नांदेड हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना
नांदेड जिल्ह्यात तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीच्या शोधासाठी पथके नियुक्त केली आहेत.

Published : August 25, 2026 at 8:46 PM IST
नांदेड : लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी (25 ऑगस्ट) समोर आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून नातेवाईकानं चिमुकलीला सोबत नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी POCSO कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके नियुक्त केली आहेत.
चिमुकलीला घरी सोडून संशयीत फरार : सोमवारी सायंकाळी चिमुकली घरासमोर खेळत असताना आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून सोबत नेलं. सुमारे 20 ते 25 मिनिटांनंतर आरोपी चिमुकलीला घरी सोडून निघून गेला. त्यानंतर चिमुकली रडत असल्याचं तिच्या आईच्या लक्षात आलं. आईने विचारणा केल्यानंतर चिमुकलीनं घडलेला प्रकार सांगितला.
या प्रकरणी आईने सोनखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा (LCB), स्थानिक पोलिस ठाण्याचे डीपी पथक आणि जिल्हा पोलीस विभागाच्या वतीनं स्वतंत्र पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. घटनेनंतर पालकांनी चिमुकलीला तातडीने नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू : घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपीच्या शोधासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिली.
हेही वाचा
- तृतीयपंथीयाच्या वेषात एकाचा मुंबईतील महिलेवर अतिप्रसंग, पोलिसांनी अवघ्या काही तासांत आवळल्या मुसक्या
- जुन्नरच्या पिंपळवंडीत साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीची हत्या; लैंगिक अत्याचाराच्या संशयाने संतापाची लाट
- पुरंदर हादरलं! कोळविहीरेत 10 वर्षीय बालिकेवर 60 वर्षांच्या वृद्धाकडून लैंगिक अत्याचार; जेजुरी पोलिसांकडून नराधम अटकेत

