निवडणुकीसाठी खून सहन करणार नाही, अमित ठाकरेंनी घेतली सरवदे कुटुंबीयांची भेट, अश्रू अनावर
सोलापूर महापालिका निवडणुकीदरम्यान मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला. रविवारी अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

Published : January 4, 2026 at 6:37 PM IST
सोलापूर : सोलापूर निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाच्या दोन गटात झालेल्या भांडणात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा खून झाल्याचा आरोप आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या प्रभाग 2 मध्ये हा रक्तरंजित थरार 2 जानेवारीला घडला. भाजपाच्या दोन गटाच्या राड्यात मनसे नेत्याचा नाहक बळी गेला. रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
निवडणुकीसाठी मनसे नेत्याचा बळी का? : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 2 मधील भाजपा उमेदवारांना आणि सर्व पॅनलला बिनविरोध करण्यासाठी भाजपा नेत्यांची 2 जानेवारीला सकाळपासून धडपड सुरू होती. भाजपामधील इतर नेत्यांनी मनसेवर देखील दबाव टाकला होता, अशी माहिती मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी दिली होती. 2 जानेवारीला सायंकाळी जोशी गल्ली येथे बाळासाहेब सरवदे यांचा राजकीय हेतूने खून झाल्याचा आरोप, मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी केला होता.
माझ्या कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी जाब विचारणार : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याचा खून झाल्यानं मनसे नेते अमित ठाकरे रविवारी दुपारी (4 जानेवारी) सोलापूर दौऱ्यावर आले होते. मृत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी अमित ठाकरे म्हणाले, "हे काय चाललंय, निवडणुकीसाठी खून होत आहे हे कदापि सहन केलं जाणार नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून माझ्या कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी जाब विचारणार आहे."
5 जणांना अटक : यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले, "मृत बाळासाहेब सरवदे यांचा भाऊ बाजीराव सरवदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 15 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून 5 जणांना अटक केलीय."
हेही वाचा -

