ETV Bharat / state

आंबेनळी घाट पुन्हा धोकादायक; अत्यावश्यक कामाशिवाय घाटात प्रवास टाळा, दरड कोसळल्यानंतर प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

रायगडच्या आंबेनळी घाटात मुसळधार पावसामुळं दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. प्रशासनाने अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

आंबेनळी घाटात खबरदारीचा इशारा
आंबेनळी घाटात खबरदारीचा इशारा (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 2, 2026 at 1:42 PM IST

|

Updated : July 2, 2026 at 3:11 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

रायगड : पावसाळ्याला सुरुवात होताच रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट पुन्हा एकदा धोकादायक ठरत आहे. मुसळधार पावसामुळं घाट परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना सातत्यानं घडत आहेत.

कामाशिवाय घाटातून प्रवास टाळा : दोन दिवसांपूर्वी मोठी दरड कोसळल्यानं घाटातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. ही दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला सुमारे दोन तासांची कसरत करावी लागली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घाटातून प्रवास टाळावा, तसेच प्रवास करावाच लागल्यास सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, असं आवाहन पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केलं आहे. धोकादायक परिस्थिती आढळल्यास तत्काळ आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहनही प्रशासनानं केलं आहे.

प्रतिक्रिया देताना तहसीलदार कपिल घोरपडे (ETV Bharat Reporter)


आंबेनळी घाटात दरडी कोसळण्याचा धोका वाढला : कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा जोर कायम असून आंबेनळी घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. पावसामुळं डोंगरकड्यावरील माती सैल होत असल्यानं अचानक दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळं वाहनचालक आणि पर्यटकांनी विशेष सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी आंबेनळी घाटात मोठी दरड कोसळल्यानं दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविली. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर घाटातील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट
पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट (ETV Bharat Reporter)

मुसळधार पावसादरम्यान घाटातून प्रवास करू नका : पावसाळ्यात घाटातील हवामान क्षणाक्षणाला बदलत असल्यानं अचानक दाट धुके, कमी दृश्यमानता, रस्त्यावर पाणी साचणे आणि दरडी कोसळण्याचा धोका कायम असतो. त्यामुळं विशेषतः रात्रीच्यावेळी किंवा मुसळधार पावसादरम्यान घाटातून प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. तहसीलदार कपिल घोरपडे यांनी नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय आंबेनळी घाटातून प्रवास करू नये, असा स्पष्ट सल्ला दिला आहे.

आंबेनळी घाटात दरडी कोसळण्याचा धोका वाढ
आंबेनळी घाटात दरडी कोसळण्याचा धोका वाढला (ETV Bharat Reporter)

प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा : प्रवास करावाच लागल्यास वाहनांचा वेग नियंत्रित ठेवावा, सुरक्षित अंतर राखावे, दरडप्रवण ठिकाणी अनावश्यक थांबू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, असं त्यांनी सांगितलं. तसंच घाट परिसरात दरड कोसळणं, झाड पडणं, रस्ता खचणं किंवा अन्य कोणतीही धोकादायक घटना आढळल्यास ती लपवून न ठेवता तत्काळ पोलादपूर तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन किंवा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळं संभाव्य दुर्घटना टाळणं शक्य होणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा -

  1. पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला; आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काहीकाळ ठप्प
  2. आंबेनळी घाटातील रेस्क्यू ऑपरेशन 22 तासांनी संपलं, छिन्नविछिन्न मृतदेह पाहून ट्रेकर्सही गहिवरले!
  3. आंबेनळी घाटातील स्कार्पिओ गाडीचा अपघात शनिवारी रात्रीच झाला? धक्कादायक माहिती समोर
Last Updated : July 2, 2026 at 3:11 PM IST