अमरावती रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर ICU सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; 'अशी' घ्यावी लागते दक्षता
अमरावती रुग्णालयातील आगीनंतर ICU सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून, फायर अलार्म, स्प्रिंकलर, वायरिंग, ऑक्सिजन व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची नियमित तपासणी गरजेची आहे.

Published : August 25, 2026 at 5:50 PM IST
अमित फुटाणे
छत्रपती संभाजीनगर : अमरावती येथे सोमवारी धक्कादायक घटना घडली. महिला रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात अचानक आग लागल्यानं तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला, तर 36 बालकांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. अतिदक्षता विभाग हा रुग्णालयातील अत्यंत महत्त्वाचा विभाग मानला जातो. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी व्हेंटिलेटरसह अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जातो. मात्र, याच यंत्रणेतील बिघाडामुळं झालेल्या स्फोटात तीन बालकांनी आपला जीव गमावला आहे.
फायर अलार्म का वाजला नाही? : मात्र, अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक सुरक्षाव्यवस्था कार्यान्वित असणं गरजेचं असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं. आग लागली त्यावेळी फायर अलार्म का वाजला नाही? स्प्रिंकलर यंत्रणा कार्यान्वित का झाली नाही? रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अग्निसुरक्षा यंत्रणेची नियमित तपासणी करण्यात आली होती का?, असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. नेमकी ही यंत्रणा कशी काम करते आणि अतिदक्षता विभागात कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे, याचा 'ईटीव्ही भारत'ने विशेष आढावा घेतला आहे.
अतिदक्षता विभागात सुरक्षाव्यवस्था गरजेची : रुग्णालयातील अतिदक्षता विभाग रुग्णांच्या विशेष काळजीसाठी तयार केला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी येथे विशेष उपचार केले जातात. मात्र, या विभागाची देखभाल आणि सुरक्षा यंत्रणेची नियमित तपासणी करणं तितकेच गरजेचं आहे. विशेषतः अतिदक्षता विभागात आग लागल्यास काही महत्त्वाच्या सुरक्षाव्यवस्था कार्यान्वित असणं आवश्यक आहे. प्रत्येक मजल्यावर स्मोक डिटेक्टर आणि फायर अलार्म सिस्टीम असणं आणि ती कायम कार्यान्वित स्थितीत ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं आग लागल्यास तातडीनं त्याची माहिती मिळते आणि आग नियंत्रणात आणणं शक्य होतं. प्रत्येक कक्षात फायर हायड्रंट, होज रील आणि स्प्रिंकलर यांसारख्या यंत्रणा सज्ज असायला हव्यात. या यंत्रणांची वेळोवेळी तपासणी करून त्याचा अहवालही तयार करून ठेवणं आवश्यक आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्ग असणं गरजेचं आहे, असं अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. शोएब हाश्मी यांनी सांगितलं.
वायरिंगही महत्त्वाची : कोणतेही वैद्यकीय उपकरण कार्यान्वित असताना त्यासाठी करण्यात आलेली विजेची व्यवस्था आणि त्यामध्ये वापरण्यात आलेली वायरिंग अत्यंत महत्त्वाची असते. आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी वापरण्यात आलेली वायरिंग योग्य क्षमतेची आहे का, याची दक्षता घेणं गरजेचं आहे. कमी क्षमतेची वायरिंग केल्यास त्यावर अतिरिक्त ताण येऊन ती जळण्याची किंवा त्यातून आग लागण्याची शक्यता असते. वायरिंग खराब झाल्यामुळं एखादे वैद्यकीय उपकरण बंद पडण्याची शक्यताही निर्माण होते. अशा परिस्थितीत रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं विद्युत वायरिंगची दरवर्षी तपासणी करणं, आवश्यकतेनुसार ती बदलणं आणि कोणताही बिघाड होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉ. शोएब हाश्मी यांनी सांगितलं.
अतिदक्षता विभागात ऑक्सिजन व्यवस्था महत्त्वाची : एखाद्या रुग्णाला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नसल्यास त्याला कृत्रिमरीत्या ऑक्सिजन दिला जातो. पूर्वी प्रत्येक कक्षात मोठे ऑक्सिजन सिलिंडर ठेवले जात होते. आता अनेक रुग्णालयांमध्ये पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्सिजन स्वतः ज्वलनशील नसला, तरी तो आग अधिक वेगानं पसरण्यास मदत करू शकतो. त्यामुळं ऑक्सिजनची हाताळणी अत्यंत काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. ऑक्सिजन पाईपलाईनमध्ये कुठे गळती आहे का, याची नियमित तपासणी करणं गरजेचं आहे. तसेच ऑक्सिजनच्या परिसरात आग लागण्याची शक्यता निर्माण होईल असे कोणतेही कृत्य होणार नाही, याची दक्षता घेणं आवश्यक असल्याची माहिती डॉ. शोएब हाश्मी यांनी दिली.
आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक : आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालयातील कर्मचारी नेहमी सज्ज असणं गरजेचं आहे. त्यामुळं रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना अशा परिस्थितीत कोणती पावले उचलायची, याचे नियमित प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. मोठ्या रुग्णालयांमध्ये वर्षातून एक किंवा दोन वेळा याबाबत प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. पोलिसांना ज्याप्रमाणे मॉकड्रिलद्वारे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं, त्याचप्रमाणे डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. रुग्णांना उपचार देण्याची पद्धत जितकी महत्त्वाची आहे, तितकेच रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची सुरक्षा आणि कार्यक्षमता महत्त्वाची आहे. त्यामुळं सर्व बाजूंनी काजळी घेणं हाच या व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असल्याचं एशियन हॉस्पिटलचे संचालक तथा अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. शोएब हाश्मी यांनी सांगितलं.
हेही वाचा -

