावतीच्या चित्रकाराचा जर्मनीपर्यंत डंका
- ‘हा' देश तुटणार नाही : दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईतील चित्रकाराने पेंटिंगच्या माध्यमातून नोंदवला निषेध
- कुंचल्यातून कॅनव्हासवर रेखाटलेल्या दुर्मीळ चित्रांचा प्रचार अन् प्रसार; कीर्ती गायकवाडांकडून नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न

