सत्ता समीकरण पालटलं! अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेनेचा भाजपाला धक्का; ३२ नगरसेवकांचा गट स्थापन
अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपाला धक्का देत शिवसेनेनं काँग्रेसमधील बंडखोर नगरसेवकांबरोबर राष्ट्रवादीबरोबर युती स्थापन केली आहे. त्यामुळे काँग्रेससह भाजपाला धक्का बसला आहे.

Published : January 9, 2026 at 6:45 PM IST
ठाणे : सत्ता समीकरण जुळून आणण्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपाला मोठा धक्का दिलाय. २७ शिवसेनेच्या नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या चार नगरसेवक, एक अपक्ष अशा ३२ नगरसेवकांचा गट स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे. तर चारही नगरसेवक नॉट रिचेबल झाले आहेत. ते ठाण्यात एका ठिकाणी मुक्कामाला असल्याचं सांगितलं जात आहे.
- अंबरनाथ नगर परिषदेत निवडणूक संपल्यानंतर सत्तेसाठी राष्ट्रवादीचे चार नगरसेवक हे गुरुवारीपर्यंत भाजपासोबत होते. मात्र, अचानक १२ तासांमध्ये सूत्र हालली आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे आता शिवसेना अंबरनाथ नगर परिषदेमध्ये बहुमतात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्राकडून देण्यात आली आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध शिवसेनेत अटीतटीची लढाई होऊन भाजपानं नगराध्यक्ष पद पटकावलं. मात्र नगरसेवक निवडीमध्ये शिवसेनेनं बाजी मारत २७ नगरसेवक निवडून आणले. तर भाजपाचे १४ नगरसेवक निवडून आले. विशेष, म्हणजे सभागृहात कुठलाही ठराव मतदानासाठी टाकल्यास ३० हून अधिक संख्याबळ लागते. याच संख्याबळासाठी सत्ता समीकरण भाजपच्या बाजूला राहावे, म्हणून शिवसेनेला सोबत न घेता भाजपानं फोडाफोडीचे राजकरण करत कॉग्रेसच्या ‘त्या’ १२ नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन भाजपा-शिवसेनेच्या युतीत दुरावा निर्माण केला होता. मात्र, शिवसेनेच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या राजकीय खेळीनं भाजपाचा सत्तेत येण्याचा डाव उधळून लावला आहे.
तीस वर्षांत प्रथमच शिवसेनेचा पराभव- अंबरनाथ नगरपालिका निवडणुकांपासून राज्यात निरनिराळी राजकीय समीकरणे उदयाला आली. मात्र, आपल्या कट्टर शत्रूशी भाजपानं कुठेही जुळवून घेतलं नाही. आता महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू असताना अंबरनाथमध्ये २७ नगरसेवकांसह सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या उपमुख्यमंत्री शिदेंच्या शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसलासोबत घेत आघाडी स्थापन केली. या आघाडीत काँग्रेसचे १२ नगरसेवक, राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक आणि १ अपक्ष अशी मोट बांधली गेली. ही आघाडी स्थापन झाल्याचे पत्रही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना गटनेता म्हणून अभिजीत गुलाबराव करंजुळे पाटील यांच्या सहीनं देण्यात आलं होतं. अंबरनाथच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा हे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे होते. मागील तीस वर्षांत प्रथमच इथे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाच्या तेजश्री करंजुले पाटील या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत.
- दरम्यान काँग्रेसचे निलंबित नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भाजपला शिवसेनेने चितपट केलंय. इथे शिवसेना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सोबत घेऊन अंबरनाथ नगर परिषदेत सत्ता स्थापन करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक सध्या नॉट रीचेबल आहेत.
कायदेशीर कारवाई करण्याचा काँग्रेसचा इशारा- अंबरनाथमधील १२ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून नंतर भाजपात प्रवेश करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नुकतेच म्हटलं आहे. या सर्वांना लवकरच कायदेशीर नोटिसा पाठवण्यात येणार असल्याचा त्यांनी इशारा दिला. तसेच त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा-

