'सत्ताधारी पक्ष अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन धमकावतोय,' अंबादास दानवेंचा घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांवर आरोप
शिवसेनेचे (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जाणून घ्या, सविस्तर माहिती.

Published : January 4, 2026 at 2:27 PM IST
छत्रपती संभाजीनगर : सरकारच्या मंत्र्यांचे परिचित अधिकारी आमच्या उमेदवारांना धमकावत असल्याचा आरोप शिवसेने(उबाठा)चे नेते अंबादास दानवे यांनी एक्स मीडियावर पोस्ट करून केलाय. घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आलेत. "डॉक्टरांच्या वेशात राजकीय सौदेबाजी करून आमच्या उमेदवाराला त्रास देण्याचा प्रयत्न होतोय. 22 जून 2024 पर्यंतचेच नियुक्ती आदेश असतानाही सुक्रे पदावर कायम आहेत. या प्रकरणी राज्य निवडणूक आयुक्तांकडं तक्रार करून गुन्हा दाखल आणि निलंबनाची मागणी केल्याचं दानवेंनी सांगितलं. इतकंच नाही तर महानगरपालिकेचे छोटे मोठे कर्मचारीदेखील असं करीत आहेत, त्याची तक्रार अद्याप करणार नसल्याचंदेखील त्यांनी सांगितलं.
शनिवारी चिन्ह देण्यावरून गोंधळ : महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मधील शिवसेनेचे उमेदवार सावत्री वाणी यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले मशाल चिन्ह अचानक नाकारले. त्यामुळं शनिवारी रात्री सातच्या सुमारास अंबादास दानवे आक्रमक झाले. अधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश दाखवले असले तरी चिन्ह बदलल्याचा आरोप दानवेंनी केलाय. निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. अंबादास दानवे आणि निवडणूक अधिकारी यांच्यात झालेल्या वादानंतर अखेर चिन्ह मिळाले. त्यानंतर सावित्री वाणी यांना मशाल चिन्ह देणार असल्याचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्याने जाहीर केलाय. या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय.

अधिकृत चिन्ह देण्यास टाळाटाळ : दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 4 मधून सावित्री वाणी यांनी ठाकरेंच्या शिवसेना पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षानं त्यांना एबी फॉर्म देखील दिला. मात्र, यावेळी उमेदवारी अर्जामध्ये मशाल चिन्हाचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळं निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून नोंदवण्यात येत असल्याचं सांगितलं. निवडणूक अधिकाऱ्याच्या विरोधात उमेदवार वाणी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यावेळी न्यायालयाने एबी फॉर्म असल्यानं चिन्ह देण्यात यावे, असे आदेश दिले. त्यानंतर दुपारी निवडणूक अधिकारी यांनी चिन्ह वाटप घोषणा करताना उमेदवार वाणी यांना मशाल चिन्ह वाटप केलं. पण त्यानंतरच महानगरपालिकेच्या वकिलांनी आक्षेप घेणारे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवले, त्यामुळं निवडणूक अधिकाऱ्यांनी वाणी यांना मशाल चिन्ह लेखी वाटप करण्यास नकार दिला. त्यानंतर अंबादास दानवे हे निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात पोहोचले. निवडणूक अधिकारी जाणीवपूर्वक मशाल चिन्ह देत नसल्याचा आरोप केला. यावेळी दानवेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं.
डॉक्टरांच्या वेशभूषेत राजकीय सौदेबाजी करू पाहणार, आमच्या उमेदवारास फोना-फानी करणारे अधिकारी म्हणजे घाटी रुग्णालयाचे डीन डॉ. शिवाजी सुक्रे. २२ जून २०२४ पर्यंतचेच नियुक्ती आदेश असलेले सुक्रे अजून डीनच्या पदावर कायम आहेत. पदावर कायम राहू दिल्याची परतफेड ते पालकमंत्र्यांची बाजू घेऊन… pic.twitter.com/ISSy2UDaAY
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 4, 2026
हेही वाचा -
- मुंबई महापालिका निवडणूक : गिरगावचा श्वास कोंडतोय! टॉवर्स वाढले पण नागरी सुविधा घटल्या; खोदलेले रस्ते, धूळीमुळे नागरिक हैराण
- पुण्यातील त्रिकूट कारभारी बदलण्याची गरज, शहरातील समस्यांचा पाढा वाचत अजित पवार यांचा भाजपावर हल्लाबोल!
- शिंदे-फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; वरळीतून फोडला निवडणूक प्रचाराचा नारळ

