ETV Bharat / state

संजय शिरसाट यांच्या विधानावर खा. अमोल कोल्हे यांचा टोला; म्हणाले संजय शिरसाट म्हणजे महाभारतातले संजय

खा. अमोल कोल्हे यांनी ऑफरच्या चर्चांना फेटाळत संजय शिरसाट यांना मिश्कील टोला लगावला. रेल्वे प्रकल्प मूळ मार्गानेच व्हावा सांगून शेतकरी कर्जमाफी प्रश्नांवर सरकारवर टीका केली.

Amol  Kolhe
अमोल कोल्हे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 2, 2026 at 8:54 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

अहिल्यानगर : "ऑफर तर येऊ द्या विचार करू" अमोल कोल्हेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात सध्या उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांवर बोलताना संजय शिरसाट यांनी सगळं आधीच ठरलेलं आहे. आता फक्त वातावरणनिर्मिती सुरू आहे असं विधान केलं होतं. यावर डॉ. कोल्हे मिश्कीलपणे म्हणाले, मी महाभारतातला एक संजय ऐकला होता. ज्यांना दिव्यदृष्टी होती आणि सगळं दिसायचं. आता हे आमचे दुसर संजूभाऊ दिसतायत. ज्यांना सगळंच दिसतंय. असं काही ठरलं असेल तर मला माहिती नाही. मी संजूभाऊंशी संपर्क करतो. त्यांना नक्की काय माहिती आहे हे आधी त्यांनाच विचारलं पाहिजे.



माझ्याकडं अशी कोणतीही ऑफर आलेली नाही : "ऑफर तर येऊ द्या विचार करू." अमोल कोल्हेंच्या या विधानाचा संदर्भ देत त्यांनी रेल्वे प्रकल्पाबाबतची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. एका पत्रकारानं मला विचारलं होतं की, जर हा रेल्वे मार्ग संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर असा होणार असेल तर तुम्हाला राजकीय विचार वेगळा करावा लागेल का? त्यावर मी फक्त प्रतिप्रश्न केला होता की, अशी काही ऑफर तुमच्याकडं आहे का? माझ्याकडे अशी कोणतीही ऑफर आलेली नाही. हा विषय केवळ राजकीय नसून थेट जनतेच्या हिताचा असल्याचं सांगत ते म्हणाले, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ मार्गानेच व्हावा, ही संगमनेर, अकोले, जुन्नर, आंबेगाव आणि राजगुरूनगर या सर्वच तालुक्यांतील जनतेची आग्रही मागणी आहे आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत.

प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे (ETV Bharat Reporter)


जनतेच्या हितासाठी आम्हाला निवडून दिलं : ऑपरेशन तुतारीवर बोलताना, डॉ. कोल्हे यांनी विरोधकांना स्पष्ट शब्दांत सुनावलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठही खासदार ठामपणे एकत्र आहेत. शरद पवार सांगितलं ते धोरण आणि बांधतील ते तोरण हीच आमची साधी-सोपी भूमिका आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत आम्ही जनतेच्या हितासाठी आणि विश्वासाने आम्हाला निवडून दिलं आहे. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत आहोत. त्यामुळं इतर कोणत्याही राजकीय चर्चांना किंवा वावड्यांना महत्त्व देण्याची आवश्यकता नाही असं स्पष्ट करत त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.



सरकारला धारेवर धरलं : केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळं सर्वसामान्य शेतकरी संकटात सापडला असून सरकार केवळ हमीभावाचे गाजर दाखवून फसवणूक करत असल्याचा थेट आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. सावित्रीबाई फुले-ज्योतिराव फुले या मालिकेच्या प्रचार व प्रसारासाठी खासदार अमोल कोल्हे आज राहाता येथे उपस्थित होते. यादरम्यान माध्यमांशी बोलताना कोल्हे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी आणि पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या रखडलेल्या अलाइनमेंटवरून सरकारला धारेवर धरलं.


शेतीविषयक प्रश्नांवर चर्चा : शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा आणि त्यांना मिळणाऱ्या भावाचा ताळमेळ एकदा तपासून पाहिला पाहिजे, ही आमची सातत्यपूर्ण मागणी आहे असं सांगत खा. कोल्हे यांनी संसदेतील एका घटनेचा दाखला दिला. गेल्या अधिवेशनात पूरक मागण्यांवर चर्चा सुरू असताना संपूर्ण देशातील शेतीविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सरकारनं सभागृहाला अवघे दोन तास दिले होते. संपूर्ण देशाच्या अन्नदात्यांच्या प्रश्नांवर चर्चा करायला सरकारकडं फक्त दोन तास असतील तर सरकारला शेतकऱ्यांविषयी किती आस्था आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही असा टोला त्यांनी लगावला.



आश्वासने त्वरित पूर्ण करावीत : सरकारकडून जाहीर केला जाणारा हमीभाव प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळतो का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. खतांच्या वाढलेल्या किंमती आणि पावसामुळं वाढणारा अतिरिक्त खर्च या सगळ्याचा विचार करून हमीभावाची फेररचना झाली पाहिजे अशी मागणी कोल्हे यांनी केली. तसेच कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, सत्ता येण्यापूर्वी सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिलं होतं. ज्यावर महाराष्ट्राच्या जनतेने विश्वास ठेवला. मात्र आता कर्जमाफी देताना निकष, अटींचा ससेमिरा मागे लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलं जात आहेत. सरकारनं निकष बाजूला ठेवून दिलेली आश्वासने त्वरित पूर्ण करावीत अशी मागणी यावेळी अमोल कोल्हे यांनी केली.


रेल्वे मार्ग बदलण्यासाठी कारण दिलं जात आहे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अलाइनमेंट बदलण्यावरून खा. कोल्हे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. हा प्रकल्प संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर या मूळ ओरिजिनल मार्गानेच व्हावा ही या सर्व तालुक्यांतील जनतेची आग्रही मागणी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. रेल्वे मार्ग बदलण्यासाठी रेडिओ टेलिस्कोपचे जे कारण दिलं जात आहे ते अमोल कोल्हे यांनी खोडून काढलं.



अलाइनमेंट बदल नक्की कोणाच्या हितासाठी केला : जगात जर 14 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे मार्ग एकत्र असू शकतात, तर भारतात ते का शक्य नाही? हा प्रश्न मी संसदेतही विचारला आहे. विशेष म्हणजे माहिती अधिकारात GMRT च्या अधिकाऱ्यांनी स्वतः लेखी दिले आहे की, रेल्वे मार्ग बदलण्याबाबत त्यांची कोणतीही चर्चा झालेली नाही. मग हा अलाइनमेंट बदल नक्की कोणाच्या हितासाठी केला जातोय ? असा सवालही अमोल कोल्हे यांनी केला. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले की, 2014 ते 2019 दरम्यान तुमच्याच कार्यकाळात महारेलची स्थापना झाली आणि याचा सर्व्हे झाला होता. तुमची देशात इन्फ्रा मॅन म्हणून ओळख आहे. त्यामुळं तुम्ही आपली ताकद व वजन वापरून हा प्रकल्प जुन्याच मार्गाने पूर्ण करावा असंही यावेळी अमोल कोल्हे म्हणाले.

हेही वाचा -

  1. खासदार संजय दिना पाटलांची जीभ घसरली, पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी; संजय शिरसाट, बच्चू कडूंनी मागितली माफी
  2. उबाठाच्या खासदार बैठकीनंतर ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत; राऊत-शिरसाट आमनेसामने
  3. 'आशीर्वाद दिल्यानं निवडणुका जिंकत नाहीत'; विधानपरिषद निवडणुकीवरुन संजय शिरसाट यांचा उबाठाला टोला