मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची उद्या घोषणा; बंडखोरांना दिलासा की नवी राजकीय समीकरणे उदयास येणार?
भाजपा, शिंदे गटाची शिवसेना, काँग्रेस, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रत्येकाच्या कोट्यानुसार नावे जाहीर केली असून, त्यासाठी मंगळवारी दुपारपर्यंत अर्ज चिटणीस विभागाकडे सादर करावे लागणार आहेत.

Published : February 24, 2026 at 11:20 AM IST
मुंबई- मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची बुधवारी महापालिका सभागृहात घोषणा करण्यात येणार आहे. भाजपा, शिंदे गटाची शिवसेना, काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रत्येकाच्या कोट्यानुसार नावे जाहीर केली जाणार असून, त्यासाठी मंगळवारी दुपारपर्यंत अर्ज चिटणीस विभागाकडे सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलाय. महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. काही ठिकाणी ऐन निवडणुकीत बंडखोरीही झाली. ही बंडाळी शमवणे सर्वच पक्षांसाठी डोकेदुखी ठरली होती. त्यावेळी नाराजांना स्वीकृत नगरसेवकपदाचे आश्वासन देण्यात आले होते. आता त्या आश्वासनांची अंमलबजावणी होत असल्याचे चित्र आहे.
प्रवीण छेडा भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक : 25 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सभागृह बैठकीत स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत घोषणा होणार आहे. काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांचे नाव भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून पुढे आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. तसेच शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे आणि माजी नगरसेवक बालकृष्ण ब्रीद यांची नावेही चर्चेत आहेत.
पक्षनिहाय संभाव्य नावे
- भाजपा (4) : प्रवीण छेडा, नितेश सिंह, प्रतीप करपे, कमलाकर दळवी
- शिवसेना (शिंदे) (2) : बालकृष्ण ब्रीद, राज सुर्वे
- शिवसेना (ठाकरे) (3) : साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक
- काँग्रेस (1) : वीरेंद्र चौधरी
नाराज गटांना कितपत दिलासा मिळणार? : स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांमुळे नाराज गटांना कितपत दिलासा मिळतो आणि महापालिकेतील पुढील राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.
हेही वाचाः

