मुसळधार पावसाचा फटका; आंबेनळी घाटातील वाहतूक 7 जुलैपर्यंत बंद
हवामान विभागानं पुढील 4 दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आंबेनळी घाट पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

Published : July 3, 2026 at 8:37 PM IST
रायगड : रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट ३ जुलै ते ७ जुलैदरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अतिवृष्टीचा इशारा, घाट परिसरात सातत्याने होणारी दरड कोसळण्याची शक्यता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी हा आदेश जारी केला आहे. प्रशासनानं नागरिकांना या कालावधीत आंबेनळी घाट मार्गाचा वापर टाळण्याचे तसेच प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय : भारतीय हवामान विभागानं पुढील 4 दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर राज्य महामार्गावरील आंबेनळी घाटातील वाहतूक 3 जुलै ते 7 जुलै 2026 या कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
अतिसंवेदनशील आणि भूस्खलनप्रवण घाट म्हणून ओळख : आंबेनळी घाट हा सह्याद्री पर्वतरांगेतील अतिसंवेदनशील आणि भूस्खलनप्रवण घाट म्हणून ओळखला जातो. तीव्र उतार, खोल दऱ्या, अस्थिर माती, विदीर्ण बेसॉल्ट खडक आणि मुसळधार पावसामुळे या परिसरात दरडी कोसळण्याचा धोका कायम असतो.
गेल्या आठवडाभरात पोलादपूर हद्दीत दोन वेळा मोठ्या दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून घाटबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या या मार्गावर संरक्षण भिंती, क्रॅश बॅरिअर्स, ड्रेनेज सुधारणा आणि इतर सुरक्षाविषयक कामे सुरू आहेत. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.
पर्यायी मार्ग स्वीकारावा : दरम्यान, पुणे, सातारा आणि महाबळेश्वरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी महाड-माणगाव-ताम्हिणी घाट मार्ग किंवा पोलादपूर-चिपळूण-कराड मार्गाचा पर्याय स्वीकारावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. तसेच नागरिकांनी घाटबंदीचे आदेश पाळून अनावश्यक प्रवास टाळावा आणि केवळ पर्यायी मार्गांचाच वापर करावा, असंही प्रशासनानं म्हटलं आहे.
हेही वाचा
- आंबेनळी घाट पुन्हा धोकादायक; अत्यावश्यक कामाशिवाय घाटात प्रवास टाळा, दरड कोसळल्यानंतर प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
- पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला; आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काहीकाळ ठप्प
- आंबेनळी घाटातील रेस्क्यू ऑपरेशन 22 तासांनी संपलं, छिन्नविछिन्न मृतदेह पाहून ट्रेकर्सही गहिवरले!

