"2 लाख 90 मतदारांची मूळ जागा बदलण्यात आली, जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबन करा"-अंबादास दानवे
शिवसेनेचे (यूबीटी) नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या यादीत घोळ असल्याचा गंभीर आरोप केला. जबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन करावे, अशी त्यांनी पत्रकार परिषदेतून मागणी केली.


Published : November 28, 2025 at 6:02 PM IST
|Updated : November 28, 2025 at 6:09 PM IST
छत्रपती संभाजीनगर - शिवसेनेचे (यूबीटी) नेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणूक मतदार यादीत घोळ झाला असल्याचा आरोप केलाय. 29 पैकी 24 प्रभागांचे तपशील मनपा आयुक्त यांना दिले आहेत. यात 2 लाख 90 मतदारांची मूळ जागा बदलण्यात आली आहेत. आजूबाजूला नाही तर तिसऱ्याच प्रभागात कुठंतरी ही नावे टाकण्यात आली आहेत, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
शिवसेनेचे (यूबीटी) नेते अंबादास दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असताना निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, 25 ते 30 टक्के मतदार नाव दुसऱ्या ठिकाणी गेले. तर 1 लाख 75 मतदारांची नावे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका दोन्ही ठिकाणीदेखील आहेत. हे दुबार तीबारपेक्षा वेगळं आहे. नुसतं तपासणी पाहणी करून होणार नाही. अधिकारी बेजबाबदारपणं काम करत असून त्यांना निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. मतपेटी बंद करण्यापूर्वी 48 तास प्रचार बंद होतो. मग प्रचार बंदच कशाला करता? मतदान होईपर्यंत चालू राहू द्या, अशी टीका त्यांनी केली.
आयुक्त यांचं लक्ष नाही- एकूण 11 लाख 50 मतदारांमध्ये हा 1 लाख 75 हजार मतांचा मोठा घोळ आहे. निवडणूक आयोग आणि मतदाराविषयी निष्काळजीपणा करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी. कुटुंबात 15 सदस्य असतील तर त्यापैकी 11 नावे दुसरीकडे गेलेत. तर काही नावे तर गायबच झाली आहेत. याद्या लोकसभा विधानसभा निवडणुकीतील आहेत. मग, नावे गायब कशी झालीत? एखादी यंत्रणा घोळ करते. नुसती कारवाई नाही तर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
आयुक्त कुठे गुंतले माहिती नाहीत- माझ्याकडील काही कागदपत्रानुसार प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात नावे गायब आहेत, तर काही दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. हजार नावांमध्ये कुठे पाचशे तर कुठे दोनशे नावे इकडेतिकडे झालेले आहेत. आयुक्त कुठे गुंतले माहिती नाहीत. त्यानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी असल्याचंदेखील दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
शिरसाट यांची चौकशी सुरू - एक महिन्यापूर्वी संजय शिरसाट यांची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं होतं. शिरसाट यांनी नाही म्हटलं होतं. पण, याच चौकशी समितीमधील अधिकारी दोषी आहे. भारत सरकारनं रद्द केलेली जमीन पुन्हा वाटप करण्यात आले. सरकारनं शिरसाट यांना पुढे करून हा गुन्हा करण्यात आला आहे. शिरसाट एकटे त्यात नाहीत, याचे मागे आणखी काहीजण आहेत. हे प्रकरण मोठं आहे, अजित पवारांच्या कोंढवा प्रकरणाशी हे मोठं प्रकरण आहे. चौकशी समीती मान्य नाही. माजी न्यायाधीशांच्यामार्फत चौकशी केली पाहिजे, अशी दानवे यांनी मागणी केली.
शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण मदत नाहीच- शेतकऱ्यांना 65 टक्के मदत मिळाली, आता दावा केला जात आहे. मात्र, ही मदत शेतकरीनुसार अनुदान झाली आहे. कोणाला दोन हजार, कोणाला दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली. त्यामुळे सरकारकडून करत असलेला दावा खरा नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
आदित्य ठाकरेंनी केले होते आरोप- शिवसेनेचे नेते (यूबीटी) तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील मतदान प्रक्रियेवरून 21 नोव्हेंबरला गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले होते, विरोधी पक्षांचे बलस्थान असलेल्या बूथमधील मतदारांना दुसऱ्या बूथला हलवलं आहे. विरोधी पक्षांचे उमेदवार मजबूत असलेल्या भागातील मतदारसंख्या कमी करण्यात आले आहेत. तसेच सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना फायदा होईल, अशा रीतीनं वॉर्ड रचना आणि मतदार यादी तयार करून थेट ‘व्होट चोरी’ होत आहे.
हेही वाचा-

